नॉस्टॅल्जिया: श्रीनिवास बेलसरे
‘ताजमहाल’ हा ए. के. नदीयाडवाला यांचा १९६३ सालचा सिनेमा. प्रदीप कुमार आणि बिना राय यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमात रहमान, जीवन, वीणा आणि हेलेनही होती. मोगल काळातील ताजमहालच्या दंतकथेवर आधारित या सिनेमाची पटकथा लिहिली होती कमर जलालाबादी यांनी आणि दिग्दर्शक होते एम. सादिक, तर संवाद होते तबीश सुलतानपुरी यांचे. सिनेमा व्यावसायिकदृष्ट्या प्रचंड यशस्वी ठरला. संगीतकार रोशन आणि साहीर लुधियानवी यांनी सिनेमाला तीन फिल्मफेयर पारितोषिके मिळवून दिली. सर्वोत्तम गीतकाराचे साहीरला, सर्वोत्तम संगीताचे रोशन यांना आणि सर्वोत्तम गायिकेचे लतादीदीला!
मुगल राजा जहांगीरचा मुलगा शहाजहां म्हणजेच राजकुमार खुर्रम आणि अर्जुमन बानो (मुमताज) यांच्या प्रेमाची ही कहाणी. दिल्लीतल्या मीना बझारमध्ये केवळ राजघराणे आणि श्रीमंतांच्या सुना-मुली आपण तयार केलेल्या वस्तू विकायला ठेवत असत आणि तिथे तशाच महिला खरेदीसाठी येत. राजघराण्यातील महिलांशिवाय इतर कुणालाही या बाजारात प्रवेश नसे. अपवाद होता फक्त राजकुमार आणि सरदारांचा! मीना बाजारात एक दिवस राजघराण्याशी संबधित असलेल्या अर्जुमन बानो (बिना राय) आणि राजकुमार खुर्रम (प्रदीपकुमार) यांची दृष्टीभेट होते. पहिल्याच दृष्टिक्षेपात ते एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि कथा सुरू होते. मात्र राणी नूरजहानला राजकुमाराचे लग्न आपल्या लाडली बानोशी व्हावे असे वाटत असते. त्यामुळे ती खुर्रम आणि अर्जुमनच्या प्रेमात अनेक अडथळे आणते. तरीही राजा जहांगीरच्या अनुमतीमुळे लग्न आनंदात पार पडते. पुढे नूरजहांच्या कुटिल कारस्थानांमुळे जहांगीर आणि शहाजहानमध्येच युद्ध होण्याची शक्यता निर्माण होते.
जहांगीरच्या मृत्यूनंतर राज्यापासून बेदखल केला गेलेला शहाजहां राज्यावर बसतो आणि आपल्याविरुद्ध कारस्थाने केलेल्या आणि जहांगीरच्या मृत्यूला कारण ठरलेल्या राणीला मोठ्या मनाने माफ करून सोडून देतो. शेवटी मुमताजचा मृत्यू होतो आणि तिच्या स्मृतिप्रीत्यर्थ ताजमहाल बांधण्यात येतो. शहाजहाँ आणि मुमताजच्या अतूट प्रेमाची कहाणी म्हणजे ताजमहाल. साहीर लुधियानवी या मुळातच अतिशय रोमँटिक पिंड असलेल्या कवीने प्रेमात आकंठ बुडालेल्या दोन प्रेमिकांच्या उत्कट भावना आणि त्यांची दोघांनी केलेली निरागस अभिव्यक्ती गाण्यात अतिशय हळुवारपणे गुंफली होती. सिनेमाची मध्यवर्ती थीम असलेले हे गाणे जाणकार रसिकात आजही लोकप्रिय आहे. त्या अजरामर शब्द होते –
जो वादा किया वो निभाना पड़ेगा.
रोके ज़माना चाहे, रोके खुदाई,
तुमको आना पड़ेगा.
म्हणजे तो तिला म्हणतो, ‘तुला जगानेच काय ईश्वराने जरी रोखले तरी थांबता येणार नाही. मी साद घातली की तुला यावेच लागेल. आयुष्यभर साथ निभावण्याचे वचन पाळावेच लागेल.’
प्रिये, तुझी वाट पाहताना थकलेल्या माझ्या डोळ्यांनीच आता तुला साद घातली आहे. प्रेमाच्या रस्त्यांवरून तुझे नाव पुकारले जाते आहे. तू तर कितीही लाजाळू असलीस तरी तुझ्या एकेक अदा घायाळ करणाऱ्या आहेत. आता मला छळणे थांबवं आणि निघून ये –
तरसती निगाहोंने आवाज दी हैं,
मोहब्बतकी राहोंने आवाज दी हैं,
जान-ए-हया, जान-ए-अदा,
छोड़ो तरसाना, तुमको आना पडेगा…
यावर लतादीदीच्या अतिशय मधुर आवाजातले शब्द येतात –
ये माना हमे जाँसे जाना पड़ेगा,
पर ये समझ लो तुमने जब भी पुकारा,
हमको आना पड़ेगा.
जो वादा किया वो…
दोघांचे प्रेम इतके मनापासून आहे की कोणतेच आढेवेढे न घेता खुद्द प्रेयसीही म्हणते, ‘प्रिया, तुझ्या भेटीला येताना मृत्यू जरी आला तरी चालेल पण तूझी हाक ऐकल्यावर मी कशी थांबेन? मला निघावेच लागेल. मी तर माझे वचन पळणारच! आणि माझ्या निष्ठेवर मी का बोल लावून घेऊ? हृदयच जर तुला दिले तर मग प्राणांचे ते काय मोल? प्रेमाच्या करारात कसली भीती? माझे प्राणही तुलाच दिलेले आहेत –
हम अपनी वफ़ापे ना इलज़ाम लेंगे,
तुम्हें दिल दिया हैं, तुम्हें जां भी देंगे,
जब इश्कका सौदा किया, फिर क्या घबराना,
हमको आना पड़ेगा.
जो वादा किया वो…
यावर प्रियकरही आपल्या प्राणप्रिय सखीला आश्वस्त करताना म्हणतो, ‘जोवर चंद्र आणि तारे आकाशात चमकत आहेत तोवर आपली प्रेमाची वचने, शपथा कधीच तुटणार नाहीत याबद्दल खात्री बाळग. आपल्यापैकी कुणीही एकाने नुसती साद जरी घातली तरी दुस-याला काहीही करून यावेच लागेल, वचन निभवावेच लागेल.’
चमकते हैंं जबतक ये चाँद और तारे,
ना टूटेंगे अब अहदो पैमां हमारे,
एक दूसरा जब दे सदा,
होके दीवाना हमको आना पड़ेगा,
जो वादा किया वो…
गाण्याचा दुसरा भाग मुमताजच्या मृत्यूनंतरचा आहे. शहाजहां तिच्या आठवणीने तिच्या कबरीला वारंवार भेट देतो. त्याला तिच्या अस्तित्वाचे भास होतात. ते हुरहूर लावणारे कडवे नीट समजण्यासाठी मध्यपूर्वेतील दोन्ही धर्मातील, म्हणजे इस्लाम आणि ख्रिस्ती धर्मातील एक संकल्पना समजावून घ्यावी लागते. या दोन्ही धर्मात पुनर्जन्म नाही. त्यांचा आद्य प्रेषित जो आदम (ऊर्फ अॅडम) त्याच्या मुलुखात गेलेला (म्हणजे मृत्यू पावलेला) कुणीही परत या जगात येत नसतो. पण प्रेमात बुडालेला शहाजहा मुमताजला म्हणतो, ‘आज मला हे सांगणारे सगळे लोक माझ्या प्रेमाचे वैभव पाहतील, जेव्हा मला भेटायला तू त्या जगातूनही परत येशील-
सभी ऐहले दुनिया ये कहते हैंं हमसे,
के आता नहीं कोई मुल्क-ए-अदमसे,
आज ज़रा शान-ए-वफ़ा देखे,
तुमको आना पड़ेगा.
जो वादा किया वो…
मुमताजचेही प्रेम तितकेच उत्कट आहे. ती म्हणते मी तर नेहमीच येत आले आहे. प्रेमाची रीत मी मोडणार नाहीच. तू हाक दिलीस की मग कसला आदमचा मुलुख आणि कसचे काय, मला यावेच लागेल. मी येणार!’
हम आते रहे हैंं, हम आते रहेंगे,
मुहब्बतकी रस्में निभाते रहेंगे,
जान-ए-वफ़ा तुम दो सदा,
फिर क्या ठिकाना,
हमको आना पड़ेगा,
जो वादा किया वो…
आपल्या प्रेमाची कहाणी पिढ्यानपिढ्या सांगितली जाईल. माझ्यासाठी त्या जगातून या जगात येणे हे कसले दिव्य? मला ती थोडीच शिक्षा वाटणार आहे? मलाच तुला भेटायचे आहे ना? मी येणारच –
हमारी कहानी तुम्हारा फ़साना,
हमेशा हमेशा कहेगा ज़माना,
कैसी बला, कैसी सज़ा, हमको हैं आना,
हमको आना पड़ेगा.
जो वादा किया वो…
जुन्या गीतकारांची प्रेमाची अभिव्यक्ती अशी टोकाची उत्कट असायची. ते दंतकथानाही जिवंत करत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रेमाच्या शाश्वतपणाचा एक अमूर्त संस्कार ते नकळत तरुणाच्या मनावर करून टाकत. त्या निरागस, निर्मळ काळाची आठवण म्हणून हा नॉस्टॅल्जिया!