Tuesday, October 8, 2024
Homeताज्या घडामोडीLPG Cylinder price : 'थर्टी फर्स्ट'साठी हॉटेलवाल्यांना होणार नफा; सिलेंडर झाले स्वस्त!

LPG Cylinder price : ‘थर्टी फर्स्ट’साठी हॉटेलवाल्यांना होणार नफा; सिलेंडर झाले स्वस्त!

घरगुती सिलेंडरच्या किंमतीत काय बदल?

मुंबई : तेल विपणन कंपन्यांकडून दर महिन्याच्या एक तारखेला एलपीजी सिलेंडरच्या (LPG Cylinder) किमतींमधील बदल जाहीर केला जातो. यंदा मात्र नववर्षाच्या (New year) आधीच व्यावसायिक सिलेंडरच्या (Commercial gas cylinder) किंमती कमी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ३१ डिसेंबरला पार्टीसाठी हॉटेल, रेस्टोरंट्सवाल्यांना येणार्‍या जेवणाच्या ऑर्डर्समधून त्यांचा नफा वाढणार आहे. नव्या अपडेटनुसार, १९ किलोंच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या ग्राहकांना प्रत्येक सिलेंडरवर सुमारे ४० रुपयांचा नफा मिळणार आहे. तर घरगुती एलपीजी सिलेंडरच्या बाबतीत, किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.

सरकारी तेल विपणन कंपन्यांनी म्हणजेच, OMC ने १९ किलो LPG सिलेंडरची किंमत ३९.५० रुपयांनी कमी केली आहे. नवीन किंमती आजपासून म्हणजेच २२ डिसेंबरपासून लागू झाल्या आहेत. बदलानंतर एलपीजी सिलेंडरची किंमत मुंबईत सर्वात स्वस्त आहे, तर चेन्नईच्या ग्राहकांना सर्वाधिक किंमत मोजावी लागणार आहे.

३ महिने सातत्याने वाढत होत्या किंमती

यापूर्वी व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमती सातत्याने वाढत होत्या. गेल्या ३ महिन्यांत त्यांच्या किंमतीत तीनदा वाढ करण्यात आली होती. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या दिवशी, १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरांत प्रत्येकी २१ रुपयांनी वाढ करण्यात आली होती. त्यापूर्वी नोव्हेंबर महिन्यात त्यांच्या किमती १०१ रुपयांनी आणि ऑक्टोबर महिन्यात २०९ रुपयांनी वाढल्या होत्या.

काय आहेत चार महानगरांमधील नव्या किंमती?

किंमतीत घट झाल्यानंतर, मुंबईत व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत आजपासून १,७१०रुपयांवर आली आहे, तर चेन्नईमध्ये प्रभावी किंमत १,९२९ रुपयांपर्यंत खाली आली आहे. त्याचप्रमाणे, आता दिल्लीत किंमत १,७५७ रुपये आणि कोलकातामध्ये १,८६८.५० रुपये झाली आहे.

घरगुती सिलेंडरच्या किंमतीत बदल नाही

एकीकडे व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतींमध्ये सातत्याने बदल पाहायला मिळत आहेत. तर तेल कंपन्यांनी १४ किलोग्रॅम वजनाच्या घरगुती सिलेंडरच्या किंमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. IOCL च्या अधिकृत वेबसाईटनुसार, दिल्लीत घरगुती सिलेंडर ९३० रुपयांना, कोलकात्यात ९२९ रुपयांना, मुंबईत ९०२.५० रुपयांना आणि चेन्नईत ९१८.५० रुपयांना उपलब्ध आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -