
जाणून घ्या काय आहे देशभरातील हवामानाची स्थिती...
मुंबई : अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) संपूर्ण वातावरणच सध्या बदललल्याचं चित्र आहे. त्यात हिवाळ्याचा मोसम (Winter Season) सुरु झाल्याने मुंबईकरांना थंडी अनुभवायला मिळेल अशी आशा होती. मात्र, अजूनही मुंबईत जागोजागी शेकोट्या पेटलेल्या पाहायला मिळाव्यात इतकी थंडी पडलेली नाही. दक्षिण पूर्व अरबी समुद्रापासून उत्तर कोकण आणि गोवा किनारपट्टी भागात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा मुंबईच्या वातावरणासही (Mumbai Weather) कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे मुंबईकरांना अजूनही थंडीची प्रतिक्षा करावी लागणार आहे. तर उत्तर भारतात (North India) मात्र तीव्र थंडीची लाट आली असून अनेक पर्यटक या थंडीचा आनंद घेण्यासाठी गेले आहेत.
उत्तर कोकण आणि गोवा किनारपट्टी भागातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मुंबई आणि परिसरात आग्नेय दिशेकडून वारे वाहतील. हे वारे उबदार असतील आणि त्यामुळे तापमानात जास्त घट होणार नाही. १८ ते २० डिसेंबर दरम्यान, वाऱ्याची दिशा थोडी बदलण्याची शक्यता आहे. पण, शक्यतो महाराष्ट्राच्या हवामानात जास्त बदल होणार नसून तापमान कायम राहील, असा अंदाज आहे.
दुसरीकडे उत्तर भारतात मात्र तीव्र थंडीची लाट पाहायला मिळत आहे. काही भागात तापमान शून्याच्या खाली घसरलं आहे. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी होत असल्यामुळे नयनरम्य दृश्ये पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत आहे. पर्यटक सर्वत्र परसलेली बर्फाची चादर आणि गुलाबी थंडीचा आनंद घेताना दिसत आहेत. काश्मीर खोऱ्यात सध्या हाडं गोठवणारी थंडी आहे.
देशभरात काही ठिकाणी पावसाची शक्यता
आयएमडीच्या (IMD) अंदाजानुसार, देशभरात काही ठिकाणी आज पावसाची शक्यता आहे. लक्षद्वीपमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडू शकतो. तामिळनाडू, केरळ, किनारी कर्नाटक, किनारी आंध्र प्रदेश, पूर्व आसाम, अरुणाचल प्रदेश आणि नागालँडमध्ये हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच, सिक्कीममध्ये आज गारपीट होण्याची शक्यता आहे. पण, महाराष्ट्रात मात्र आज कोरडं आणि ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे. मुंबईसह महाराष्ट्रात या आठवड्यात तापमानात जास्त बदल होण्याची शक्यता नाही.