लेक…
जेव्हा निघालो घरूनी
हात तुझा धरूनी तेव्हा
नयनी दाटले आनंदाश्रू
गलबलले हृदयही तेव्हा…
बोल बोबडे ऐकुनी तुझे हे
अति हर्षूनी मीच जाई
अश्रू हळूच ढाळी
लपूनी तुझी गं आई…
शाळेत जाशी तूची
हो मोठी गे शिकुनी
यशश्री मिळवी ऐसी
मन येई उचंबळूनी…
शिकताची काळ गेला
कळलेच ना कधी ते
मोठी कधी तू झाली
बदलूनी विश्व गेले…
सनई चौघड्याचे आता
मंगल सूर येती कानी
आनंद सौख्य लाभो
तुज जीवनी भरूनी…
सय येई शैषवाची
तुझी साथ सोडवेना
अंतःकरण भरूनी येई
वाट अश्रूंसी ती मिळेना…
अगतिक माय-बाप
खळ नसेची त्यांचे डोळा
परके कसेची होती
देती गोड पोटीचाच गोळा…
– प्रवीण पांडे, अकोला
व्यायामाची महती…
थंडीचे दिवस
असतात किती छान
रोज सकाळी उठून
शरीर बनवूया बलवान
आळस आपला शत्रू
दूर त्याला सारा
ध्येय गाठण्यासाठी
झेलूया सकाळचा वारा
असो कितीही थंडी
नको तिचे लाड
सकाळी पांघरूण घेऊन
झोपायचे नाही गाढ
धावत-धावत मैदानाला
चकरा मारूया चार
शरीर बळकट होईल
घालता सूर्यनमस्कार
उत्साह आणि स्फूर्ती वाढते
सकाळच्या व्यायामामुळे
रोज न्याहारीला घेऊया
दूध आणि ताजी फळे
निरोगी शरीरात असते
सदा निरोगी मन
सुदृढ शरीरसंपत्ती
हेच आपले खरे धन
– रवींद्र व्ही. चालीकवार, महागाव, जि. यवतमाळ