रवींद्र मुळे, नगर
नरेंद्र मोदी हे आता राजकीय रंगमंचावरील असे व्यक्तिमत्त्व बनले आहे की, दिवसाच्या प्रत्येक तासाला ते एक नवीन पटकथा (स्क्रिप्ट) लिहीत आहेत. अर्थात विकसित भारताच्या या सुंदर कलाकृतीचे निर्माते तेच आहेत, दिग्दर्शक तेच, वितरकही तेच आहेत आणि प्रमुख भूमिकेतही तेच आहेत. दुसऱ्या बाजूने, त्यांच्या या विविध प्रतिभासंपन्न आविष्काराने विरोधक हतबल आणि हताश झाले आहेत. हे हतबल झालेले त्यांचे केवळ राजकीय विरोधक नाहीत, तर स्वतःला विचारवंत म्हणवणारे आणि सतत मोदीजी यांना पाण्यात पाहणारे डावे, लिबरल आणि चाटूकार पत्रकार हे पण आहेत.
ज्या दिवशी एक्झिट पोल सर्व वाहिन्यांवर झळकले, त्या दिवसापासून निकालाच्या दिवशी दुपारपर्यंत हे सगळे हताश, हतबल मंडळी आशाळभूतपणे निकालाकडे कान आणि डोळे लावून बसले होते. त्यांना वाटत होते ‘कांटे की टक्कर’ म्हणजे काही तरी घडून या निवडणुकीत मोदी यांचा पराभव होईल. हा सगळा विचार या मंडळींचा जेव्हा चालू होता, तेव्हा मोदीजी काय करत होते? मोदीजी ‘कॉप २८’ला दुबईला गेले होते. तेथे पर्यावरण विषयावरील भारताचा दृष्टिकोन ते मांडत होते आणि केवळ भारताचा नाही, तर परंपरेने हिंदू संस्कृतीचा याबाबतचा दृष्टिकोन अशा परिषदेत ते नेहमीच मांडत असतात, तो ते मांडत होते. तेथून ते भारतात आले आणि पूर्व किनाऱ्यावर घोंघावणाऱ्या चक्रीवादळामुळे होणारे परिणाम आणि संभाव्य येऊ घातलेल्या आपत्ती संदर्भात आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठका घेत होते.
‘Man with mission’ अशा पद्धतीने नरेंद्र मोदी यांचा दिनक्रम अव्याहतपणे चालू आहे. तो दिनक्रम जेव्हा रोज भल्या पहाटे चालू होतो, तेव्हा त्यांचे विरोधक साखर झोपेत स्वप्नरंजनात मग्न असतात आणि तो दिनक्रम जेव्हा मध्यरात्री संपतो, तेव्हा ही सगळी मंडळी दिवसभराच्या मोदीजी यांच्या क्रियाशीलतेने अस्वस्थ होऊन निद्राधीन झालेले असतात. त्यामुळे एव्हाना मोदींना विरोध करणे सोपे नाही, हे या मंडळींना खरेतर कळून चुकले आहे.
आजचा दिवस आपण बघू या. आज सकाळीच संसदेत अधिवेशन सुरू होणार होते. ते सकाळीच तेथे हजर होते. सकाळीच बोलताना त्यांनी विरोधकांना कानपिचक्या दिल्या. त्यांच्या या वक्तव्यावर कशाप्रकारे व्यक्त व्हायचे? याचा विचार विरोधक करत होते. तोपर्यंत मोदीजी सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावर नौदल दिनासाठी पोहोचले आणि तेथे त्यांनी छत्रपती शिवरायांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण केले. तेथील प्रदर्शनीला भेट दिली आणि नंतर बोलताना विरोधकांच्या नकारात्मक राजकारणावर त्यांनी कोरडे पण ओढले.
सागरी सीमा ही पण राष्ट्राची सीमा असते आणि सागरी तटबंदी ही तितकीच महत्त्वाची असते, हे ओळखणारे छत्रपती शिवराय होते. पण ज्या काँग्रेस संस्कृतीने आणि डाव्या विचारसरणीने त्यांना एक बंडखोर सरदार इतकीच मान्यता दिली. त्यांना शिवाजी महाराजांचे मोठेपण कळलेच नाही. त्यामुळे महाराजांचा इतिहास न समजलेले आमचे राज्यकर्ते ना आमच्या सागरी सीमा सुरक्षित ठेवू शकले ना जमिनी, सीमा! आम्ही त्यामुळे आमचा काही भूभाग स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, एकदा विभाजन झाल्यावर पुन्हा गमावलाच. पण २६/११ सारखी घटना असुरक्षित सागरी सीमा असल्यामुळेच घडली. पण मोदीजी महाराजांचे चरित्र जगणारे आहेत.
जे स्वतःला शिवरायांचे अनुयायी समजतात आणि इतके दिवस त्याच पुण्याईवर सत्ता भोगत होते, त्यांनी कधीही महाराजांच्या कर्तृत्वाला न्याय दिला नाही. पण मोदीजी हे सातत्याने छत्रपती शिवरायांच्या जीवन चरित्राचा उल्लेख आपल्या मांडणीत करत असतात आणि त्याप्रमाणे स्वतः जीवन प्रत्यक्षात जगत असतात. त्यामुळेच नौदलाच्या मानचिन्हावर स्वातंत्र्य मिळाल्यावर ७५ वर्षांनी महाराजांची मुद्रा दिसायला लागते आणि त्यामुळेच आज शिवाजी महाराजांचा पुतळा उभा राहिलेला आपल्याला दिसतो आहे आणि मोदीजी वंदन करण्यासाठी मनोभावे तेथे पोहोचले आहेत. महाराज आपल्या उभ्या आयुष्यात कुठल्या युद्धात मिळालेल्या यशाने हुरळून गेले नाही, त्यात मश्गूल झाले नाहीत. किंबहुना एका योजनेनंतर त्वरित पुढची योजना त्यांची तयार असायची. अफजल खान वधानंतर त्यांनी शत्रूवर त्वरित चढाई केली. आग्र्याहून सुटकेनंतर त्वरित तहातील किल्ले परत मिळवण्यास त्यांनी सुरुवात केली. राज्याभिषेक झाला, पण त्या राजवैभवात न रमता दक्षिणेत स्वारी करण्यास निघाले. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग असे त्यांच्या जीवनाचे यथार्थ वर्णन करावे लागेल. त्यामुळेच मुघल, आदिलशाह सगळे त्यांच्यापुढे हतबल आणि निराश होते.
मोदीजी यांच्या यशस्वी राजकीय कारकिर्दीचे हेच रहस्य आहे. ते विरोधकांना पराभवाच्या विचारात गुंतवून ठेवतात आणि त्याच वेळी नव्या विजयाची योजना बनवतात. मोदीजी यांनी कालच्या विजयानंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधताना अत्यंत संयमित आणि संतुलित बोलताना सरकार कोणाचेही असो आपल्याला जनतेला आपत्तीत सहकार्य करायचे आहे, हे सांगितले. तसेच पुढील काळात संभाव्य घडू शकणारे विरोधकांचे डावपेच याची कल्पना देऊन ते गेले. विरोधकांचा जातीयवादी अजेंडा ‘फक्त चार जाती मी मानतो’ असे सांगत त्यांनी उद्ध्वस्त करून टाकला. विरोधक त्या भाषणाचा विचार करत होते. सकाळी संसद परिसरात मोदीजी जे बोलले त्याचा विचार करत होते. पण मोदी हे विरोधकांना तेथे घुटमळत ठेवून केव्हाच २०२४च्या दिशेने निघून गेले आहेत.
आज तरी मोदीजी यांच्या या कार्यक्षमतेला, त्यांच्या वैश्विक दृष्टिकोनाला, त्यांच्या एकूणच दूरदृष्टीला कुठलेच उत्तर विरोधकांच्याकडे नाही. त्यामुळेच ईव्हीएमवर भंपकसारखे आरोप करून, ही सगळी मंडळी स्वतःलाच जनतेच्या नजरेत विदूषक ठरवत आहेत. जसा कसलेला फलंदाज पूर्ण फॉर्मात असताना कुठेही क्षेत्ररक्षक असेल, कितीही कौशल्याने गोलंदाज गोलंदाजी करत असेल तरी चेंडू सीमारेषेबाहेर भिरकावून देत असेल, तर प्रतिस्पर्धी संघाने खेळपट्टीला दोष देणे हे जसे हताश आणि हास्यास्पदपणाचे लक्षण आहे, तेच या इव्हीएम मशीनबाबतच्या लावलेल्या तुणतुण्याबाबत आहे.
हळूहळू हे नमोरुग्ण खरेच मनोरुग्ण होतील की काय? असे आता वाटायला लागले आहे. जागतिक रंगमंचावरही हे मनोरुग्ण किंवा नमोरुग्ण आहेतच. कारण तेथे पण मोदीजी यांनी लिहिलेल्या पटकथा या यशस्वी होत असल्याने तेथेही त्यांचे आणि पर्यायाने भारताचे जॉर्ज सोरस आणि गँग सारखे विरोधक डोक्याला हात लावून बसले आहेत. कितीही टूलकिट गँग तयार केली, कितीही आंदोलने उभी करण्यासाठी पैसा ओतला, कितीही अपप्रचार करण्यासाठी बीबीसी ते न्यूयॉर्क टाइम्सपर्यंत सर्वांना हाताशी धरले, तरी भारताची प्रगती आणि मोदीजी यांची लोकप्रियता आपण रोखू शकत नाही, याची जवळजवळ खात्री सर्व जागतिक पटलावरील विरोधकांना झाली आहे. त्यामुळे तेही हतबल, हताश आहेत.
अर्थात असे असूनही महाराष्ट्रातील एक मनोरुग्ण ‘निर्भय बनो’ नामक भंपकपणा करत हिंडतो आहे. त्याची भाषा, अरेरावी बघून खरोखर त्यांचे नैराश्यच खरे तर व्यक्त होत असते. परवा सिन्नरला हा तमाशा करण्याचा प्रयत्न त्याने केला, तोही एका सार्वजनिक व्यासपीठावर. पण लोकांनी किती दिवस हे सहन करायचे? लोकशाही असलीच पाहिजे, विचार सर्वांनाच मांडायचे असतात. पण ऐकणारे खोटे-नाटे शिव्याशाप किती दिवस ऐकत राहणार यांच्या स्वार्थासाठी? त्यांची हतबलता, असहाय्यता, हताशता ज्या प्रकारे व्यक्त होत आहे, ते सहन न झाल्याने लोकांनीच त्यांचे भाषण सिन्नरला बंद पाडले. यावरून हवेची दिशा ओळखण्याइतकेपण शहाणपण त्यांच्यात नसल्याने चारी मुंड्या चीत झाल्यावरही हिंदुत्ववादी लोकांवर आरोप करत सुटले आहेत.
मोदीजी यांच्या कार्यक्षमतेची बरोबरी किंवा सामना न करू शकणारे मग आता वेगवेगळे कपट कारस्थाने करत आहेत. जातीनिहाय जनगणना करण्याची हुल उठवून देत, आरक्षण या विषयावर जाती जातीमध्ये वाद घालून आणि सामाजिक ऐक्याची होळी करत आणि जातीयवादाचा वणवा पेटवून त्यावर आपल्या राजकीय पोळ्या भाजण्याचा हीन, निंदनीय कपट कारस्थान विरोधक करत आहेत. अर्थात जनताही हुशार झाली आहे. त्यांना ही कपट कारस्थाने कळतात. म्हणूनच कितीही अपप्रचार झाला तरीही मोदीजी हे अजेय आणि अतुलनीय ठरत आहेत.
विरोधक तितकेच हताश, हतबल आणि असहाय्य दिसत आहेत. अर्थात ही जी काही पटकथा मोदीजींकडून लिहिली जात आहे, त्याची सूत्रधार प्रत्यक्ष नियतीच आहे! ज्या नियतीने विश्वाच्या कल्याणासाठी भारताला आणि भारतमातेला सशक्त, समृद्ध आणि विकसित करण्याचा दृढ संकल्प केला आहे आणि त्यासाठी ती अधिकाधिक शक्ती तिच्या या ‘नरेंद्र’ नावाच्या सुपुत्राला देत आहे. शिकागो येथे याच नियतीने ‘नरेंद्र’ नावाच्याच एका भारतमातेच्या सुपुत्राकडून भारतमातेच्या उज्ज्वल भविष्याची आणि हिंदू धर्माच्या महानतेची आकाशवाणी वदवून घेतली होती आणि आता ती नियती ‘नरेंद्र’ नावाच्याच सुपुत्राकडून ती आकाशवाणी प्रत्यक्षात आणत आहे. आपण आपल्याला भाग्यवान समजू की, हे आम्ही ‘याचि देही याचि डोळा’ बघत आहोत. तूर्त विरोधकांना शहाणपणाची बुद्धी देवो, ही परमेश्वराकडे प्रार्थना!