सेवाव्रती: शिबानी जोशी
संभाजीनगर जिल्हा आणि आसपासच्या भागांमध्ये डॉ. हेडगेवार रुग्णालय आणि सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ या मोठ्या समाजसेवी संस्थांचं कार्य माहीत नाही, अशी एकही व्यक्ती आढळणे दुर्लभ आहे. १९८९ पासून या संस्थांमार्फत जवळजवळ ४०० ते ५०० गावांमध्ये शिक्षण, आरोग्य, महिला व बालविकास, शाश्वत विकास, जलसंधारण अशा क्षेत्रात खूप मोठं काम सुरू आहे आणि त्याची परिणिती सुद्धा समाजामध्ये दिसून येत आहे. जी महिला घराच्या बाहेर पाय टाकत नव्हती, ती आज संस्थेतर्फे प्रशिक्षित होऊन आत्मनिर्भर झाली आहे. आपलं कुटुंब चालवत आहे. शेतकरी आत्महत्या करत होता, तो आज स्वतःच्या पायावर उभा आहे. ज्या गावात पाण्याचे दुर्भिक्ष होतं तिथे जलसंधारणाच्या कामांमुळे डोळ्यांत पाणी न येता घरात पाणी मिळत आहे.
संस्थेने हाती घेतलेल्या कार्यातून अशी अनेक उदाहरणे आज पाहायला मिळत आहेत. संस्थेतर्फे सुरू असलेले सर्व कार्य सर्वांनाच एकत्रितपणे कळावं यासाठी आपली एखादी यंत्रणा उभारावी, असं संस्थेच्या मनात आलं आणि त्यातूनच “रेडिओ देवगिरी” या कम्युनिटी रेडिओची दोन वर्षांपूर्वी मंडळानं उभारणी केली. या संस्थांच्या माध्यमातून मुलांना संगणक प्रशिक्षण, महिलांना ब्युटी पार्लर किंवा शिवण्याचं प्रशिक्षण, शेतकऱ्यांना विविध प्रकारची प्रशिक्षणं दिली जात असतात. ही प्रशिक्षणं ऑनलाइन देता येतील. तसेच संस्थेच्या माध्यमातून यशस्वी झालेल्या महिला तसेच शेतकऱ्यांच्या यशोगाथा सर्वांपुढे मांडता येतील. आरोग्य क्षेत्रात रेडिओच्या माध्यमातून खूप जणांपर्यंत माहिती पोहोचवता येईल, तसंच संस्थेच्या कार्याचा लाभ घेतलेल्यांना पुन्हा संस्थेची जवळ जाता यावं आणि त्यांनाही एक व्यासपीठ उपलब्ध व्हावं, असा विचार करून रेडिओ देवगिरीची स्थापना करण्यात आली.
केंद्र शासनाने मोठ्या सामाजिक संस्था, ट्रस्ट, विद्यापीठ यांना त्यांच्या माहिती आणि कार्याचा प्रचार-प्रसार करण्यासाठीच कम्युनिटी रेडिओ हे माध्यम उपलब्ध करून दिले आहे. कम्युनिटी रेडिओ हा मुख्यत्वे मनोरंजनासाठी नसून प्रबोधनासाठी वापरला जातो आणि म्हणूनच अशा प्रकारचा कम्युनिटी रेडिओ सुरू करावा, असं मंडळानं ठरवलं आणि दोन वर्षांपूर्वी कम्युनिटी रेडिओची सुरुवात झाली. यासाठी आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावर कार्यरत असलेले आणि संस्कार भारतीचं काम करणारे लक्ष्मीकांत धोंड यांच्याशी संपर्क साधून अशी यंत्रणा उभारायचं ठरवलं. डॉ. दिवाकर कुलकर्णी हे या केंद्राचे प्रमुख आहेत. सविता कुलकर्णी, कचरू गरसोळे, आरती पाठक, सर्वेश गिरे, ऋचा कुलकर्णी, गायत्री देवडे अशा स्टाफच्या मदतीने ८ तास प्रसारण केलं जातं. संभाजीनगरमध्ये ज्या ठिकाणी आरोग्य सेवा पुरवली जाते, अशा लहुजी साळवे केंद्राच्या आवारातच तीन स्टुडिओची उभारणी करण्यात आली. एक रेकॉर्डिंग बूथ, दुसरा रेकॉर्डिंग स्टुडिओ आणि तिसरा स्टुडिओ उभारला गेला. रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये स्वतःच्या कार्यक्रमाव्यतिरिक्त इतरांनाही अत्यंत वाजवी दरात रेकॉर्डिंग करून हवं असेल तर ते करून देण्याची सोय करण्यात आली आहे. तसंच व्हीडिओ शूटिंग देखील करून दिलं जाते. कम्युनिटी रेडिओची १५ किलोमीटरची मर्यादा असते; परंतु हे कार्यक्रम जगभरात ऐकता यावेत यासाठी ॲप, यूट्यूब चॅनेल सुरू करण्यात आले आहे.
रेडिओ देवगिरीचं काम सकाळी चार तास आणि संध्याकाळी चार तास चालते. या कालावधीमध्ये संस्थेतून प्रशिक्षण घेऊन आपल्या पायावर उभ्या राहिलेल्या यशस्वी महिला, विद्यार्थी यांच्या मुलाखती तसेच काही विशेष कार्यक्रमांचं लाईव्ह टेलिकास्ट, प्रशिक्षण, आरोग्याबाबत जागरूकता व्हावी म्हणून सुप्रसिद्ध डॉक्टरांच्या मुलाखती आणि त्यांचे सल्ले असे कार्यक्रम प्रसारित केले जातात. वेगवेगळ्या विषयांवरचे तज्ज्ञ त्या त्या क्षेत्रातील माहिती देण्यासाठी रेडिओ देवगिरीवर येतात. उदा. संरक्षण दलातील एक तज्ज्ञ माहिती देऊन गेले, ती ऐकून तीन विद्यार्थिनींना आपण संरक्षण दलात जावं असं वाटलं आणि त्या दृष्टीने त्या आता प्रशिक्षण घेत आहेत. ते प्रशिक्षण घेण्यासाठीसुद्धा संस्था त्यांना मदत करीत असते. या गोष्टी छोट्या-छोट्या वाटल्या तरी त्यातून समाजामध्ये एक अंतरप्रवाह वाहू लागला आहे आणि हळूहळू त्याचे परिणाम दिसू लागतील, असं मंडळाला वाटते. ब्युटी पार्लरचा कोर्स मंडळामार्फत केल्यानंतर हे प्रशिक्षण घेणाऱ्या जवळजवळ ९० टक्के विद्यार्थ्यीनींना तिथल्याच कॅम्पस इंटरव्यूमधून नोकऱ्या लागल्या आहेत. त्यापैकी एका मुलीला फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये नोकरी लागली आहे. तिची यशोगाथा ऐकवल्यानंतर अनेक मुली आम्हालाही हे प्रशिक्षण घ्यायचं आहे, असं सांगण्यासाठी पुढे येतात. त्यामुळे अशा यशोगाथा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी रेडिओ देवगिरीचा चांगला उपयोग संस्थेला होत आहे.
अन्नपूर्णा या योजनेद्वारे महिलांना पदार्थ बनवण्याचे प्रशिक्षण दिले जाते. या ठिकाणी प्रशिक्षण घेऊन घरातून कधीही बाहेर न पडणाऱ्या एका महिलेनं बटाटा वड्यांचा व्यवसाय सुरू केला आणि आज ती ४० हजार रुपये महिना कमवत आहे. इतकच नाही, तर तिने तिच्या व्यवसायाची जाहिरात रेडिओ देवगिरीला दिली आहे. इतका तिचा उद्योग व्यवसाय आज नावारूपाला आला आहे. ही यशोगाथा ऐकल्यावर अनेक महिलांना त्यातून प्रोत्साहन मिळालं आहे. आपल्यासारखीच एक महिला अशाप्रकारचे यश मिळवू शकते हे पाहून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होत आहे. सकाळच्या सत्रामध्ये आरोग्यविषयक कार्यक्रम असतो. यात डॉक्टर हेडगेवार रुग्णालय तसेच अन्य रुग्णालयांतील डॉक्टर विविध विकारांची माहिती देण्यासाठी येतात. यात अगदी सर्दी पडशापासून कर्करोगापर्यंतच्या विकारांची सविस्तर माहिती आणि त्याच्यावरची उपचार पद्धती सांगितल्या जातात. याशिवाय योगाभ्यास, आयुर्वेद याचीही माहिती दिली जाते. त्यानंतर पर्यावरणावर आधारित कार्यक्रम सादर करून प्रदूषण, जलसंधारण याबाबतची जागरूकता निर्माण केली जाते. मराठवाड्यात पाण्याचा मोठा प्रश्न आहे.
पाण्याचे महत्त्व, पाण्याची बचत, पाण्याचा साठा, पाण्याचा योग्य वापर याची माहिती देऊन पाण्याचे महत्त्व लोकांसमोर अधोरेखित केले जाते. त्यानंतरचा एक कार्यक्रम म्हणजे मोठ्या व्यक्तींचे विचार “विचारधन” या कार्यक्रमातून ऐकवले जातात. यामध्ये श्री गुरुजींचे विचार, स्वामी विवेकानंद यांचे विचार सलग ऐकवले जातात. त्यानंतर पद्मश्रीसारखे उच्च पुरस्कार प्राप्त व्यक्तींच्या मुलाखतीही आवर्जून रेकॉर्ड करून त्या ऐकवल्या गेल्या आहेत. यात डॉक्टर हिम्मतराव बाविस्कर, दादा इदाते यांच्यासारख्या समाजकार्य करणाऱ्यांचा समावेश आहे. त्याशिवाय अर्थसंकल्प, १५ ऑगस्ट या दिवशी थेट प्रसारण सुद्धा केलं जातं. अर्थसंकल्पातील तरतुदी, फायदे, योजना यांची माहिती त्यामुळे गावोगावच्या श्रोत्यांना त्यांच्या स्वतःच्या रेडिओतून मिळते. एखाद्या कम्युनिटी रेडिओने अशा प्रकारचे थेट प्रक्षेपण करणे ही फारच दुर्मीळ गोष्ट आहे. अहमदनगर येथील सुप्रसिद्ध संत पारनेरकर महाराज यांच्या ग्रंथाला ७५ वर्षे झाली, त्यानिमित्ताने या ग्रंथातील प्रत्येक अध्यायावर अर्ध्या तासाचा कार्यक्रम करून तो प्रसारित केला होता. पारनेरकर महाराजांच्या जगभरातल्या शिष्यांनी तो ॲपद्वारे ऐकलाही होता. थोडक्यात रेडिओ देवगिरीचा उपयोग सामाजिक, शैक्षणिक, अाध्यात्मिक संतुलन समाजात राखावं यासाठीही केला जात आहे. याशिवाय ‘युनिसेफ’तर्फे देखील विविध सामाजिक विषयांवर प्रबोधन करणारे कार्यक्रम करायला सांगितले जातात, ते रेडिओ देवगिरी प्रक्षेपित करते.
‘बालविवाह’ या विषयावर नुकताच कार्यक्रम प्रसारित करण्यात आला होता. त्याशिवाय भारतीय शास्त्रज्ञांची ओळख अशी मालिका, महिलांना स्वसंरक्षणाचे धडे देणारा कार्यक्रम, विज्ञान कथांची मालिका, सण, उत्सव, व्रत या मागची वैज्ञानिक कारणं असे विज्ञाननिष्ठ कार्यक्रम सादर केले जातात. स्वेच्छा कार्यकर्ते जोडणे, संस्थेचे कार्य सर्वदूर पोहोचवणे आणि संस्थेचा सामाजिक आधार वाढवण्यासाठी प्रयत्न करणे हे मुद्दे नजरेसमोर ठेवून रेडिओ देवगिरीचे काम चालते. सध्या रेडिओ देवगिरी आठ तास प्रसारित होत आहे. ही वेळ वाढवून बारा तास करण्याचा मंडळाच्या दूरसंवाद विभागाचा विचार आहे. त्यामुळे जास्त कंटेंट लोकांना उपलब्ध करून देता येऊ शकेल. त्याशिवाय केवळ संभाजीनगर शहरापुरतच मर्यादित न राहता गावोगावी रेडिओ ऐकता यावा, यासाठी सुद्धा प्रयत्न सुरू आहेत. थोडक्यात काय तर सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ आणि त्यांच्या इतर सलग्न संस्थातर्फे सुरू असलेलं कामाचं महाजाल रेडिओच्या माध्यमातून सर्वत्र पोहोचवणं आणि त्याचा लाभ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न रेडिओ देवगिरीच्या माध्यमातून संस्था करीत आहे.