प्रा. डॉ. गजानन शेपाळ, ज्येष्ठ अधिव्याख्याता, सर ज. जी. उपयोजित कला महाविद्यालय, मुंबई
दि.२५ डिसेंबर २०२३ रोजी पहाटे ज्येष्ठ शिल्पकार डॉ. उत्तम पाचारणे यांचे आकस्मिक दुःखद निधन झाले. अचानक झालेली देवाज्ञा मनाला चटका लावून गेली. खरं तर पाचारणे सरांनाही कल्पना नसेल, इतक्या तातडीने ईश्वरांकडून बोलावणे येईल. कारण हाती घेतलेली, महाराष्ट्राच्या दृश्यकलेची कामे पूर्णत्वास न्यायची आहेत ही तगमग त्यांच्या मनात सतत सुरू होती. त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी उपस्थितांपैकी प्रत्येकाच्या मनात हळहळ होती. ज्येष्ठ चित्रकार सुहास बहुळकर तर म्हणाले की, ‘‘महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून महाराष्ट्रासाठी ललित कला अकादमीचे विभागीय केंद्र व्हावे यासाठी प्रयत्न करणाऱ्या आमच्यापैकी डॉ. उत्तम पाचारणे ध्यास घेऊन गेले, आता आम्हालाही जायची वेळ येईल; परंतु खरंच महाराष्ट्रातील दृश्यकलाकारांची, त्यांच्या कलेची कुणी दखल घेणारे आहेत का?’’ फार व्यथित आणि उद्विग्नतेकडे नेणारा त्यांचा प्रश्न होता, नव्हे आहे.
डॉ. पाचारणे सर हे २०१८ ला ललित कला अकादमी, नवी दिल्लीचे चेअरमन नियुक्त केले गेले. भारताच्या राष्ट्रपतींकडून ही नियुक्ती होते. डॉ. पाचारणे हे पहिले महाराष्ट्रीय शिल्पकार ज्यांची थेट ललित कलेच्या चेअरमनपदी नियुक्ती झाली. ललित कला अकादमीची मरगळ झटकली गेली. डॉ. उत्तम पाचारणे यांची कामाची गती अफाट आणि पारदर्शी असल्याने त्यांना मिळालेल्या कार्यकाळात त्यांनी सुमारे शंभरावर उपक्रम यशस्वीपणे राबविले. त्यात कला कॅम्प, कला कार्यशाळा, प्रदर्शनांची आयोजने, सेमिनार्स आणि बरंच काही…!! अनेक ज्ञात-अज्ञात दृश्यकलाकारांना त्यांनी ललित कला अकादमीचे राष्ट्रीय स्तरावरील व्यासपीठ मिळवून दिले, अनेक महिला कलाकारांना त्यांनी कला क्षेत्राच्या प्रवाहात आणले.
ललित कला अकादमीच्या चेअरमनपदी स्वकष्टाने विराजमान झालेले डॉ. उत्तम पाचारणे हे महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील चिखलेवाडी येथे जन्मलेले होते. १ जून १९५६ ला अत्यंत गरीब घरात जन्मलेल्या शिल्पकार पाचारणे यांचे आर्ट टिचर डिप्लोमाचे कलाशिक्षण पुण्याच्या अभिनव कला महाविद्यालयात प्रथम श्रेणीत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊन पूर्ण झाले. पुढे मुंबईच्या सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये त्यांनी शिल्पकला विभागात नाव कमाविले. ती वर्षे होती १९७६ ते १९८१ या काळातील. अफाट निरीक्षण क्षमता, हुशार तसेच प्रखर बुद्धिमत्ता आणि ओघवत्या विचार प्रसारणामुळे ते विद्यार्थीप्रिय, मित्रप्रिय आणि रसिकप्रिय ठरले होते. त्यांच्या कलाविषयक समर्पणाची एक पावती म्हणजे त्यांना पिल्लो पोचखानवाला यांच्याकडून शिल्पकला या विभागातून राष्ट्रीय स्तरावरील शिष्यवृत्ती मिळाली होती. मुंबई त्यांची कलाविषयक कर्मभूमी बनली. ‘स्मारक शिल्पकला’ क्षेत्रात त्यांच्या नावाचे एक समीकरणच बनले.
आपली कला त्यांनी सामाजिक स्तरावर रुजविली. कला अकादमी – गोवा, पु. ल. देशपांडे राज्य कला अकादमी – मुंबई या महत्त्वाच्या समित्यांसह अनेक ठिकाणी ते सल्लागार म्हणून कार्यरत होते. १९८५ सालीच त्यांना राष्ट्रीय ललित कला पुरस्काराने त्यांच्या कलाविषयक योगदानाला अधोरेखित केले. नंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. तब्बल तीन टर्म त्यांनी ‘बॉम्बे आर्ट सोसायटी’चे अध्यक्षपद भूषविले. २४ वर्षे ते सोसायटीवर कार्यरत होते. त्यांच्या तेथील कार्यकालात त्यांनी अनेक प्रसिद्धीपासून दूर राहिलेल्या उपेक्षित कलाकारांना ‘बॉम्बे आर्ट सोसायटी’त सामाविष्ट केले. ‘समाजाभिमुखता’ या शब्दाचं, मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डॉ. उत्तम पाचारणे होय. अशी ओळख त्यांनी निर्माण केलेली होती. पुढे मे २०१८ ते २०२२ या काळात भारताचे राष्ट्रपती यांनी त्यांना ललित कला अकादमीच्या अध्यक्षपदी नियुक्त केले. त्यांच्या कामाचा आवाका, गती आणि पारदर्शकता विचारात घेऊन केंद्र सरकारने त्यांना सहा महिने वाढवून दिले.
चतुरस्र वक्ता, अष्टपैलू शिल्पकार आणि सामाजिक बांधिलकी जपणारा दृश्यकलाकार डॉ. उत्तम पाचारणे यांनी दगड, धातू, कांस्य, चिकणमाती, फायबर यांसह विविध माध्यमांमध्ये काम केले. त्यांनी अमूर्त शैलीसह वास्तववादी शैलीत प्रभुत्व दाखवून काम केले. अटलबिहारी वाजपेयी, एस. एम. जोशी, स्वामी विवेकानंद, अहिल्याबाई होळकर अशा व्यक्तिमत्त्वांचे पुतळे त्यांनी साकारलेले आहेत. पोर्ट ब्लेअर (अंदमान) येथील ऐतिहासिक सेल्युलर जेलमध्ये स्वातंत्र्य ज्योत… हे त्यांच्या उल्लेखनीय कार्यापैकी एक कार्य आहे. डॉ. उत्तम पाचारणे यांचा कलाविषयक वारसा जहांगीर आर्ट गॅलरी मुंबई ते भारतातील विविध आर्ट गॅलरीमधील त्यांच्या एकल प्रदर्शनांनी सजलेला आहे. ‘स्मारकीय शिल्पां’मध्ये व्यावसायिक यश मिळालेले असतानाही त्यांचे पाय जमिनीवरच असायचे. विविध प्रायोगिक आणि सामाजिक कार्यासाठी ते नेहमीच समर्पित राहिले. त्यांच्या समान जीवनाशी निगडित अतुलनीय उत्कटता त्यांनी अखेरपर्यंत जपली.
दि. १९ ऑगस्ट २०२३ ला ‘माझ्या रंगसभा’ या ग्रंथाच्या प्रकाशनाला महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस आले होते. त्यांच्या शुभ हस्ते ग्रंथ प्रकाशन आणि व्यासपीठावरील प्रमुख उपस्थितीमध्ये डॉ. उत्तम पाचारणे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी हाती घेतलेला मात्र काही कारणामुळे प्रलंबित राहिलेला ‘विभागीय ललित कला केंद्रा’चा प्रश्न राज्यपाल बैस यांच्यासमोर मांडला. तेव्हा सभागृहातील उपस्थित शेकडो उपस्थितांनी टाळ्या वाजवून दाद दिली. त्यावेळी राज्यपाल यांनी प्रलंबित प्रश्न, ‘मी स्वतः मुख्यमंत्री यांच्याशी बोलून मार्गी लावेल’, असे स्पष्ट आश्वासन दिले. स्वतः काष्ठ शिल्पकार असलेल्या राज्यपाल यांनी डॉ. पाचारणे आणि मला, २२ ऑगस्ट २०२३ ला ‘राजभवन’ येथे बोलावून चर्चा केली. ती चर्चा फारच सकारात्मक दिशेने झाली. त्याच बैठकीत डॉ. पाचारणे यांनी राज्यपाल यांच्याकडे आणखी एक मागणी केली होती, ‘भारताच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ७५ महिला कलाकार आणि ७५ पुरुष कलाकार अशा एकूण १५० दृश्यकलकारांचा पांच दिवसांचा कला कॅम्प’ राजभवन आणि सर जे. जे. स्कूल परिसरात घ्यावा, अशी डॉ. पाचारणे यांची मागणी राज्यपाल यांना खूप भावली. त्यांनी त्वरित प्रस्ताव देण्यास सांगितले. आम्ही तातडीने ऑगस्ट २०२३ अखेर सदर प्रस्ताव सादर केला आहे; परंतु ‘अद्याप सरकारी अधिकाऱ्यांच्या टेबलावरून राज्यपाल यांच्यापर्यंत तो प्रस्ताव पोहोचला की नाही याची काळजी आणि चिंता पाचारणे सर करीतच संपले.’ कुठलेही सामाजिक कार्य स्वतःचेच मानायचे. ही दोन्हीही कार्य मायबाप सरकारने पूर्णत्वास नेलीत तरी या महाराष्ट्राच्या या सुपुत्रास खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अर्पण केली, असे म्हणता येईल, त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन…!!