इव्हेंटचा फेस्टिव्हल

Share
  • मनातले कवडसे : रूपाली हिर्लेकर

कामावर वेळेत पोहोचण्याच्या घाईत घरातील कामं पटापट उरकत असतानाच दारावरची बेल वाजली. मनात म्हटलं आता कोण या अशा वेळी नेमकं आलं? जरा नाखुशीनेच दरवाजा उघडला तर माझी शेजारीण होती. म्हणाली, “२५ डिसेंबरला किनई आम्ही किट्टी पार्टी ठेवलीये. दरवेळी तुम्ही कामात असता असं सांगून येतच नाही. पण आता कुठलंही कारण चालणार नाही. कसलाही बहाणा नकोय. म्हणून तुम्हाला सुट्टी असतानाच आम्ही किट्टी पार्टी ठेवलेली आहे. तेव्हा तुम्हाला आता यावंच्च लागेल.” ‘च’वर भर देत ती म्हणाली.

मी म्हटलं, “संध्याकाळी कळवते.”

त्यावर ती म्हणाली, “संध्याकाळी सांगा किंवा सांगू नका. आम्हाला काहीच माहिती नाही. कारण तुम्हाला यायचंच आहे. किट्टी पार्टीसाठी आपण खास इव्हेंट ऑर्गनायझरला बोलावलेलं आहे. लहान मुलांसाठी स्पर्धा, लहान मुलांचे खेळ तसंच मोठ्यांचे गेम्स आणि मग डान्स पार्टी फाॅलोड बाय डिनर असा जबरदस्त बेत इव्हेंट ऑर्गनायझरने आखलेला आहे आणि तुम्ही येताय… बरोबर? आणि हो, यंदा आपण पर पर्सन एकेक हजार रुपये वर्गणी काढलेली आहे हं…” एवढं सांगून माझा होकार गृहीत धरून ती निघूनही गेली.

मी दरवाजा बंद केला. घड्याळात पाहिलं, तर मला बराच उशीर झालेला होता. मी पटापट एकदाची कशीतरी तयार होऊन निघाले. प्रवासात मी विचार करत होते की, एवढ्याशा खासगी किट्टी पार्टीसाठी एवढा मोठा इव्हेंट कशासाठी करणार आहेत? मग लक्षात आलं की सध्याचा जमानाच इव्हेंटचा आहे. आता एखादी गोष्ट सहजतेने घडत नाही, तर ती घडवून आणली जाते आणि यालाच तर म्हणतात ‘इव्हेंट मॅनेजमेंट.’ नामकरण विधी ते रिटायरमेंट डे, एवढंच नव्हे तर आजकाल दिवस कार्याचेही इव्हेंट्स करणारे आहेत. प्रत्येक गोष्ट साधी सोपी न करता त्याचं मोठ्या सोहळ्यात रूपांतर करणं म्हणजे इव्हेंट. हल्ली हल्ली तर इव्हेंट्स ऑर्गनायझेशनवाले प्री-वेडिंग शूट ते हनीमून असं पॅकेज देतात म्हणे. तरी बरं की कॅमेरा घेऊन तेही नवदाम्पत्यापाठी हनिमूनला जात नाहीत!

आता हळदी कुंकू हे पूर्वी सर्वसाधारणतः घराघरात साजरं केलं जाई आणि त्यात एक स्नेहभावना असे. पण आता महिला मंडळं, मोठमोठ्या संस्था व राजकीय पक्ष बायकांच्या हळदी कुंकवाच्या विनाकारण उठाठेवी करत असतात. पूर्वी स्त्रिया एकमेकींना भेटण्यासाठी, गप्पा मारण्यासाठी निमित्त म्हणून हळदीकुंकू करत. पण आजकाल हळदी कुंकू समारंभाला पैठणीचा गेम, गाण्यांची मैफल, अंताक्षरी, स्पर्धा, नृत्याचे अाविष्कार इत्यादींची जोड देऊन भव्य चढाओढीचं स्वरूप दिलं जातं. राजकीय पक्ष आपली मतं वाढावीत म्हणून सर्रास असे हळदी कुंकवाचे मोठ मोठे समारंभ आयोजित करतात. मध्यंतरी अशा एका समारंभात मी गेले होते तर तिथे हळदी कुंकू वगळता बाकी सर्व अगदी जोमाने सुरू होतं. मी सहजच एका मैत्रिणीला हटकलं की, अगं हळदीकुंकू कोण लावणार आहे? लवकर लावा. मला निघायचं आहे. तर तिने हसून सजवलेल्या स्टेजकडे बोट दाखवलं. तिथे पडद्यावर हळद व कुंकवाच्या रंगांची उधळण केलेली होती व हौशी महिला त्यासोबत सेल्फी काढून व्हर्च्युअली हळदीकुंकवात रंगून निघण्याचा आनंद घेत होत्या. त्यांच्या भन्नाट कल्पकतेला दाद देत तो मोह आवरून मी तिथून तत्काळ निघाले.

प्रत्येक शहरात, गावात गल्लोगल्ली आजकाल फेस्टिव्हलही होतात. थंडीच्या दिवसात तर फेस्टिव्ह सीझनमध्ये इव्हेंटचा अक्षरशः पाऊस पडतो. आज काय तर नवी मुंबईचा फेस्टिव्हल, उद्या कुठे तर मुंबईचा फेस्टिव्हल, मग रायगडचा फेस्टिव्हल, मग कुठे अलिबागचा फेस्टिव्हल… असे वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळे फेस्टिव्हल्स मोठ्या जागा बघून तिथे आयोजित केले जातात. विशेष म्हणजे यात सामाजिक व सांस्कृतिक भानही जपलं जातं म्हणे. म्हणजे नेमकं काय? हे मला आजवर कळलेलं नाही. कोणाला कळलं तर जरूर कळवा! मात्र यात स्त्रियांना आवडणारी कॉस्मेटिक्स ज्वेलरी, लहान मुलांची खेळणी, गेम्स, फनफेअर, घरातील उपयोगी वस्तू व खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लावले जातात. प्रत्येक ठिकाणाच्या संस्कृतीचं चुटकीसरशी दर्शन घडवणारे हे फेस्टिव्हल्स पाहण्यासाठी लोकांची तुडुंब गर्दीही उसळते. एकाच ठिकाणी कलात्मक वस्तू आणि खाद्य संस्कृतीसोबत मनोरंजनाची मजा घेण्यासाठी लोक तिथे येतात. या फेस्टिव्हल्समुळे कधी कधी अवाढव्य खरेदी होऊन खिशाला अवाजवी खर्चाची कात्रीही लागते हा भाग वेगळा. पण भारतातील विविध भागांतील परंपरा व संस्कृतींची आपल्याला जवळून ओळख होते. मोठमोठ्या ब्रँडेड कंपन्या एखाद्या मॉल किंवा मोठ्या मैदानात पूर्ण सेटअप लावून भव्य इव्हेंट्स आयोजित करतात आणि आपल्या उत्पादनांची भरपूर जाहिरात करतात. अर्थातच आपल्या वस्तू विकल्या जाण्याकडे त्यांचा कल असतो. एकीकडे असे काही फायदे आहेत पण अनावश्यक खर्च ही याची दुसरी बाजू आहे. व्यक्ती, कुटुंब व समाजाला जोडणारा दुवा म्हणून केलेलं आयोजन स्वागतार्हच ठरेल. पण इव्हेंट्सच्या बडेजावापुढे भावनांचं व्यापारीकरण होता कामा नये. मनुष्यबळाची कमतरता, नियोजनाचा अभाव, विस्कळीतपणा यावर मात करण्यासाठी इव्हेंट्स फायदेशीर उपाय आहेत. यानिमित्ताने दूर गेलेले लोक एकत्र येऊन आनंदाने तो क्षण साजरा करतात हेही तितकंच महत्त्वाचं आहे. इव्हेंट्समुळे प्रत्येकाला असा आनंद व समाधान मिळत असेल, तर इव्हेंट सार्थकी लागेल असं म्हणता येईल.

Recent Posts

KKR vs GT, IPL 2025: गुजरातविरुद्ध घरच्या मैदानावर कोलकत्त्याचा लाजिरवाणा पराभव

कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…

32 minutes ago

उबाठाला राणेंचा दणका! सिंधुदुर्गात होणार १५०० कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश!

२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…

1 hour ago

ही कणकवली नव्हे, कुडाळ आहे! निलेश राणे यांच्याशी पंगा नको!

माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…

2 hours ago

नाल्यातून गाळ काढताना ३० सेकंदाचा व्हिडीओ कंत्राट कंपनीला बंधनकारक

लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…

2 hours ago

PM Modi : आजची धोरणं, उद्याचं भारत! – पंतप्रधान मोदींचा नागरी सेवकांना मंत्र

PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…

2 hours ago