
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
नागपूर : सत्तेवरुन पायउतार झाल्यापासून उद्धव ठाकरे उठसूठ सगळ्याच गोष्टींना विरोध करत आहेत. मुंबईत मेट्रो कारशेडला विरोध केला. तर तिकडे कोकणात नाणारला ठाकरेंनी विरोध केला. त्याला पर्यायी जागा त्यांनीच पत्राद्वारे सरकारला सुचवली. मुंबईत धारावी पुनर्विकासासाठी असलेली पहिली निविदा देखील उद्धव ठाकरे यांच्या सरकारनेच रद्द केली. त्यानंतर दुसरी निविदा काढली. त्याच्यावर उद्धव ठाकरे आक्षेप घेत आहेत. मात्र या निविदेतील अटी आणि शर्ती ठाकरे सरकारनेच तयार केल्या आहेत. कुठल्याही अटी शिंदे सरकारने बदललेल्या नाहीत. असे असतानाही उद्धव ठाकरेंचा विरोध का? सगळ्याच बाबतीत ते विरोध करताना दिसतात. सगळ्याच गोष्टींना त्यांचा विरोध असून विकासविरोधी भूमिका ठाकरे आणि विरोधक घेत असल्याचा आरोप करत मुंबईतील धारावी पुनर्विकासाच्या मुद्यावर उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आरोपांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी जोरदार पलटवार केला.
धारावीतील लोकांना झुंजवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करत आहेत. गरिबातील गरिबांना घरं मिळता कामा नये, ते तिथेच खितपत पडून रहावे, यासाठी ठाकरे प्रयत्न करत असल्याचा आरोपही फडणवीस यांनी केला. आमच्या सरकारने पारदर्शकता आणली आहे. टीडीआरची विक्री ही आता कागदावर नव्हे तर डिजीटल पद्धतीने करावी लागणार हा बदल आम्ही केला आहे, असेही फडणवीस म्हणाले.