सोने-चांदी हे प्रत्येक भारतीयाच्या घरामध्ये हमखासपणे पाहावयास मिळतेच. भारतात राहणारा मग तो कोणत्याही प्रांताचा, जाती-धर्माचा असो, सोन्याच्या आकर्षणापासून कोणीही अलिप्त राहिलेला नाही. सोने स्वस्त असो वा महाग, प्रत्येक जण आपल्या आर्थिक ऐपतीप्रमाणे सोन्याची खरेदी करतच असतो. त्यामुळे आर्थिक मंदी असो वा तेजी, सोन्याच्या बाजारपेठेमध्ये ग्राहकांची वर्दळ ही हमखासपणे पाहावयास मिळतेच. गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या दराने गगनभरारी मारण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये सोन्याचे भाव २४ कॅरेटचे ६१ ते ६३ हजारांच्या दरम्यान आहेत.
येत्या दोन-अडीच वर्षांमध्ये सोन्याचा भाव प्रतितोळा एक लाखाच्या आसपास जाणार असल्याचे सुवर्णाकारांकडून तसेच ज्वेलर्सच्या दुकानचालकांकडून सांगण्यात येत आहे. भारतीयांना सोन्याचे आकर्षण हे प्राचीन कालापासून राहिले आहे व आजही ते हजारो वर्षांनंतरही कायम आहे. त्यामुळे सोन्यासाठी भारत ही एक हक्काची बाजारपेठ मानली जात आहे. १९७० सालापासून सोन्याच्या दराचा अंदाज घेतल्यास दरवर्षी सोन्याच्या दरामध्ये महागाई वाढत असली, तर घेणाऱ्यांची संख्याही तितक्याच पटीने वाढल्याने उलाढालही वाढत गेली आहे. १९७० साली सोन्याचा दर हा १८४ रुपये होता. एक हजारामध्ये मजुरीसह पाच तोळे सोने खरेदी करता येत होते. अर्थात त्या काळी हजार रुपयांचे मूल्यही आजच्या काळात काही लाखांमध्ये आहे.
बाजारात सोन्याच्या दरामध्ये कितीही चढ-उतार झाला तरी महिलांची व पुरुषांची सोने खरेदीची हौस आणि ओढ किंचितही कमी झालेली नाही. दर कितीही वाढो, पै अन् पै साठवून थोडे-थोडे सोने गाठीला बांधण्याची परंपरा राहिली आहे. ती ६३ वर्षांपूर्वीही होती आणि आजही आहे. एकेकाळी महिलांच्या गळ्यामध्ये, हातामध्ये, कमरेवर, अगदी पायातल्या पट्ट्या, पैंजणही सोन्याचे असायचे. केवळ महिलांचीच सोने यामध्ये मक्तेदारी असायची. पण आता महिलांच्या मक्तेदारीला गेल्या दोन दशकांपासून पुरुषही शह देऊ लागले आहेत. गळ्यातील चेनचे वेगवेगळे प्रकार पुरुषांच्या प्रतिष्ठेमध्ये भर घालू लागले आहेत. एकेकाळी केवळ चेन तीही साधी असायची, पण आता चेनचेही वेगवेगळे प्रकार आढळतात. जाडसर पट्टा, काथ्या अशी विविध नावे चेनमध्ये येऊ लागली आहेत. तोच प्रकार अंगठ्यामध्ये व ब्रेसलेटच्या बाबतीत दिसून येत आहे. अंगठी ब्रेसलेट, चेन अंगाखाद्यांवर मिरविणे ही बाब अलीकडच्या काळात पुरुषांसाठीही प्रतिष्ठेची गोष्ट बनली आहे.
सोने दरात दरवर्षी वाढ होतच आली आहे. ७० वर्षांची सरासरी पाहता, दरवर्षी एक हजार रुपयाने दरवाढ दिसते आहे. पण सन २०१९ ते २०२० या दिवाळी काळातील दराचे अंतर पाहता ते उच्चांकी आहे. या वर्षी तब्बल १५ हजार रुपयांहून अधिक दरवाढ झाली आहे. मध्यंतरी ती २० हजारांच्या घरात गेली होती, पुन्हा दर उतरले. सोने दरात दरवर्षी वाढ दिसतेच आहे. मात्र अनेकदा अचानक मोठी दरवाढ झाली आणि पुन्हा ती मूळ पदावर येऊन स्थिरावले, असेही अनेकदा झाले आहे. १९७६ साली ५४५ रुपये असलेला दर १९७७ मध्ये ४८६ झाला. १९८१ ला १८०० वरून १९८२ मध्ये १६०० झाला. १९९२ मध्ये ४३०० रुपयांवरून १९९३ साली ४००० रुपये झाला. १९९६ मध्ये ५१०० वरून १९९७ साली ४७००, तर १९९८ ला ४००० झाला. २००० मध्ये तो ४४०० होता, तर २००१ साली ४३०० झाला. २०१२ साली ३२ हजारांवरून २९,६०० वर आला. २०१४ ला २८ हजारांवरून पुढच्या वर्षी २६,३४३ वर उतरला.
गेल्या काही वर्षांमध्ये सोने हे हौसेबरोबरच गुंतवणुकीसाठी विश्वसनीय ठरू लागले आहे. गुंतवणूकदारांना अन्य क्षेत्रांतील गुंतवणूक ही धोकादायक आणि तुलनेत कमी परताना देणारी वाटू लागली आणि सोन्यातील गुंतवणूक अधिक सुरक्षित. साहजिकच, सोने खरेदीकडे ओढा वाढणार हे स्पष्ट झाले आणि तेथूनच दरातील वाढीने वेग पकडला. पुढील २ वर्षांत हा वेग असाच राहू शकतो, असाही अंदाज आहे. छोट्या सोने खरेदीदारांचा ठेवीवरील व्याजाचे दर खाली आल्याच्या पार्श्वभूमीवर सोने खरेदीकडे कल वाढेल, असाही एक अंदाज आहे. सोन्याचे दर वाढत गेले तसे खरेदीचे प्रकारही बदलत गेले. तोळ्यांमध्ये खरेदी करणारे अगदी वन ग्रॅम कॉइनमध्येही खरेदी करण्यात उत्साह दाखवत गेले. गुढीपाडवा, दसरा, दिवाळीतील लक्ष्मीपूजन हे दिवस सोने खरेदीसाठी गेल्या काही शतकांपासून शुभ मानले जातात. या दिवशी प्रत्येकजण आपल्या ऐपतीनुसार सोन्याची खरेदी करत असतो.
विवाह समारंभाच्या कालावधीत सोने खरेदीच्या उलाढालीचा आलेख कमालीचा उंचावलेला असतो. गरिबातला गरीबदेखील आपल्या मुलीच्या अंगावर ४-५ तोळ्याचे दागिने असावेत, यासाठी मुलगी जन्माला आल्यापासूनच प्रयत्न करत असतो. वेळ पडल्यास तो पोटाला मारून गुंतवणूक करत असतो. मुलगी सासरी जाताना माहेराकडून तिच्या अंगावर दागिने असावेत, ही मुलीच्या माता-पित्याची इच्छा सोन्याच्या उलाढालीला खतपाणी घालत असते. मुलीसोबत जावयालाही अंगठी व चेन देण्याची त्याची मानसिकता त्यांचा खर्च वाढवित असते. मुलीचे लग्न एकदाच होते आणि सासरी मुलीला कोणी नावे ठेवू नये, यासाठी मुलीचे आई-वडील तिला अधिकाधिक दागिन्याने मढवून सासरी पाठवतात. भारतीयांचा सोने खरेदीला असलेली एक भावनिक ओलाव्याची आस आणि सतत सोनेदरात होत असलेल्या वाढीमुळे गुंतवणुकीचे विश्वासू खात्री म्हणून सोने खरेदीच्या उलाढालीला गेल्या काही वर्षांत पोषक वातावरण मिळाले आहे. सोन्याच्या दरात कितीही महागाई झाली तरी भारतीयांचे सोने खरेदीचे आकर्षण कमी होणार नसल्याने आमच्या व्यवसायाला मरण नसल्याचे ज्वेलर्सच्या व्यावसायिकांकडून सांगण्यात येत आहे.