- क्राइम : अॅड. रिया करंजकर
शारदाबरोबर सुशील वेगळा राहत असताना तिथेही तिचे नखरे काही कमी होत नव्हते. घरात माणसे नव्हती तरी ती विनाकारण सुशीलला त्रास देऊ लागली. त्याला सतत धमकी देऊ लागली. म्हणून दोन्ही घरांतील लोकांनी निर्णय घेऊन दोघांचा समजुतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.
एक वेळ चायनाचा माल टिकेल. पण आजकाल लग्न टिकणे म्हणजे तारेवरची कसरत झालेली आहे. क्रिमिनल मॅटरपेक्षा कोर्टामध्ये घटस्फोट मॅटर जास्त प्रमाणात येऊ लागलेले आहेत.
सुशील आणि शारदा यांचं अरेंज मॅरेज होतं. घरच्यांनी बघून, पद्धतशीर रितीरिवाजाप्रमाणे त्यांचं लग्न केलेलं होतं. सुशील हा प्रायव्हेट कंपनीमध्ये कामाला होता तसेच शारदा ही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करत होती. लग्नानंतर हनिमूनसाठी ते जम्मू-काश्मीरला फिरायलाही गेले. फिरून आल्यानंतर त्यांच्या संसाराला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. पण शारदा सुशीलच्या घरातील कोणत्याच लोकांशी पटवून घेत नव्हती. छोट्या-छोट्या कारणांसाठी सतत ती माहेरी जाऊन राहत होती. म्हणून घरातल्याच लोकांनी त्यांना वेगळे राहण्याचा सल्ला दिला, तर ती स्वतःहून म्हणाली की, “मला सर्व सामान नवीन पाहिजे आणि वेगळं राहण्याचे जमलं तर जमलं, नाहीतर पुन्हा मी माझ्या आई-वडिलांकडे जाईन.”
सुशीलने तरीही एवढी मोठी रिस्क घेतली. संसाराला लागणारे सर्व सामान त्याने नवीन घेतलं आणि शारदाबरोबर तो वेगळा राहू लागला. शारदाबरोबर सुशील वेगळा राहत असताना तिथेही तिचे नखरे काही कमी होत नव्हते. घरात माणसे नव्हती तरी ती विनाकारण सुशीलला त्रास देऊ लागली. “तू मला त्रास देतोस म्हणून मी तुझ्यावरही केस टाकेल. तुझ्या घरातल्या लोकांवर केस टाकेन”, असं त्याला सतत धमकी देऊ लागली. म्हणून दोन्ही घरांतील लोकांनी निर्णय घेऊन दोघांचा समजुतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. कोर्टामध्ये त्यांचा घटस्फोट झालाय.
एक वर्ष थांबल्यानंतर दोघेही दुसऱ्या लग्नाचा विचार करू लागले व सुशीलचे कुटुंब मुलगी शोधू लागले तसेच शारदाचेही कुटुंब मुलगा शोधू लागले. शारदाला कधी टकला मुलगा यायचा, तर कधी दुसरेपणाचा नवरा मुलगा असायचा, तर कधी दोन मुलं असलेला असा मुलगा लग्नासाठी मिळत होता. तसेच सुशीलचेही झाले होते. ज्या मुली यायच्या त्याच्यात घटस्फोटित मुलगी असायची, विधवा मुलगी असायची किंवा तिला एक मूल असलेली मुलगी अशा वधू त्याला चालून येत होत्या. दोघांचेही घटस्फोट झालेले असल्यामुळे त्यांच्या पुनर्विवाहासाठी त्यांना असेच वधू आणि वर चालून येत होते. वधू आणि वर हे दोघांच्या वयापेक्षा मोठे येत होते. त्या दोघांनी निर्णय घेतला की, असे लग्न करण्यापेक्षा न केलेलं बरं आणि असेच राहिलेले बरे असा त्यांनी शेवटचा निर्णय घेतला.
शारदाने विचार केला. आपल्याला दोन मुलांचे बाप घटस्फोटित विधुर अशी मुलं का येत आहेत, आपण एवढी मोठी चूक काय केलेली आहे? त्यात तिच्या कुटुंबाकडून तिला उत्तरे मिळत होती, ‘कारण, तूही एक घटस्फोटित आहे. त्यामुळे तुला अशीच मुलं मिळणार आहे.’ तेव्हा दोन्ही घरांच्या लोकांनी विचार केला की, यांना घटस्फोटित विधवा विधुर अशीच वधू आणि वर येत असतील, तर या दोघांना समजावून यांचं दोघांचं पुन्हा लग्न लावून दिलं, तर काय वाईट आहे का? असा त्यांच्या घरातील लोकांनी विचार केला व हा निर्णय दोघांनाही सांगितला. त्यावेळी दोघांनी विचार करून तो त्यांना पटला आणि आपण घटस्फोट घेऊन फार मोठी चूक केली, याची जाणीव सुशील आणि शारदा यांना झाली.
वडीलधाऱ्यांच्या संमतीने त्यांनी पुन्हा एकदा एकमेकांबरोबर विवाह केला. शारदाला आपली चूक आता कळालेली होती आणि ती आता आपल्या कुटुंबांबरोबर व्यवस्थित राहत होती. एवढेच नाही, तर त्यांना एक वर्षाच्या आत एक सुंदर अशी गोड मुलगीही झाली. शारदा जर पहिल्याच लग्नाच्या वेळी अशी व्यवस्थित राहिली असती, तर तिला घटस्फोट घेण्याची वेळ आली नसती आणि घटस्फोट घेतल्यानंतर तिला वास्तविक परिस्थिती घटस्फोट स्त्रीची काय असते व सुशीला घटस्फोट पुरुषाचं लग्न जुळताना किती मुश्कील असतं, हे वास्तव समजलं. हे जर अगोदर समजलं असतं, तर त्यांना घटस्फोट घेण्याची गरजच नसती. या दोघांच्या ना समजुतीमुळे. त्यांच्या आई-कुटुंबाला अनेक समस्येला समोर जावं लागलं.
आज-काल लग्न म्हणजे भातुकलीचा खेळ झालेला आहे. दोन-दोन महिन्यांमध्ये संसार मोडत आहेत आणि हीच लोक दुसऱ्यांदा पुन्हा लग्नासाठी दुसरीकडे तयार होत आहेत.
(सत्यघटनेवर आधारित)