Monday, April 21, 2025
Homeसंपादकीयविशेष लेखकुस्ती महासंघाच्या बाहुबलीला लगाम...

कुस्ती महासंघाच्या बाहुबलीला लगाम…

इंडिया कॉलिंग: डॉ. सुकृत खांडेकर

भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकीत २१ डिसेंबरला संजय सिंह यांची अध्यक्षपदावर निवड झाली आणि दि. २४ डिसेंबरला केंद्र सरकारच्या क्रीडा मंत्रालयाने भारतीय कुस्ती महासंघ निलंबित केल्याची घोषणा केली. आंतरराष्ट्रीय पातळीवर सन्मानपदके मिळविणाऱ्या भारतीय महिला कुस्तीगीरांनी यावर्षी १८ जानेवारीला भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष व सर्वेसर्वा खासदार बृजभूषण शरण सिंह याच्याविरोधात देशाच्या राजधानीत निषेध आंदोलन सुरू केले. कुस्ती महासंघाच्या निवडणुकीत बृजभूषण सिंहचेच निकटवर्तीय निवडून आल्याने हे आंदोलन चिघळले व खेळातून संन्यास घेण्यापासून ते मिळालेले पद्म पुरस्कार परत करेपर्यंत आंदोलक खेळाडूंनी टोकाची भूमिका घेतली. त्यानंतर क्रीडा मंत्रालयाने भारतीय कुस्ती महासंघ निलंबित करण्याची कारवाई केली.

भारतीय कुस्ती महासंघात जे काही चालले आहे त्याचे कोणीही समर्थन केलेले नाही, पण क्रीडा मंत्रालयाला कारवाई करायला उशीर झाला. बृजभूषण सिंह किंवा भारतीय कुस्ती महासंघ यांच्यावर कारवाई करण्यासाठी क्रीडा मंत्रालय कोणाच्या आदेशाची वाट पाहत होते, असा प्रश्न विचारला जात आहे. भारतीय कुस्ती महासंघावर केलेली कारवाई म्हणजे, ‘सांप भी मरा, लाठी भी नही टुटी’ असे वर्णन केले जात आहे. बृजभूषण शरण सिंह हा जरी भारतीय जनता पक्षाचा लोकसभेचा खासदार असला तरी तो काही कोणी साधु-संत नाही. वयाच्या सत्तरीच्या उंबरठ्यावर असलेला बृजभूषण सिंह याची राजकीय व सार्वजनिक कारकीर्द बरीच वादग्रस्त आहे. उत्तर प्रदेशच्या राजकारणात त्याची ओळख बाहुबली अशी आहे. पोलिसांच्या दप्तरी त्याच्यावर ३८ गंभीर गुन्हे दाखल झालेले हे गृहस्थ आहेत. बृजभूषण सिंह याचा उत्तर प्रदेशच्या राजकारणात दबदबा आहे. तो उत्तर प्रदेशमधील कैसरगंज लोकसभा मतदारसंघाचा खासदार म्हणून लोकप्रतिनिधित्व करतो. १९९२ मध्ये अयोध्येत बाबरी मशीद उद्ध्वस्त झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री मुलायम सिंह सरकारच्या पोलिसांनी व नंतर सीबीआयने त्याना अटक केली होती. कुविख्यात दाऊद इब्राहिम टोळीशी संबंध असल्याची संशयाची सुई त्याच्याकडे तपासात रोखली गेली होती. दहशतवादविरोधी गुन्ह्याखाली त्याना अटक झाली होती. कुस्तीगीर महिलांच्या लैंगिक शोषणाचा त्याच्यावर आरोप असून दिल्ली पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा नोंदवला आहे.

बृजभूषण सिंह याने अयोध्येच्या साकेत पीजी कॉलेजमधून कायद्याचा अभ्यास केला. त्याला तीन मुले आहेत. मोठ्या मुलाने वयाच्या २३ व्या वर्षीच स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. सन १९७४ ते २००७ या काळात बृजभूषण सिंहवर पोलिसांकडे ३८ गुन्ह्यांची नोंद आहे. चोरी, दरोडे, हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण असे गंभीर गुन्हे असून बहुतेक प्रकरणात त्याची पुराव्याअभावी न्यायालयात निर्दोष सुटका झाली आहे. बृजभूषण सिंह हा सहा टर्म खासदार आहे. पैकी ५ टर्म भाजपाचा खासदार आहे. एक टर्म तो सपाचा खासदार होता. गोंडा, बलरामपूर, कैसरगंज अशा मतदारसंघातून तो लोकसभेवर निवडून गेला. सन २००८ मध्ये लोकसभेत विश्वासदर्शक ठरावावर क्रॉस व्होटिंग केले म्हणून त्याला भाजपाने काही काळ पक्षातून काढून टाकले होते. पण तो पक्षाचा पुन्हा खासदार म्हणून निवडून आला. १९९३ मध्ये मुंबईच्या जे. जे. इस्पितळाच्या आवारात दाऊदच्या टोळीने केलेल्या गोळीबार प्रकरणात बृजभूषण सिंहला अटक झाली होती. मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी अयोध्येला राम लल्लाच्या दर्शनाला जाण्याचे ठरवले तेव्हा त्यांना धमकी देऊन रोखण्याची भाषा याच बृजभूषण सिंहने वापरली होती. बृजभूषण सिंह हा यूपीचा शिक्षण सम्राट आहे. पन्नासपेक्षा जास्त शाळा, कॉलेजेस, शिक्षण संस्था असा त्याचा मोठा पसारा आहे.

इंजिनीअरिंग, फार्मसी, कायदा पदवी देणाऱ्या तो शिक्षण संस्थांचा प्रमुख आहे. बहराइच, गोंडा, बलरामपूर, अयोध्या, श्रावस्ती अशा भागांत त्याच्या शिक्षण संस्था आहेत. भारतीय कुस्ती महासंघाचा कारभार तो त्याच्या घरातूनच वर्षानुवर्षे चालवत होता. त्याच्याकडे दोन हेलिकॉप्टर्स, एक खासगी जेटही आहे. दरवर्षी बृजभूषण सिंह ८ जानेवारीला त्याचा वाढदिवस मोठा इव्हेंट म्हणून साजरा करतो. त्यानिमित्ताने, ‘छात्र प्रतिभा खोज’ बुद्धिमान विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाते. जे विजेते ठरतात, त्यांना रोख रकमेसह मोटारसायकल किंवा स्कूटर बक्षीस म्हणून भेट दिली जाते. कैसरगंज, गोंडा, बहराईच या क्षेत्रात बृजभूषण सिंह प्रभावशाली नेता आहे, म्हणूनच निवडणुकीच्या राजकारणात त्याचे बाहुबली म्हणून महत्त्व आहे. गेले वर्षभर कुस्तीगीर सन्मान पदक विजेत्या महिला आणि बृजभूषण सिंह यांच्यात संघर्ष चालू आहे. मध्यंतरी हा संघर्ष शांत झाला असे वाटले. पण भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक झाली आणि पुन्हा बृजभूषण सिंह यांच्याच कट्टर समर्थकांचे पॅनेल निवडून आले तेव्हा पुन्हा संघर्षाची ठिणगी उडाली. बृजभूषण याचे विश्वासू संजय सिंह महासंघाचे अध्यक्ष झाले व त्यांनी धडाधड मोठे निर्णय घ्यायला सुरुवात केली. अर्थात बृजभूषण सिंह याच्या सल्ल्यानेच सारे चालले होते.

बृजभूषण सिंह विरुद्ध कुस्तीगीर अशा संघर्षात गेले अकरा केंद्र सरकारे शांत होती. मग अचानक सक्रिय कसे झाले? शेतकरी नेते व माजी दिवंगत पंतप्रधान चरणसिंग यांच्या जयंतीच्या दुसऱ्याच दिवशी सरकारने हस्तक्षेप करून भारतीय कुस्ती महासंघ निलंबित केल्याची घोषणा केली. नवनिर्वाचित महासंघाने नवीन निर्णय घेताना नियमांचे पालन केले नाही, असे कारण देण्यात आले. पंधरा व वीस वर्षांखालील तरुण कुस्तीगीरांसाठी राष्ट्रीय विजेतेपदासाठी भारतीय कुस्ती महासंघाने स्पर्धा जाहीर केली. ही घोषणा महासंघाने घाईघाईने केली. तसेच कुस्तीगीरांना तयारी करायला पुरेसा वेळ दिला नाही, असेही कारण सांगण्यात आले. भारतीय कुस्तीगीर महासंघाचे पदाधिकारी नवीन असले तरी त्यावर रिमोट हा जुन्या पदाधिकाऱ्यांचाच आहे, हे सर्वांच्या लक्षात आले. मुळातच बृजभूषण याचे विश्वासू संजय सिंह यांची अध्यक्षपदी झालेल्या निवडीनंतरच कुस्ती क्षेत्रात नाराजी व्यक्त झाली. अनेक खेळाडू व महासंघाचे सक्रिय कार्यकर्ते अस्वस्थ झाले. संजय सिंह यांच्या निवडीनंतर ऑलिम्पिक मेडल विजेत्या साक्षी मलिकने दिल्ली प्रेस क्लबला घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपले मेडल खेळाच्या टेबलावर ठेवले व आपण यापुढे कुस्ती खेळणार नाही, असे जाहीर केले. दुसऱ्याच दिवशी बजरंग पुनियाने त्याला मिळालेला पद्मश्री किताब राजधानीतील रस्त्यावर ठेऊन दिला व तो सरकारला परत केल्याचे म्हटले. सरकारने बृजभूषण सिंहवर थेट कारवाई केलेली नाही, त्याच्याविरोधात एफआयआर दाखल होऊनही त्याला अटक झालेली नाही. मात्र भारतीय कुस्ती महासंघ पुढील आदेश येईपर्यंत निलंबित करण्यात येत असल्याचे सरकारने आपल्या आदेशात म्हटले आहे. याचाच दुसरा अर्थ साप मारला, पण काठी तुटली नाही.

लोकसभा निवडणुका चार महिन्यांवर आल्या आहेत. संसदेच्या हिवाळी अधिवेशाच्या काळात विरोधी पक्षाच्या खासदारांनी उपराष्ट्रपतींची नक्कल करून जाटांचा अवमान केला, असा प्रचार जोरदार झाला, त्यातून जाट मतदारांची सहानुभूती भाजपाला मिळू शकते. पण त्याचबरोबर साक्षी मलिक यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह बृजभूषण विरोधात पुन्हा बंडाचा झेंडा फडकवला तेव्हा मात्र भाजपाला गंभीर दखल घेणे भाग पडले. साक्षी मलिक व त्यांचे सहकारी जाट आहेत, आंदोलन करणारे कुस्तीगीर हे प्रामुख्याने जाट आहेत, याकडे फार काळ दुर्लक्ष करून चालणार नाही. हरियाणाची २८ टक्के लोकसंख्या जाट आहे. पश्चिम, उत्तर प्रदेशात जाटांचे प्राबल्य आहे. राजस्थानातही जाटांची संख्या लक्षणीय आहे. या संघर्षाचा परिणाम येणाऱ्या निवडणुकीवर होऊ नये यासाठी तप्तरतेने कारवाई करणे गरजेचे होतेच. क्रीडा मंत्रालयाच्या निर्णयानंतर इतके दिवस बिनधास्त राहिलेल्या बृजभूषण सिंहला कंठ फुटला. मी क्षत्रिय आहे, संजय सिंह भूमिहार आहे, तो काही माझा नातेवाईक नव्हे, अशी त्याने पहिली प्रतिक्रिया दिली. पण संजय सिंह यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीनंतर सर्वाधिक पुष्पहार बृजभूषण सिंह हाच आपल्या गळ्यात घालून मिरवत होता. निवडणूक निकालानंतर बृजभूषण म्हणतो, हा विजय आमचा नाही, कुस्तीपटूंचा आहे. गेले अकरा महिने जे कुस्तीचे नुकसान झाले, त्याची आता भरपाई करू. दबदबा है, दबदबा रहेगा…

[email protected]
[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -