लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपाप्रणीत एनडीएला टक्कर देण्यासाठी काँग्रेस आणि इतर पक्षांच्या इंडिया आघाडीने पुन्हा एकदा जोरदार तयारी सुरू केली आहे. पाच राज्यांच्या निवडणुकांच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाला एकट्याने हरवू शकत नाही याची जाणीव झाल्यानंतर, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या तीन राज्यांत सपाटून मार खाल्लेल्या काँग्रेसला आता इंडिया आघाडीची आठवण झाली आणि दिल्लीत इंडिया आघाडीच्या बैठकीचे आयोजन केले. ७ डिसेंबर रोजी काँग्रेसने बैठक बोलवली होती; परंतु त्याला अनेक जणांनी येण्यासंदर्भात तयारी दाखवली नाही. त्यामुळे ती बैठक रद्द करण्याची नामुष्की आली होती. पुन्हा एकदा काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सर्वांना फोनाफोनी करून मंगळवारी इंडिया आघाडीची दिल्लीत बैठक बोलावली. तसे पाहायला गेले तर ही चौथी बैठक आहे. तरी, २८ छोट्या-मोठ्या पक्षांचा सहभाग असलेल्या या बैठकीत इंडिया आघाडीचा ना समन्वयक, ना पंतप्रधान पदाचा चेहरा आणि ना जागा वाटपासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली.
नवी दिल्लीतल्या अशोका हॉटेलमध्ये झालेल्या इंडिया आघाडीच्या सर्व नेत्यांच्या बैठकीनंतर पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल यावर सहमती होईल, असा कयास बांधला जात होता; परंतु या बैठकीत या संबंधावर सर्व सहमतीचा भाग सोडा; परंतु फक्त विषय काढून सोडावा तशी चर्चा झाली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून मल्लिकार्जुन खरगे यांचे नाव सुचवले. त्या प्रस्तावाला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अनुमोदन दिले खरे. पण, बैठकीत त्यावर पुढे कोणी बोलायला तयार नव्हता. याचा अर्थ खरगे हा मोदी यांच्याविरोधात इंडिया आघाडीचा चेहरा असावा, असे बहुतांशी पक्षांच्या नेत्यांना वाटत नव्हते, हे बंद बैठकीतील कटू सत्य होते. झाकली मूठ सव्वा लाखाची असे म्हणतात त्याप्रमाणे, खरगे यांनी आपण सध्या इच्छुक नाही. इंडिया आघाडी बहुमताने निवडून येऊ द्या त्यानंतर बघू, असे बैठकीत सांगून त्यांनी या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर सक्षम पर्याय उभा करण्याचे कडवे आव्हान काँग्रेस आणि सर्व विरोधी पक्षांसमोर आहे. त्याचे कारण जनतेच्या मनात नरेंद्र मोदी यांच्याबद्दल निर्माण झालेली प्रतिमा पुसून काढणारा एकही नेता सध्या विरोधी पक्षात नाही, हे सत्य विरोधक नाकारत नाहीत. त्याचा प्रत्यय राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या तीन राज्यांत आला. भाजपाकडून तीनही राज्यांत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा समोर नसतानाही केवळ नरेंद्र मोदी यांच्या नावावर भाजपाला एकहाती सत्ता आणता आली. त्यामुळे विरोधी पक्षातील नेतेमंडळी आणखीनच धास्तावली आहेत. इंडिया आघाडीतील बैठकीत उपस्थित झालेल्या नेत्यांकडे पाहिले तर जणू दबावाखाली ते एकत्र आले असावेत, असा संदेश जनतेत गेला आहे. तीन तासांची बैठक झाली; परंतु त्या बैठकीत ठोस काही ठरले नसल्याचे दिसून आले. एरव्ही बैठकीनंतर जी पत्रकार परिषद घेतात, त्यात सर्व नेतेमंडळी जातीने हजर असतात.
खरगे यांच्या पत्रकार परिषदेला उद्धव ठाकरे, एम. के. स्टॅलिन, नितीशकुमार, लालू यादव, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, अखिलेश यादव, मेहबुबा मुफ्ती यांच्यापैकी कुणीच थांबले नाहीत. या नेत्यांची पत्रकार परिषदेच्या मंचावरील अनुपस्थिती ही बैठक खरंच सकारात्मक झाली का? हा प्रश्न विचारण्यास नक्कीच वाव आहे. संसदेत विरोधी पक्षाच्या खासदारांना केलेल्या निलंबनाविरोधात इंडिया आघाडी २२ डिसेंबरला देशभरात निदर्शने करणार असल्याचे खरगे यांनी जाहीर केले. मग एवढंच ठरवायचे होते तर काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतच्या नेत्यांना एका छताखाली आणायची काय गरज होती. एकमेकांना फोनाफोनी करून किमान एवढे आंदोलन, दिशा ठरवता आली असती.
इंडिया आघाडीचा घाट कशासाठी घालण्यात आला आहे, असा प्रश्न घमेंडीयांच्या कळपात सामील झालेल्या राजकीय पक्षांना आता वाटू लागला असावा. कारण २८ घोड्यांच्या या रथाचा सारथी कोण हाच प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहे. त्यात एकमेकांच्या विरोधात काही राज्यात उभे असलेल्या या पक्षांना इंडिया आघाडीत सहभाग होऊन कोणत्या जागा पदरांत पडणार यावरून संशयाचे वातावरण आहे. त्यामुळे जागा वाटपाचा मोठा तिढा कसा सोडणार हा प्रश्न विरोधकांपुढे आहे. पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असणार याकडेही सर्वांचे लक्ष लागलेले असले तरी, या मुद्द्यावरून माध्यमांच्या प्रश्नांना बगल देण्याचा प्रयत्न मल्लिकार्जुन खरगे यांनी पत्रकार परिषदेत केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, आधी आम्हाला जिंकून यावे लागणार आहे.
जिंकण्यासाठी काय करायचे आहे, याचा विचार करावा लागेल. पंतप्रधान कोण होणार ही नंतरची गोष्ट आहे. खासदारच नाही आले तर पंतप्रधान ठरवून काय फायदा? त्यामुळे आधी आम्ही संख्या वाढवण्याकरिता एकत्रितपणे लढून बहुमत आणण्याचा प्रयत्न करू, असे खरगे सांगतात. त्यातून, मोदी यांच्यासमोर पर्यायी चेहरा देण्याचे धाडस विरोधी पक्ष दाखवत नाहीत. मोदी आणि विरोधी पक्षांतील नेत्याच्या चेहऱ्याची चर्चा झाली, तर दोघांमध्ये तुलना होईल का? अशी भीती विरोधकांना वाटत आहे. त्यामुळे इंडिया आघाडीत पंतप्रधानपदाचे स्वप्न बाळगून गुडघ्याला बाशिंग बांधणारे अनेक नेते आहेत. पण, या नेत्यांना आज मोदींसमोर तगडा पर्याय म्हणून नाव घेतले जावे, अशी आज तरी परिस्थिती नाही, हे वास्तव बहुधा ठाऊक असावे.