
ओडिसा आणि झारखंडमध्ये आयकर विभागाची मोठी कारवाई
लखनौ : आयकर विभागाने (Income Tax Department) ओडिसा आणि झारखंडमध्ये (Odisha and Jharkhand) केलेल्या छापेमारीत (Raid) तोंडात बोटे घालायला लावेल इतकी रक्कम सापडली आहे. आश्चर्यकारक बाब म्हणजे ही रक्कम मोजता मोजता पैसे मोजणारी मशीनच थकून बंद पडली. ओडिसा आणि झारखंडमधील बौध डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेडवर (Boudh Distilleries Private Limited) हा छापा टाकण्यात आला. या छाप्यात कंपनीच्या अन्य ठिकाणी अधिकाऱ्यांनी धाड टाकली ज्यात मोठ्या प्रमाणात रक्कम सापडली आहे.
आयकर विभागाने आतापर्यंत ओडिसाच्या बोलांगीर, संबलपूर आणि झारखंडच्या रांची, लोहरदगा येथे छापे टाकले. आयटी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारपर्यंत या छापेमारीत जप्त करण्यात आलेल्या रक्कमेपैकी तब्बल ५० कोटी रुपयांच्या नोटांची मोजणी पूर्ण झाली होती, मात्र तरीही मोठ्या प्रमाणावर नोटा शिल्लक होत्या. ज्या ठिकाणी हे छापे टाकले तेथे नोटांची संख्या इतक्या प्रचंड प्रमाणात होती की, नोटांची मोजणी करणारे मशीन बंद पडले. विशेष बाब म्हणजे ही छापेमारी अजूनही सुरूच आहे. अधिकारी आता बौध डिस्टिलरीजच्या अन्य ठिकाणी छापे टाकत आहेत.
बौध डिस्टिलरीजसह आयकर विभागाने झारखंडमधील एक प्रसिद्ध उद्योगपती रामचंद्र रुंगटा यांच्या पंजाब नॅशनल बँकेजवळ असलेल्या निवासी कार्यालयावर छापे टाकले आहेत. रुंगटा यांच्या रामगड, रांची आणि अन्य ठिकाणी तसेच घरांवर आयकर विभागाने सकाळपासून छापे टाकण्यास सुरुवात केली आहे. ही कारवाई सुरू असताना आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना सीआरपीएफच्या जवानांची सुरक्षा देण्यात आली आहे.