Thursday, July 25, 2024
HomeदेशAI : अरे देवा आता करायचे काय? ‘एआय’मुळे नोकऱ्यांवर गदा!

AI : अरे देवा आता करायचे काय? ‘एआय’मुळे नोकऱ्यांवर गदा!

पेटीएमने काढले तब्बल एक हजार कर्मचारी, अन्य बँका आणि विमा कंपन्यांमध्येही होणार मोठी कामगार कपात

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून एआय (AI) या तंत्रज्ञानाचे अनेक फायदे समोर येत आहेत. त्यामध्ये याच तंत्रज्ञानाचे काही तोटे देखील समोर येत आहेत. ‘एआय’ला भविष्यातले एक महत्त्वाचे तंत्रज्ञान म्हणून पाहिले जात आहे. प्रत्येक क्षेत्रातील काम ते पटापट करत आहे. मात्र एआय तंत्रज्ञानामुळे अनेकांच्या नोकऱ्यांवर गदा येणार आहे. डिजीटल पेमेंट कंपनी पेटीएमच्या (Paytm) तब्बल एक हजार कर्मचाऱ्यांना पेटीएमने कामावरून काढून टाकले आहे.

याबाबत पेटीएमने सांगितले की, कंपनीतील ऑपरेशन्स आणि मार्केटींग विभागातील कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आले आहे. ही कर्मचारी कपात ऑक्टोबर महिन्यापासून सुरू झाली आहे. कारण कंपनीला आता हे विभाग कर्मचाऱ्यांकडून नाही तर एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने चालवायचे आहेत. ज्यामुळे कामातील रिपीटेशन आणि अनावश्यक खर्च वाचणार आहे.

तसेच पेटीएमच्या प्रवक्त्याकडूव असे देखील सांगण्यात आले आहे की, या कर्मचारी कपातीमुळे कंपनीचा १० ते १५ टक्के खर्च वाचणार आहे. तसेच एआय एका कर्मचाऱ्याच्या तुलनेत कैक पटीने जास्त प्रभावी काम करते. एक कर्मचारी देऊ शकत नाही त्यापेक्षा जास्त कौशल्य एआयकडून कंपनीला अनपेक्षितपणे मिळणार आहेत. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून कामाच्याबाबतीत कुचराई करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे निरीक्षण करण्यात आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

दुसरीकडे पेटीएम ही कंपनी त्यांच्या नवनवीन व्यवसायाचा विस्तार करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे ते आगामी वर्षात तब्बल १५ हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणार आहे. त्यामध्ये भारतात देखील हा व्यवसाय वाढवला जाणार आहे. त्यामुळे कंपनी एकीकडे कामामध्ये पारंगत नसलेल्या आणि कुचराई करणाऱ्या कर्मचाऱ्यांची हकालपट्टी करत आहे. तसेच ती नवनव्या तरूण लोकांना भरती करण्याच्या देखील विचारात आहे, असेही यावेळी कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले.

दरम्यान, कार्यालयांत एआय माणसांच्या जागी काम करेल आणि माणसं बेकार होतील. जगात अनेक ठिकाणी आता मॉल्स, दुकाने, हॉस्पिटल्स, स्टुडियोमध्ये एआय तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकांना सेवा पुरवली जात आहे. एआयला भविष्यातलं एक महत्त्वाचं तंत्रज्ञान म्हणून पाहिलं जात आहे. प्रत्येक क्षेत्रात ते सामावलेलं आहे आणि कामं पटापट करत आहेत. आरोग्य, कला, माध्यम समूह, प्रशासकीय कार्यालये यांतील अनेक कामं वेगानं आणि अधिक कुशलतेनं करण्यात एआय पुढे येत आहे. रोजच्या जगण्यात लहानमोठे निर्णय घेण्यासाठीही लोक आता एआयवर भरोसा ठेवत आहेत. वारंवार तीच ती केली जाणारी कामे तसेच डाटा कलेक्शनमध्ये एआय ऑटोमेशनचा मोठ्या प्रमाणात वापर सुरू आहे. एकट्या अमेरिकेतच २०३० पर्यंत १२ लाख व्यावसायिक कामांचे स्वरुप बदलणार आहे.

प्रत्येक क्षेत्रात एआय तंत्रज्ञानाचा वाढता प्रभाव व प्रसार यामुळे मानवी आयुष्यच संकटात तर सापडणार नाही ना, हा प्रश्नही आता भेडसावत आहे. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे आपल्या नोकऱ्यांचं काय? असा प्रश्न आता सर्वच क्षेत्रातील कर्मचा-यांना पडला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -