Friday, October 4, 2024

इच्छापंख

ओंजळ: पल्लवी अष्टेकर

आपल्या भारतदेशाला हिमाचल पर्वतराजींचा भरभक्कम आधार व निसर्गसौंदर्य लाभलेले आहे. हिमाचल प्रदेश हे उत्तर भारतातील एक पहाडी राज्य आहे. पर्यटन हा येथील प्रमुख व्यवसाय आहे. कुलू (मनाली), शिमला, धरमशाला यासारखी पर्यटन स्थळे या राज्यात आहेत. या स्थळांना अनेक पॅराग्लायडर्स जातात. अभिजीत आवटे दरवर्षी धरमशाला येथे पॅराग्लायडिंग करण्यास जातात. त्यांच्यासोबत मी बातचित करण्याचे ठरविले.

गेली अनेक वर्षे पॅराग्लायडिंग या क्षेत्राकडे एक छंद व साहसाची आवड म्हणून पाहणारे अभिजीत आवटे हे गेली वीस वर्षे या क्षेत्रात कार्यरत आहेत. अभिजीत म्हणाले, “पॅराग्लायडिंग हा हवेतील उड्डाणविषयक साहसी क्रीडा प्रकार आहे. यात विशिष्ट प्रकारच्या कापड व दोरीच्या सहाय्याने पंख तयार करतात व हार्नेसला बांधलेल्या ढाच्यावर खालती पायलट तरंगतो. मग कठड्यावरून उडी मारल्यावर गरम हवेच्या झोतावर पॅराग्लायडर उड्डाणाची उंची वाढवितात.” अनेक वेळा तुम्ही पाहिले असेल की, घार, पक्षी जसे गिरक्या घेत आकाशात जातात व पंख न फडफडवता हवेत तरंगत लांब जातात अगदी थेट त्याचप्रमाणे.

अभिजीत मर्चंट नेव्हीमध्ये असताना त्यांच्या एका सुट्टीच्या कालावधीत त्यांच्या बहिणीने त्यांना पॅराग्लायडिंग नावाचा नवीन खेळ करून पाहण्यास सुचविले. सन २००४ मध्ये अभिजीत यांनी या उपक्रमासाठी नाव नोंदवले व पहिल्या दिवशी याचा पहिला सोलो (एकट्याने उडी) केला. पॅराग्लायडिंग करून उतरल्यावर लगेच अभिजीत यांनी आपल्या इन्स्ट्रक्टरला “मला माझा स्वत:चा ग्लायडर घ्यायचा आहे” असे सांगितले. अभिजीत यांच्यासाठी हा अनुभव नक्कीच चित्तथरारक होता. ते म्हणतात, “इंजिनाशिवाय हवेत वाहून जाण्याची अनुभूती याआधी मी कधीच अनुभवली नव्हती.”

ग्लायडरमध्ये कोणतेही कठीण धातू नसतात व त्याचा वेग हा हवेच्या दिशेप्रमाणे संतुलित होतो. कोणतेही मशीन न वापरताही ग्लायडरद्वारे व्यक्ती केवळ हवेच्या झोतावर तासनतास शंभरो किलोमीटर्स हवेत उंच भरारी मारू शकते. अभिजीत म्हणाले, “मी स्वत:चा ग्लायडर विकत घेतला व मला या साहसाची आणि उड्डाणाची खूप आवड लागली. मग मी जवळ-जवळ प्रत्येक वीकेंडला उड्डाण करू लागलो आणि स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी इतर देशांमध्येही प्रवास केला.”
ते म्हणाले, “एका मोठ्या पंखाखाली काही बेल्ट्सच्या मदतीने पायलट बसलेला असतो. पंखांचा आकार हा सस्पेंशन वायर्स व हवेच्या दाबामुळे व्यवस्थित राहतो. हार्नेसमध्ये सुरक्षिततेसाठी राखीव पॅराशूट असते, ज्याचा वापर ग्लायडर कोसळल्यास किंवा पायलट कोणत्याही कारणास्तव नियंत्रण करू शकत नसल्यास वापरला जाऊ शकतो.”

हेल्मेट, हातमोजे, जी.पी.एस. ही अनिवार्य उपकरणे आवश्यक आहे. या खेळात शारीरिक तंदुरुस्ती असणे जरुरीचे आहे, कारण गीअर (उपकरण) हे सर्व बॅकपॅकमध्ये पॅक केलेले असते, ज्याचे वजन सुमारे १२ ते १५ किलो असते व एखाद्याला टेक ऑफपर्यंत पोहोचण्यासाठी चालणे किंवा चढणे आवश्यक आहे. जोपर्यंत शारीरिक तंदुरुस्ती आहे, तोपर्यंत वयाची कोणतीही अट नाही. पॅराग्लायडिंग शिकण्यासाठी व्यक्तीचे वय कमीत कमी १६ वर्षे आणि वजन किमान ४० ते ४२ किलो इतके असावे लागते.

अभिजीत म्हणतात, “भारतात सर्वोत्तम उड्डाणाचे ठिकाण म्हणजे हिमाचल प्रदेशातील कांगडा खोऱ्यातील बीर-बिलिंग. दरवर्षी वसंत ऋतू व शरद ऋतूमध्ये जगभरातील चारशेहून अधिक पायलट उड्डाणाचा आनंद घेण्यासाठी येथे एकत्र येतात. भारतात पॅराग्लायडिंग शिकण्यासाठी लोणावळ्याजवळ कामशेत हे सर्वोत्तम ठिकाण आहे. येथे बेसिक ते ॲडव्हान्स अभ्यासक्रम शिकवणाऱ्या सुमारे पाचशे शाळा आहेत. कामशेत येथे खेळ शिकण्यासाठी आठ महिने चांगले हवामान असते.” या खेळाबाबत अभिजीत सांगतात की, “हा एक साहसी खेळ आहे व त्याचा आदर केला पाहिजे, कारण चुकांचे गंभीर परिणाम होऊ शकतात. हा खेळ तुम्हाला असा अनुभव देतो, जो जगात इतर कोणालाही मिळत नाही. जेव्हा तुम्ही तिथे असता, तेव्हा तुम्ही एकटे असता व तुमच्या मनात इतर कोणताही विचार नसतो. त्यावेळी तुम्ही फक्त पृथ्वीतलावर असलेले सौंदर्य व भोवतालचे प्रेक्षणीय पक्षी पाहता. तुम्हाला वाऱ्याशिवाय काहीही ऐकू येत नाही.” इंजिन नसताना सुद्धा पॅराग्लायडर्स अनेक तास आणि शेकडो किलोमीटर्स उडू शकतात.

आपल्या आवडत्या आठवणींशिवाय अभिजीत सांगतात की, “तो दिवस हिमालयातील एक अतिशय थंडीचा दिवस होता. ते धर्मशाळेच्या दिशेने पुढे सरकत होते. एक हिमालयीन गिफ्राॅन (गिधाड) त्यांच्यापासून काही फूट दूर उडत होते व अभिजीत यांना त्याच्या चोचीच्या टोकावर द्रवाचा एक थेंब दिसत होता. या आधी त्यांनी गरुड व गिधाडांसह बरेच उड्डाण केले होते; परंतु त्यांच्या यापूर्वी हे लक्षात आले नाही की-हवा इतकी थंड होती की गिधाडालाही नाक वाहात होते.”

पॅराग्लायडिंगचे मूलभूत प्रशिक्षण तीन दिवसांचे आहे व त्याची किंमत अठरा ते वीस हजार रु. आहे. यात उपकरणे, अभ्यासक्रम-साहित्य, प्रशिक्षण, मुक्काम व प्रशिक्षणाच्या ठिकाणी वाहतूक यांचा समावेश आहे. ग्लायडर, हार्नेस, हेल्मेट आणि राखीव पॅराशूटसह संपूर्ण कीटची किंमत गीअरच्या मेकवर अवलंबून सुमारे ३.५ लाख असू शकते.” जगभरात क्राॅस कंट्री फ्लाइंग व स्पाॅट लॅंडिंग स्पर्धा आयोजित केल्या जातात. अलीकडेच, ऑक्टोबर, २०२३ मध्ये अभिजीत व त्यांच्या सहकाऱ्यांनी बीर-बिलिंग (हिमाचल प्रदेश) येथे प्री-पॅराग्लायडिंग विश्वचषक खेळला. पॅराग्लायडिंगचा अलीकडेच आशियाई खेळांमध्ये स्पर्धात्मक खेळ म्हणून समावेश करण्यात आला.

अभिजीत सर्वांना प्रांजळपणे सांगतात की, “भीती तुम्हाला तीक्ष्ण ठेवते. ती तुम्हाला आकाशात जागरूक ठेवते व घडणाऱ्या कोणत्याही घटनेसाठी तुम्ही तयार असता. आपण या खेळाचा व आपण ज्या परिस्थितीत उड्डाण करतो त्या परिस्थितीचा आदर केला पाहिजे. ग्लायडर कंट्रोल, कोलॅप्समधून ग्लायडर रिकव्हरी, मैदान सराव व थोडेसे मानसिक संतुलन यावर आम्ही स्वत:ला प्रशिक्षण देतो. मनाची स्थिरता, संयम व धाडस इ. गोष्टी पॅराग्लायडिंगच्या क्षेत्रात फार महत्त्वाच्या आहेत. या साहसी खेळात दुखापत किंवा त्याहूनही वाईट होऊ शकते.” अभिजीत यांना पॅराग्लायडिंग करताना तीन अपघात झाले आहेत, ज्यात हाडे फ्रॅक्चर व शस्त्रक्रियांचा समावेश आहे; “परंतु अशा घटना दैनंदिन आयुष्यात बाथरूममध्ये घसरूनही होऊ शकतात. त्यामुळे मी आंघोळ करण्यापासून परावृत्त होऊ शकत नाही.” असे ते म्हणतात. अभिजीत म्हणतात, “मी काही अाध्यात्मिक व्यक्ती नाही; परंतु उडताना त्यांना ध्यानाची स्थिती प्राप्त होते.” ते पॅराग्लायडर्सना मनापासून संदेश देऊ इच्छितात की, “सुरक्षित राहून उड्डाण करा.” तुमच्या पुढील वाटचालीस मन:पूर्वक शुभेच्छा.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -