काँग्रेस पक्ष हा भ्रष्टाचाराबद्दल कुख्यात आहे. पण काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांच्या घरी प्राप्तीकर खात्याने ज्या धाडी टाकल्या आणि त्यांच्याकडे जी रोकड सापडली, त्यावरून आतापर्यंत झालेल्या सर्व भ्रष्टाचाराचा हे साहू महाशय बाप आहेत, हे स्पष्ट झाले आहे. या साहू महाशयांकडे तब्बल तीनशे कोटी रुपये सापडले असून इतक्या नोटा होत्या की, नोटा मोजण्यासाठी आणलेल्या मशीन्सही बंद पडल्या. काँग्रेसी भ्रष्टाचाराचे हे एक हिमनगाचे टोक आहे. संपूर्ण भ्रष्टाचार तर किती बाहेर येणार आहे, याचा अंदाज अजून कुणालाच नाही. साहू यांच्या घरी ज्या धाडी टाकल्या, त्यातील एकेक सत्य म्हणजे काँग्रेस पक्ष किती गळ्यापर्यंत बुडाला आहे, याचा नमुना आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे नेहमी पंतप्रधान मोदी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत असतात. पण आपल्या खासदाराच्या घरी सापडलेले हे घबाड पाहून राहुल यांची वाचाच बसली आहे. अर्थात धीरज साहू यांनी एवढा पैसा जमा करावा आणि त्यांच्याकडे इतकी संपत्ती सापडावी, यात काहीच नवल नाही.
ज्या पक्षाचे वरिष्ठ नेते राहुल आणि सोनिया गांधी यांची जेथे ‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरणात साडेसातशे कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे, त्या पक्षाच्या खासदाराच्या घरी ही रक्कम सापडावी, यात काहीच नवल नाही. ३०० लोकसभेच्या जागा जिंकण्यासाठी प्रत्येक मतदारसंघाला एक कोटी याप्रमाणे हा पैसा जमा करण्यात आला होता. आता काँग्रेस धीरज साहू यांच्या प्रकरणात आपले हात झटकत आहे. त्यांच्या या एवढ्या बेहिशोबी मार्गाने जमा केलेल्या कोट्यवधींच्या अवैध संपत्तीबाबत काँग्रेसचे तोंडच मिटले आहे. राहुल आणि सोनिया गांधी याबाबत मौन पाळून बसतील, कारण त्यांच्याकडे बोलण्यासारखे काहीच नाही. काँग्रेसला भ्रष्टाचार नवा नाही. या अगोदर सुखराम यांच्यासारखे नेते काँग्रेसचेच होते, ज्यांच्याकडे पैशाच्या राशी सापडल्या होत्या. पण साहू यांनी या सर्व भ्रष्ट नेत्यांवर मात केली आहे. साऱ्या राजकीय भ्रष्टाचाराचे आजोबा शोभावेत, असे हे साहू महाशय आहेत.
राहुल एकीकडे काँग्रेसला ‘मोहब्बत की दुकान’ असे म्हणत असतात, पण त्यांच्या पक्षाचे भ्रष्टाचाराचे हे भयानक दुकान असल्याचे उघड झाले आहे. हे पैसे मतदारांना वाटण्यासाठी गोळा केले होते. काँग्रेस आता ही संपत्ती आमची नाही, असे म्हणत हात झटकण्याचा प्रयत्न करत आहे. पण काँग्रेसला हे साहू महाशय हे गळ्यातील हड्डी बनले आहेत. भाजप द्वेषाने आंधळे झालेले शिवसेना उबाठासारखे काही पक्ष या भ्रष्टाचाराचेही निर्लज्ज समर्थन करतील. पण काँग्रेसचा खरा चेहरा हाच आहे, हे मतदारांच्या आणि अख्ख्या जगाच्या समोर आले आहे. धीरज साहू हे काँग्रेसचे खासदार आहेत आणि काँग्रेसने कितीही हात झटकले तरीही काँग्रेसच्या कपाळावर हा जो डाग लागला आहे, तो धुतला जाणार नाही.
लोकसभा निवडणुकीत कोणत्याही मार्गाने विजय मिळवायचा आणि त्यासाठी वाट्टेल ते मार्ग वापरायचे, हे काँग्रेसचे जुनेच तंत्र आहे. त्याचाच हा भाग आहे. खरे तर सार्वजनिक भ्रष्टाचाराची सुरुवात काँग्रेसच्या राजवटीत झाली होती. नेहरूंच्या काळात प्रतापसिंग कैरो नावाच्या पंजाबच्या मंत्र्यांनी लष्करासाठी खरेदी करण्यात यावयाच्या जीपमध्ये घोटाळा केला होता. तसे आरोपही करण्यात आले होते. त्याचा आज वटवृक्ष झाला आहे. काँग्रेस आणि भ्रष्टाचार यांचे संबंध अगदी अनादी काळापासून आहेत, खुद्द दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचे नाव ‘बोफोर्स’ प्रकरणात आले होते. त्या प्रकरणाचे भूत अजूनही काँग्रेसच्या मानगुटीवर आहे. साहू प्रकरण यात नवे काहीच नाही. काँग्रेसचा इतिहास तर भ्रष्टाचाराने इतका बरबटलेला आहे की, त्यात ज्याचे कुणाचे हात गेले आहेत, त्याचे हात कित्येक वर्षे धुतले जाणार नाहीत. साहू यांच्याकडे सापडलेला पैसा इतका अफाट होता की, तीन दिवस धाडसत्र सुरू होते. त्यासाठी नोटा मोजण्याच्या नवीन मशीन्स मागवण्यात आल्या आणि त्याही बंद पडल्या. धीरज साहू यांच्या निवासस्थानाला बँकेच्या स्ट्राँगरूमचे स्वरूप आले होते.
पंतप्रधान मोदी यांनी साहू यांच्याकडील एकेक पैसा जनतेकडे परत केला जाईल, असे म्हटले आहे. काँग्रेसी नेता म्हटले की, तो भ्रष्ट असणारच, हे लोक गृहित धरून चालतात, अशी काँग्रेस पंतप्रधान मोदी यांना लोकसभा निवडणुकीत हरवण्यासाठी जंग जंग पछाडत आहे, त्यामागे हेच कारण आहे. सर्वच विरोधी पक्षांना मोदी का नकोत, याचे उत्तर या भ्रष्टाचारात दडले आहे. शिवसेना उबाठाला सध्या काँग्रेस प्रेमाचे भरते आले आहे. शिवसेना उबाठाचीही बोलती या प्रकरणातील भ्रष्टाचाराची व्याप्ती पाहून बंद झाली आहे. साहू यांच्या झारखंडमधील निवासस्थानी धाडी टाकण्यात आल्या. हा संपूर्ण पैसा दोनशे कोटी रुपयांचा असावा, असा अंदाज आहे. तो जनतेचा पैसा आहे.
काँग्रेसचे साहू यांच्यासारख्या खासदारांनी तो हडपला आणि नंतर दडपला. काँग्रेसला केवळ हात झटकून चालणार नाही. काँग्रेसमध्ये ज्या इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जातात, त्याही वेळी तुम्ही पैसा किती देऊ शकाल, असे विचारले जाते असे सांगण्यात येते. त्यामुळे साहू यांनी ज्या मार्गाने पैसा जमा केला, तो निवडणुकीत वापरण्यासाठी होता, असे स्पष्ट झाले आहे. साहू यांच्यावर काँग्रेस काही कारवाई करेल, अशी शक्यता नाही. साहू प्रकरणाने काँग्रेसची उरलीसुरली अब्रू धुळीत मिळाली आहे, हे मात्र सिद्ध झाले आहे.