
प्रसिद्ध बंगाली गायक अनुप घोषाल यांचे निधन
कोलकाता : प्रसिद्ध बंगाली गायक अनुप घोषाल (Anup Ghoshal) यांचं वयाच्या ७७व्या वर्षी कोलकाता (Kolkata) येथे निधन झालं. गेल्या अनेक दिवसांपासून वृद्धापकाळात आलेल्या आजारपणामुळे त्यांच्यावर दक्षिण कोलकात्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, काल दुपारी १.४० वाजता अनेक अवयव निकामी (Multiple Organ failure) झाल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.
अनुप यांच्या निधनाने कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. असंख्य चाहते आणि सेलिब्रिटी त्यांना सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली वाहत आहेत. अनुप यांच्या पश्चात दोन मुली आहेत. अनुप यांनी बंगाली, हिंदी, भोजपुरी आणि आसामी भाषांमध्ये अनेक गाणी गायली. सत्यजित रे यांनी संगीतबद्ध केलेली अनेक गाणी त्यांनी गायली होती. मात्र १९८३ मध्ये आलेल्या गुलजार दिग्दर्शित 'मासूम' या चित्रपटातील 'तुझसे नाराज नहीं जिंदगी' (Tuzse naraz nahin jindagi) या त्यांच्या गाण्याने देशभरातील श्रोत्यांची मनं जिंकली.
वयाच्या चौथ्या वर्षीच संगीताचे धडे
अनुप घोषाल यांनी वयाच्या चौथ्या वर्षांपासूनच संगीताचे धडे गिरवण्यास सुरुवात केली होती. पहिल्यांदा त्यांनी ऑल इंडिया रेडिओ, कोलकाताच्या मुलांचा कार्यक्रम शिशु महलसाठी गाणं गायलं होतं. काझी नजरुल इस्लाम, रवींद्रनाथ टागोर आणि आधुनिक बंगाली गाण्यांमध्ये अनुप यांनी प्रतिभा सिद्ध केली होती. १९ वर्षांचे असताना आपल्या जादुई आवाजाने त्यांनी सत्यजित रे यांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यांनी सत्यजित रे यांच्या ‘गुपी गायने बाघा बायने’ आणि ‘हिरक राजार देशे’ या चित्रपटांसाठी पार्श्वगायन केलं. दिग्दर्शक तपन सिन्हा यांच्या ‘सगीना महतो’ या चित्रपटातही त्यांनी गाणं गायलं होतं.
अनुप घोषाल यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. त्यांनी बंगाली, हिंदी, (Bollywood Songs) भोजपुरी आणि आसामी भाषांमध्येही अनेक गाणी गायली आहेत. अनुप यांच्या लोकप्रिय हिंदी गाण्यांमध्ये ‘मासूम’ चित्रपटातील ‘तुझसे नराज नहीं जिंदगी’, ‘हुस्न भी आप हैं, इश्क भी आप हैं’ आणि ‘तुम साथ हो जिंदगी भर के लिए’ या गाण्यांचा समावेश आहे.
राजकारणातही होते सक्रिय
त्यांच्या छोट्या राजकीय कारकिर्दीत, अनुप घोषाल यांना ममता बॅनर्जी यांनी २०११ मध्ये तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर उत्तरपारा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. ते तिथून जिंकले पण नंतर त्यांनी कोणतीही निवडणूक लढवली नाही.