मराठा समाजाचा तीव्र रोष
निफाड : महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापत असतांनाच येवला लासलगाव मतदार संघातील अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री छगन भुजबळ हे मराठा आरक्षण व जरांगे पाटील यांच्या विरोधात सातत्याने बेताल वक्तव्य करत मराठा समाजाच्या विरोधात गरळ ओकत असल्याने त्यांच्या विरोधात महाराष्ट्रातील व येवला लासलगाव मतदार संघातील मराठा समाजाचा तीव्र संताप बघायला मिळत आहे. त्याचाच परिपाक म्हणून आज दि.२५ डिसेंबर रोजी त्यांना त्यांच्याच मतदार संघातील नाशिक – छत्रपती संभाजीनगर महामार्गावर भरवस फाटा येथे मराठा समाजाच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागले. कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत मंत्री भुजबळ यांच्या भूमिकेचा निषेध केला.
मराठा आरक्षण मुद्द्यासह मराठा समाजाच्या विरोधात सातत्याने वादग्रस्त वक्तव्य केल्याने येवला लासलगाव मतदार संघात मंत्री छगन भुजबळ यांच्या विषयी मराठा समाजात रोष निर्माण झाला आहे. याचा फटका भुजबळ यांना मागील अतिवृष्टी बाधित क्षेत्र पाहणीच्या वेळी देखील आला होता. शेकडो पोलिसांचा ठिकठिकाणी बंदोबस्त असतानाही भुजबळ यांना मार्ग बदलावा लागला तर काही ठिकाणी त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले होते. मराठा समाजाच्या रोषामुळे त्यांना दौरा अर्धवट सोडावा लागला. म्हणून यावेळेस त्यांचा दौरा अत्यंत गुप्त ठेवण्यात आला होता. मात्र दौऱ्यावर येणार असल्याची कुणकुण मराठा आंदोलकांना लागताच डॉ. सुजित गुंजाळ, गोपीनाथ ठूबे, सुरेश ठूबे, प्रसाद फापाळे, अमित मुदगुल, प्रतीक फापाळे, विश्वजित आहेर, राजू भडांगे, सोमनाथ मुदगुल, सुनील चतुर, दीपक गीते, सुशांत भोसले, संतोष साळवे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते छत्रपती संभाजीनगर नाशिक महामार्गावर भरवस फाटा येथे जमा झाले व प्रचंड घोषणा देत मंत्री भुजबळ यांना काळे झेंडे दाखवले. तसेच भुजबळ गो बॅक अश्या घोषणा देण्यात आल्या. येणाऱ्या काळात मराठा समाज अजून आक्रमकतेने भुजबळांच्या विरोधात उभा ठाकणार हे स्पष्ट दिसून येत आहे. येवला लासलगाव मतदार संघात भुजबळांच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.