निसर्गवेद: डॉ. महालक्ष्मी वानखेडकर
कार्डिनल म्हणजे मुख्य, प्रमुख. सर्व लाल पक्ष्यांमध्ये अतिशय सुंदर, चमकदार लाल पंखांचा, खट्याळ, प्रेमळ, मनमिळावु , ऊर्जावान, अस्थिर, गान सम्राट असा हा कार्डिनल पक्षी. कार्डिनल हे उत्तर आणि दक्षिण अमेरिकेत, न्यू मेक्सिको, आग्नेय कॅनडा, आग्नेय आशिया, टेक्सास बेलीझ, ग्वाटेमाला इ. ठिकाणी आढळतात. आत्तापर्यंत उत्तरेकडील, डेझर्ट, रेड क्रिस्टेड आणि व्हर्मीलियन कार्डिनल असे चार प्रकार पाहण्यात आले आहेत. नर लालभडक चोच आणि छातीपर्यंत काळ्या रंगांचे पंख, पूर्ण शरीरावर लाल चमकदार पंख, डोक्यावर लाल तुरा, राखाडी काळे डोळे, काळे पाय, लाल भडक शेपूट तर मादी राखाडी सोनेरी लालसर चमकदार पंख, लाल चोच, डोक्यावर लालसर तुरा, पाठीवरचे तपकिरी लालसर राखाडी पंख आणि लालसर शेपूट, लालसर राखाडी पाय आणि डार्क राखाडी नख असे एकंदरीत या कार्डिनलचे वर्णन. यांच्या अन्नात फळे, जंगली द्राक्षे, डॉग वूड, गवत, तुती, ब्लॅकबेरी, मका सूर्यफुलाच्या आणि पाइनच्या बियांचा समावेश आहे. पोषक आहार म्हणून फुलपाखरे, कोळी, माशा, कीटक, लीफ हॉपर्स आणि पतंग यांचा सुद्धा समावेश आहे.
मी या पक्ष्याला “गान सम्राट कार्डिनल” म्हणते, कारण या पक्ष्याचा आवाज खूपच सुमधुर आहे. हा पक्षी सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत गात असतो. जवळजवळ एका तासात २०० गाणी म्हणणारा हा पक्षी. या पक्ष्याची बोलीभाषा गायनातूनच आहे. हा मादीच्या भोवती आणि मादी नराच्या भोवती गात फिरत असतात. हे दिवसभर युगलगीत गात असतात. एकमेकांना साद घालताना सुद्धा सुमधुर आवाजातूनच घालत असतात. प्रजनन काळात एकत्रितपणे हे गात फिरत असतात. हे कधीच एका जागेवर स्थिर नसतात. थंडीच्या मोसमात नर-मादी एकत्र राहतात. पण २०% पक्षी या मोसमा नंतर वेगळे होतात. चिमण्या, गोल्डफिंच, डार्क आइड- जकोस, टफ्टेड टिटमाइस, सफेद गळ्याच्या चिमण्या अशा अनेक प्रजातींबरोबर हे पक्षी राहतात.
नर-मादी मिळुन डॉगवूड, हनी सकल, नागफणी, देवदार, गुलाब, पाइन्स स्प्रुस, हेमलॉक, ब्लॅकबेरी ब्रांबल्स, चिनी मेफल अशा प्रकारच्या झाडांच्या फांद्यावर घरटे बांधतात. आधी नर आणि मादी एकत्रितपणे सर्वेक्षण करतात. नर घरट्याची सामुग्री गोळा करतो आणि मादी तिच्या चोचीने लवचिक होईपर्यंत त्या चिरडते. नंतर ती फांदीवर बसून तिच्या शरीराभोवती काही फांद्या वळवून कपाच्या आकारात घरटे बनविते. हे घरटे चार थरांमध्ये बनवले जाते. त्यात खडबडीत फांद्या, पाने, यांचे आच्छादन ठेवून त्यावर द्राक्षांच्या झाडांच्या साली आणि शेवटी नरम गवत, पातळ देठ, मूळ अशांचा वापर करते. तिला हे कप घरटे बनवायला तीन ते नऊ दिवस लागतात. या घरट्यांचा व्यास तीन इंच तर याची उंची तीन ते चार इंच असते. दोन ते पाच अंडी दिली जातात; परंतु दोन किंवा तीन पिल्ल जगतात.
सात ते तेरा दिवसांत ही घरटी सोडून निघून जातात. या पक्ष्यांचे आयुष्य ५ ते १५ वर्षे असते. त्यांना एकत्रित कळपात राहणे आवडते. एका झुंडीमध्ये कमीत कमी हजार पक्षी सुद्धा राहतात.यांची स्मरणशक्ती तल्लख असते. देवदारच्या झाडामध्ये हे आपले खाद्य लपवुन ठेवतात. कमीत कमी एक लाख बिया ते लपवून ठेवू शकतात. जेव्हा बर्फ पडत असतो, तेव्हा थंडीमुळे हे पक्षी आपले पंख फुलवतात. एखाद्या लाल आणि तपकिरी चेंडू सारखे हे पक्षी दिसतात. नर आणि मादी एकमेकांच्या जवळ बसतात. हा क्षण मी टिपला आणि त्यावर हे आर्ट वर्क बनवले. झाडांवर, त्यांच्या शरीरावर, पंखांवर पडलेल्या बर्फामुळे हे गुबगुबीत पक्षी खूपच सुंदर दिसतात.
एक गंमत सांगते. एकदा ६९ वर्षांचे पक्षी विशेषज्ञ जेमी हिल यांना त्याच्या मित्राचा फोन आला की, एक वेगळाच पक्षी माझ्या खिडकीसमोर येऊन बसला आहे. लगेच पेनसिल्बेनिया येथे जेमी हिल यांनी जाऊन पाहिले तर तो अत्यंत दुर्मिळ असा नर आणि मादी दोन्ही लिंग मिश्रित कार्डिनल होता. डोक्यापासून शेपटापर्यंत एका बाजूने पांढरट- राखाडी- गुलाबी- लालसर, तर दुसऱ्या बाजूने पूर्णपणे लाल असा हा पक्षी बघायला मिळाल्यामुळे अत्यंत रोमांचित होऊन जेमी हिलने त्याचे अनेक फोटो काढले, कारण जेमी हील यांच्यासाठी अत्यंत दुर्लभ असा हा योग होता. या पक्ष्याला ‘द्विपक्षीय गायनेंड्रोमोफ्रिज्म’ असे म्हटले जाते. गायनेड्रोमोफ्री म्हणजे अर्धा नर अर्धी मादी. या प्रकारात सर्वच प्रकारचे जीव जंतू पाहण्यास मिळतात; परंतु कधी कधी फक्त रंग-नक्षी विभाजित झालेली असते, तर कधी लिंग विभाजन सुद्धा होते. हा असामान्य दुर्मीळ पक्षी आहे. अशा पक्ष्यांची कोशिका विभाजनामुळे आणि एका ऐवजी दोन वेगळ्या लिंग गुणसूत्रांमुळे निर्मिती होते. हे पक्षी मनमिळाऊ असल्यामुळे शहराजवळ राहतात आणि आपल्यामध्ये सहज मिसळून जातात. यांच्या स्वभावातील प्रेम गुणांमुळे मानव ही त्यांना हानी पोहोचवत नाही. म्हणून यांची लोकसंख्या वृद्धिंगत होत आहे.
या कार्डिनलचे आध्यात्मिक महत्त्व म्हणजे हे आत्म प्रेमाचे प्रतीक आहेत. अमेरिकन लोकांची धारणा आहे की, हा पक्षी पाहिल्यावर पती-पत्नीचे जीवन सुखी आणि दृढ नात्याचे होते. हे पक्षी म्हणजे आनंदाचे आणि प्रेमाचे प्रतीक. एकंदरीत माझ्या अध्ययनानुसार यांचा लाल चमकदार पंखांचा रंग मनाला सुखावून आपल्यात प्रेमनिर्मिती करतो. यांच्या सततच्या मधुर गायनामुळे आपल्याला हीलिंग होते. सर्व दुःख विसरून आपले लक्ष यांच्या सुमधुर गाण्याकडे जाते आणि आपण मानसिक, शारीरिक सुखावतो. सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत गाणारे हे पक्षी खूपच आनंदात सगळीकडे बागडत असतात. त्यांना पाहून आपणही प्रफुल्लित होतो. अशा या कार्डिनल पक्ष्यांची निर्मिती या भूमीवर असल्यामुळे परमेश्वराचे आपण सतत आभार मानले पाहिजे.
dr.mahalaxmiwankhedkar@gmail.com
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज कोलकाता नाईट रायडर्सची टक्कर गुजरात टायटन्सशी होत आहे. हा…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये सोमवारी कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना रंगत…
मुंबई : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर नवीन मोबाईल घेऊ पाहत असाल तर, ओप्पोने भारतीय बाजारात नवा…