वयाच्या ७१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
चेन्नई : लोकप्रिय तमिळ अभिनेते (Tamil actor) व तामिळनाडू (Tamilnadu) विधानसभेतील माजी विरोधी पक्षनेते विजयकांत (Vijayakanth) यांचं आज सकाळी चेन्नईतील एमआयओटी हॉस्पिटलमध्ये (MIOT Hospital) निधन झालं. वयाच्या ७१व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. २० नोव्हेंबरपासून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मृत्यूनंतर रुग्णालयाबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
विजयकांत तामिळनाडूतील डीएमडीके पक्षाचे (DMDK Party) प्रमुख होते. ते काही दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) आले होते. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कोविड-१९ चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना श्वास घ्यायला त्रास होत असल्याने ते व्हेंटिलेटर सपोर्टवर होते, असं सांगितलं जात आहे. मात्र, रुग्णालयाच्या निवेदनात त्यांना न्यूमोनिया झाल्याचं नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण रुग्णालयाने स्पष्ट केलेलं नाही.
कॅप्टन विजयकांत डीएमडीके पक्षाचे नेते
अभिनेते विजयकांत यांनी २००५ मध्ये देसिया मुरपोक्कू द्रविड कळघम (DMDK) पार्टीची स्थापना केली. २००६ मध्ये विजयकांत यांच्या पक्ष डीएमडीकेने तामिळनाडूतील सर्व २३४ जागांवर निवडणूक लढवली होती. मात्र विजयकांत एकटेच निवडणूक जिंकण्यात यशस्वी ठरले. उर्वरित सर्व जागांवर त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र, या निवडणुकीत त्यांच्या पक्षाला ८.३८% मते मिळाली.
२०११ च्या विधानसभा निवडणुकीत डीएमडीकेला अधिक यश आलं. ४१ जागांपैकी २९ जागा पार्टीला मिळाल्या होत्या. २०११ ते २०१६ पर्यंत डीएमडीके तामिळनाडूमध्ये मुख्य विरोधी पक्ष होता आणि विजयकांत विधानसभेतील विरोधी पक्षनेते होते. मात्र, त्यानंतर २०१६ आणि २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही.
विजयकांत यांचा सिनेप्रवास
विजयकांत यांनी १५४ सिनेमांत आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. चेन्नईत विजयकांत यांचं एक इंजीनियरिंग कॉलेज आणि कोयम्बेडु नावाचा लग्नाचा हॉल आहे. अभिनेते असण्यासोबत ते निर्माता आणि दिग्दर्शकही होते. अष्टपैलू भूमिकांसोबतच अॅक्शन हिरो म्हणूनही ते लोकप्रिय होते. विजयकांत यांचे अनेक सिनेमे ब्लॉकबस्टर ठरले आहेत. फिल्मफेअर पुरस्कासह अनेक नामांकित पुरस्कारांनी त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
विजयकांत यांनी ‘इनिक्कुल इलामाई’ या सिनेमाच्या माध्यमातून १९७९ रोजी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. या सिनेमात त्यांनी विरोधी भूमिका साकारली होती. एमए काजा यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. विजयकांत यांचे आगल विलक्कू, नीरोत्तम आणि सामंथिप्पू हे सिनेमे बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले आहेत. तर नूरवथु नाल, वैदेगी काथिरुंथाल, कूलिएकरन, वीरन, वेलुथांबी, उझवान मगन हे सिनेमे सुपरहिट ठरले आहेत.