वारीची खुशी म्हणजे एकादशी...

हलकं-फुलकं: राजश्री वटे


वैशाखातील कडक उन्हामुळे कातावलेल्या जिवाला आभाळात आषाढीचे काळे ढग जमायला लागतात व आस लागते मृगाच्या पावसाची. धरणीही आमंत्रण देते त्या आभाळाला... ये रे बाबा लवकर. काळी माती आसुसली आता भिजायला, अंकुरायला... आणि तो बरसतो. शेतकाऱ्यांचा जीव सुद्धा सुखावतो. वाट पाहून थकलेले, सुकलेले डोळे पाणावतात, पेरणी करून ती छोटी बाळं धरणीमातेच्या कुशीत सोपवून तो निघतो वारीला. निश्चिंत मनाने... विठ्ठल-विठ्ठल करत पोहोचतो. त्या काळ्या विठ्ठलाच्या चरणी काळ्या मातीला पावसाच्या स्वाधीन करून...


प्रत्येकालाच आठवत असेल नाही लहानपणीची एकादशी. शाळेच्या सुट्टीची न्यारीच खुशी. एकादशीच्या आठ दिवस आधीपासून मंदिरा-मंदिरामध्ये कीर्तन प्रवचन सुरू होत असते.आजी-आजोबांसोबत ते ऐकायला जायचं. वातावरण भक्तिमय असायचं. आदल्या दिवशी घराघरातून शेंगदाणे भाजल्याचा खमंग वास यायचा. मुठीमुठीने ते पळवायचे व तोंडात बकाणे भरायचे. आईचा जेव्हा एक धपाटा पाठीत बसायचा व आता पुरे अशी धमकी मिळाली की धूम ठोकायची! आठवलं ना... एकादशीच्या दिवशी घराघरात आषाढातील पहिल्या सणाच्या स्वागताची भक्तिपूर्ण तयारी असायची. देवाजवळ दिव्याचा प्रकाश उजळून निघायचा.. तुळशीजवळ उदबत्तीचा धूर तुळशीला प्रदक्षिणा घालत असे. सगळ्यात आधी आई अंघोळ करून ओल्या केसांवर टाॅवेल गुंडाळून देवाला नमस्कार करून, तुळशीला पाणी घालून दारात रांगोळीने स्वस्तिक काढून सकाळ प्रसन्न करायची.


मग स्वयंपाकघराचा ताबा घेते उपवासाचे चविष्ट पदार्थ करायला. तुपाचा खमंग वास घरभर दरवळतो, जिऱ्याला सामावून घेत मस्त साबुदाणा खिचडी तयार होते. आईच्या सरावलेल्या हातांनी चवदार पदार्थ केले जात असत. तुपाचा वास नाकातून प्रवास करत पोटात शिरतो व भूक उड्या मारायला लागायची. पांडुरंगाच्या दर्शनाशिवाय व देवाला नैवेद्य कधी होतो व कधी ते पोटात पडतं असं होऊन जायचे, त्यावेळी पोटाला तेव्हढाच बदल मिळायचा आणि तो पूर्ण व्हायचा एकादशीच्या निमित्ताने... आईच्या रूपातली ती अन्नपूर्णा आपल्या पोटातील अग्नीला शांत करायची. तीही सुखायची व आपणही सुखायचो... आठवलं का लहानपण?
असं सुख सुरेख बाई,
आता कुठे शोधायचं...
अशी तेव्हाची एकादशी...
आताही शोधली, तर नक्कीच सापडेल तीच खुशी...!
जय जय पांडूरंग हरी, जय जय वासुदेव हरी!

Comments
Add Comment

चिंपांझींची मैत्रीण

विशेष : उमेश कुलकर्णी चिंपाझींवर संशोधन करणारी लोकविलक्षण संशोधक जेन गुडॉल यांनी नव्वदीत जगाचा निरोप घेतला.

ऋषितुल्य रामकृष्ण भांडारकर

कोकण आयकॉन : सतीश पाटणकर रामकृष्ण गोपाळ भांडारकर हे संस्कृत पंडित, मराठी शिक्षणतज्ज्ञ, समाजसुधारक व प्रार्थना

अल्बेनियातला रोबो मंत्री

डॉ. दीपक शिकारपूर अलीकडेच अल्बेनियाने जगातील पहिले एआय मंत्री डिएला यांची नियुक्ती केली. याबाबत जगभर चर्चा सुरू

कैलास गुंफा मंदिर शिल्पकलेचा अद्वितीय नमुना

विशेष : लता गुठे महाराष्ट्रामध्ये पुरातन काळापासून देव, धर्म, संस्कृती आणि परंपरेला विशेष स्थान आहे हे आपल्या

आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी...

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे फक्त हिंदी चित्रपटांचे रिमेक इतर भारतीय भाषात होतात असे नाही. आपल्या मराठीतही

तुंबरू

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे नारायण! नारायण! करीत त्रिलोकांत भ्रमण करणाऱ्या देवर्षी नारदमुनींची