राजे निजाम सरकारांच्या पदरी राजे रायबहादूर शंकरराव नावाचे एक जहागीरदार होते. सहा लक्षांची त्यांची जहागिरी होती. घरात सारी सुखे अनुकूल होती. धन-धान्य, संपत्ती विपुल होती. कशाचीही काही कमतरता नव्हती. मात्र शंकररावांना ब्रह्मसमंधाची बाधा झाली होती. त्यामुळे त्यांना चैन पडेना. रात्रंदिवस ते तळमळत असत. नाना उपाय केले, पण फायदा झाला नाही. शरीर सुकले, अन्नपाणी गोड लागेना. अनेक अनुष्ठाने, दान-धर्म केले. पण फायदा झाला नाही.
गाणगापुरात जाऊन दत्तसेवा करावी, त्यामुळे तरी फायदा होईल असे त्यांना वाटले. तो विचार मनात येताच ते तत्काळ गाणगापुरात आले. स्वतः अनुष्ठानास बसले. बाधा टळावी म्हणून दत्तचरणी प्रार्थना केली. शंकररावांना अनुष्ठान करता करता तीन महिने झाले. पण ब्रह्मसमंधाची बाधा काही टळली नाही. एके दिवशी रात्री त्यांना स्वप्न पडले. स्वप्नात त्यांना दृष्टांत झाला की, “तुम्ही तत्काळ अक्कलकोटला जा. तिथे जाऊन श्री स्वामी समर्थांची सेवा करा. तुमची बाधा नक्की दूर होईल.” श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाला शंकरराव आपल्या पत्नीसह गेले, तेव्हा तेथे त्यांना भक्तांची मोठी जत्राच भरलेली दिसली. या गर्दीत आपला काही निभाव लागणार नाही याची त्यांना खात्री पटली. श्री स्वामींच्या सेवेकऱ्यांमध्ये सुंदराबाई ही मुख्य होती. तिची गाठ घेऊन शंकररावांनी आपले गाऱ्हाणे मांडले. सुंदराबाई म्हणाली, “स्वामींनी जर तुम्हाला या व्याधीतून मुक्त केले, तर तुम्ही दोनशे रुपये द्याल का?”
सुंदराबाईंच्या मनातील लोभ शंकररावांनी ओळखला. ते म्हणाले, “दोनशे काय, मी हजार रुपये देईन. मात्र माझी व्याधी दूर करा.” शंकररावांचे बोलणे ऐकून सुंदराबाई चकित झाली. तिने तत्काळ श्री समर्थांची भेट घालून दिली. शंकररावांनी त्यांच्या पायांवर डोके ठेवून आपली व्यथा सांगितली.
शंकररावांचे बोलणे ऐकून श्री स्वामी तत्काळ तेथून उठून भराभर चालू लागले. सारे सेवेकरी चकित झाले. त्यांच्या मागे मागे जाऊ लागले. श्री स्वामी समर्थ वेगाने चालत गावाबाहेर आले. शेख नूरच्या दर्यासमोर येऊन, तेथून यवनांच्या स्मशानभूमीत येऊन एका खड्ड्यात उपरणे टाकून झोपले. सारे सेवेकरी महाराजांची ती कृती कुतूहलाने बघत होते. एक सेवेकरी शंकररावांना म्हणाला, “महाराजांची लीला अगाध आहे. त्यांनी तुमचे मरण चुकवले.” थोडा वेळ तिथे झोपल्यानंतर महाराज तेथून उठले आणि चालू लागले.
शंकररावांनी त्या दिवशी सर्वांना जेवण दिले आणि शेखनूरांच्या दर्ग्यावर कफनी चढवली. महाराजांनी मग शंकररावांना रोज निंबपत्राचे औषध खायला सांगितले. अवघ्या दहा दिवसांत शंकररावांची व्याधी नाहीशी झाली. त्यांच्या प्रकृतीत आराम पडला आणि ते बरे झाले. आपल्या गावी परतल्यावरही त्यांना ब्रह्मसमंधाचा काहीच त्रास झाला नाही. प्रत्यक्ष परमेश्वराचाच आशीर्वाद मिळाल्यावर आणखी काय हवे? शंकररावांची श्री स्वामीचरणी भक्ती जडली ती कायमचीच. बघता बघता काही महिने लोटले. शंकरराव आता श्री स्वामी समर्थांच्या कृपेने ठणठणीत झाले होते. आपण हजार रुपये देण्याचे वचन दिले आहे, याची शंकररावांना पूर्ण आठवण होती. एकदा ते पुन्हा श्री समर्थांच्या दर्शनासाठी अक्कलकोटला गेले. तेव्हा श्री स्वामींना ते १००० रुपये देणार असल्याचे सांगितले. तेव्हा श्री समर्थांनी त्यांना आज्ञा दिली की, गावाबाहेरच्या मारुतीच्या मंदिराशेजारी तुम्ही त्या पैशातून चुनेगच्ची मठ बांधावा. सेवेकऱ्यांच्या सोबत जाऊन ते गावाबाहेरच्या मारुती मंदिराशेजारची जागा बघून आले. परत आल्यावर शंकरराव समर्थांना म्हणाले, “महाराज, आपण म्हणता ती जागा खूप लांब आहे. तेथे वस्तीही नाही. एवढ्या लांब कशाला? आपण गावातच मठ बांधू!”
पण श्री स्वामींनी तेथेच मठ बांधायची आज्ञा दिली. शेवटी समर्थांच्या इच्छेनुसार शंकररावांनी गावाबाहेरच्या मारुती मंदिराजवळ चुनेगच्ची मठ बांधून दिला. पुढे त्या मठाला खूप प्रसिद्धी मिळाली आणि शंकररावांची कीर्ती अमर झाली.
अक्कलकोटी उभा औदुंबर।
प्रेम करे त्यावर सारे चराचर॥१॥
मनात येता तुझीच भक्ती।
अंगात येई हत्तीची शक्ती॥२॥
मिळे भक्ता भरपूर शक्ती।
तुझ्या कृपेची ती नवशक्ती ॥३॥
अजान बाहू तू खरा ईश्वर।
दाखविल्या तव लीला आरपार॥४॥
तुझे अस्तित्व मूर्ख न जाणे।
तुझ्या कृपेचे गूढ ते जाणे॥५॥
तुझ्याच अभक्तांचे देणे घेणे।
नाम घेता हरसी दुःख तेणे॥६॥
असा तू अक्कलकोटीचा देव।
जणू कैलासाचा प्रसन्न देव ॥७॥
तुझे नाम घेता प्रसन्न गणेश।
खुश होती सारे ईश॥८॥
तुझी भक्ती हीच शक्ती।
दुबळ्याला मिळे बहुत शक्ती॥९॥
तू सर्व देवांचा महादेव।
वंदन करिती सारे देव॥१०॥
कुणी करिती कुटील निती।
तव द्रव्याचा लोभ दाविती॥११॥
मिथ्या भक्तीचा आव आणिती।
कृपा न मिळे बिलकुल प्राप्ती॥१२॥
मनापासूनी तुला जे पुजती।
त्यांना न भय कधी ना भीती ॥१३॥
पुण्य मार्ग तेच जाती।
जे दिनरात स्वामी महती गाती ॥१४॥
शंकररावे केली भक्ती
स्वामी प्रदान केली शक्ती॥१५॥
स्वामी ब्रह्मसमंध पळविती
शंकराव संसारी सुखी होती॥१६॥
आनंदे गावात मंदिर बांधती
सर्व भक्त खुश होती॥१७॥
ज्यावरी स्वामी कृपा होई
पुनर्जन्मात पुण्यवान होई॥१८॥
vilaskhanolkardo@gmail.com
पुणे : शिवनेरी किल्ल्यावर पुन्हा एकदा पर्यटकांवर मधमाशांनी हल्लाबोल केला आहे. या हल्ल्यात १६ जण…
व्हॅटिकन सिटी : रोमन कॅथलिक चर्चचे २६६ वे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी ८८…
महिलांना त्यांच्या पायांचे सौंदर्य वाढवण्यासाठी अँकलेट परिधान करायला फार आवडते. विवाहित महिलांसोबतच अविवाहित मुलींनाही अँकलेट…
मुंबई : लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्सने ‘देवमाणूस’मधून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले…
बंगळुरू : कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक अर्थात माजी डीजीपी ओम प्रकाश यांची राहत्या घरातच हत्या…
मुंबई : कोणे एके काळी राष्ट्रपती पुरस्कार विजेता ठरलेला पोलीस अधिकारी आता जन्मठेपेची शिक्षा भोगणार…