घुसखोरांमध्ये एका महिलेचाही समावेश
नवी दिल्ली : संसदेत (Parliament) हिवाळी अधिवेशन (Winter session) सुरु असतानाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संसद सुरक्षा धाब्यावर बसवत तीन अज्ञातांनी संसदेत घुसून स्मोक कँडल्स जाळून धूर केला. संसदेसारख्या ठिकाणी असा अनुचित प्रकार घडल्याने संसद सुरक्षा व्यवस्थेवर (Parliament Security System) मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या घटनेनंतर संसदेचे कामकाज थांबवण्यात आले आहे.
संसदेत लोकसभेचे कामकाज सुरु असताना तीन जण प्रेक्षक गॅलरीत बसले होते. या तिघांकडे स्प्रे आणि काही धूरसदृश्य वस्तू होत्या. काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी सांगितले की, दोन तरूणांनी प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उड्या मारल्या. त्यांनी काहीतरी फेकलं, ज्यामधून गॅस बाहेर येत होता. त्यांना खासदारांनी पकडलं आणि सुरक्षा रक्षकांनी त्यांना बाहेर काढलं. यानंतर सभागृहाचं कामकाज दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कामकाजादरम्यान घुसखोरी केलेल्या दोघांपैकी एकाचे नाव सागर असल्याचे सांगण्यात येत आहे. दोघेही खासदाराच्या नावाने लोकसभा व्हिजिटर पासवर आले होते. खासदार दानिश अली यांनी सांगितले की दोघे म्हैसूर येथील भाजप खासदार प्रताप सिन्हा यांच्या नावावर लोकसभा व्हिजीटर पास घेऊन आले होते. या घुसखोरांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे.