Monday, April 21, 2025
Homeसंपादकीयतात्पर्यलग्न झाल्यावर आपोआप सुधारेल?

लग्न झाल्यावर आपोआप सुधारेल?

अनेकदा अनेकांच्या बोलण्यात आपण ऐकतो की, मुलाचे किंवा मुलीचे लग्न लावून द्या, जबाबदारी अंगावर पडल्यावर आपोआप सुधारेल, एखादं मूलबाळ झालं की वळणावर येईल, बायको त्याला बरोब्बर ताब्यात ठेवेल किंवा मुलगी सासरी गेल्यावर मुकाट्याने राहील, नांदेल. बालपणी, तरुणपणी लग्नाआधी अनेक मुलं-मुली विचित्र स्वभावाची, हट्टी, न ऐकणारी, कोणाचा धाक न बाळगणारी, कोणालाच न जुमाननारी अशी असतात. लग्नाच्या वयात आलेली मुलं अथवा मुली सेटल नसतात, कमवते नसतात, त्यांचं करिअर अथवा शिक्षण अर्धवट राहिलेलं असतं किंवा त्यात हवी तशी गती नसते, प्रगती नसते. त्यांना जबाबदारीची जाणीव नसते, आर्थिक, मानसिक, भावनिक स्थिरता नसते, निश्चित ध्येय नसते. अनेक प्रकारचे प्रयत्न करून पण आपल्या मुलाला, मुलीला योग्य मार्गावर आणणे पालकांना, घरातल्यांना जमलेले नसते. अनेकदा मुलांना नोकरी नसते, असली तरी ती अपेक्षित दर्जाची नसते, मुलं व्यसनी असतात, अथवा चुकीच्या मार्गाला लागलेली असतात. मुलीसुद्धा चुकीच्या संगतीमुळे चुकीच्या मार्गाला गेलेल्या असतात. आयुष्याकडे गांभीर्याने पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन विकसित झालेला नसतो.

काही ठिकाणी पाहिलं, तर ज्या घरात मुलं योग्य वयात कमावती झालेली आहेत, कुटुंबाची जबाबदारी घेत आहेत, स्वतःच्या पायावर उभी आहेत. पण त्यामुळे अत्यंत अहंकारी झालेली आहेत. अनेक ठिकाणी मुलं घरातील कोणाला ऐकणारी नाहीत, आपण कमावतो आहोत, म्हणजेच आता आपण कोणाला काही किंमत द्यायची नाही, घरातील वडिलधारे असो, मोठे असोत ते आपल्यापुढे काहीच नाहीत. आपण कितीही कसेही वागलो, काहीही चुकीचं केलं तरी आता आपल्याला बोलण्याचा, समजावण्याचा कोणालाच अधिकार नाही, अशी बेताल मानसिकतापण लवकर सेटल होऊन कौटुंबिक जबाबदारी घेतलेल्या, हुशार, बुद्धिमान मुलांची झालेली दिसते. काही ठिकाणी मुलं चुकीच्या बेकायदेशीर मार्गाने पैसा कमवत असतात, त्यांना आर्थिक शिस्त नसते, कुटुंबात ही गोष्ट माहिती असते पण मुलावर अवलंबून असल्याने, तो एकटाच कमवता असल्याने घरातले हतबल असतात. खूपदा मुलं गुन्हेगारी वृत्तीचे, अनेक प्रकारच्या गुन्ह्यात सहभागी असलेले असतात. पालकांना याबद्दल माहिती असले तरी, मुलांची पाठराखण करण्याकरिता, त्यांच्यावरील फाजील प्रेमापोटी पालक काही कारवाई करत नाही, कुठे वाच्यता करत नाही, अथवा वेळेत कोणाचे मार्गदर्शन घेऊन त्याला व त्याच्या मनस्थितीला सुधरविण्यासाठी प्रयत्नही करत नाहीत.

बऱ्याच घरातल्या लोकांनी वेळोवेळी मुला-मुलींना अती लाड, कौतुक करून शेफारून ठेवलेले असते. घरातला मोठा आहे, कामावता आहे, हुशार आहे, एकुलता एक आहे, नवसाचा आहे, कष्टाने मोठा केलेला आहे, तोच एकमेव आधार आहे अशी कारणे देऊन मुलांचे सर्व फाजील हट्ट पुरवलेले असतात. घरातल्यांनी सतत त्यांच्या चुका झाकलेल्या असतात, त्यांचं उद्धट-उर्मट बोलणं, बिनधास्त वागणं याकडे पालकांनी दुर्लक्ष केलेलं असते. मुलं मोठी जरी झालीत, कमवायला लागली, बरोबरीला आली, लग्नाला आली तरी मुलांना चुकीच्या गोष्टी केल्यावर आई-वडिलांकडून वेळीच समज मिळणे, रागावणे आवश्यक आहे. त्यांना डोक्यावर बसू न देणे, त्यांची कानउघडणी करणे आपलं कर्तव्य आहे, हे पालक विसरून जातात. अनेक मुलांचं अथवा मुलींचं विवाहाआधीचे लहानपण ते तरुणपण या कालावधीमध्ये काहीतरी लफडे, प्रेमप्रकरण, पैशांचे गैरव्यवहार, मनमानी कारभार, चुकीची संगत यामुळे आयुष्य भरकटलेली असतात. पुरेसं वय होऊनही लग्न होऊन संसार करण्यासाठी अशी तरुणाई पात्र झालेली नसते. किंबहुना आपण वागतोय तेच योग्य आहे आणि सगळ्यांनी तेच स्वीकारावे अशी त्यांची भूमिका असते.

अनेक तरुण बुद्धिमत्ता असलेली, कमावती मुलं घरातील कोणाचाही आदर करत नसतात, स्वतःचे निर्णय स्वतः परस्पर घेणे, इतरांना अंधारात ठेवणे, फसवणे, घरात हुकूमत गाजवणे असे प्रकार सर्रास मुलं करत असतात. मुला-मुलींच्या अशा वागणुकीला, स्वभावाला त्यांचे आई-वडील, बहीण-भाऊ व इतर नातेवाइक कंटाळलेले अथवा त्रस्त झालेले असतात. अशा वेळी सर्वतोपरी एकच तोडगा काढला जातो, तो म्हणजेच याच किंवा हीचं लग्न लावून द्या म्हणजेच बरोबर जागेवर येईल. वास्तविक जेव्हा आपल्याच घरातील मुलगा अथवा मुलगी आपलं ऐकत नसतो, आपला आदर करत नसतो याचा अर्थ आपण त्याला संस्कार करण्यात, वाढवण्यात, घडवण्यात खूप कमी पडलेलो असतो. तो किती शिकला आहे, किती उच्चपदस्थ आहे, किती कमवतो आहे, किती जबाबदारी घेतो आहे, कुटुंबासाठी किती खर्च करतोय की तो बेरोजगार आहे, काही कमावून आणू शकत नाही, याहीपेक्षा महत्त्वाचे असते तो माणूस म्हणून, व्यक्ती म्हणून तयार झालेला आहे का?

आपण त्याच्यावर योग्य संस्कार केलेत का? त्याला वळण लावलं आहे का, वेळोवेळी त्याला, त्याच्या चुकांना जाब विचारून त्याच्या चुकांना विरोध केला आहे की, त्याच्यावर पांघरून घालून वेळ मारून नेली आहे? आपण त्याला भविष्यातील धोके, चुकीच्या वागणुकीचे परिणाम सांगितले नाहीत, आपण त्याला कायम पाठीशी घालत आलोय, तर लग्नानंतरही त्याला हीच सवय लागून राहील आणि त्याचं वैवाहिक आयुष्य खराब होईल, याचा विचार पालकांनी करणं आवश्यक असते. पण दुर्देवाने अनेक ठिकाणी ते केले जात नाही. अशा वेळी पालकांचे अयशस्वी झालेले बालपणापासूनचे संस्कार, मुलांना घडवण्यात कमकुवत ठरलेलं घरातले, कुटुंबातलं वातावरण यावर उपाययोजना म्हणून त्याचं किंवा तीचं लग्न लावून देणे हाच सर्वोत्तम पर्याय असल्याचे बोलले जाते. आपल्या मुलाच्या सर्व समस्यांवर एकच उत्तर!! ते म्हणजेच त्याचं लग्न असं समजून आयुष्यात येणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीच्या भावभावना, अपेक्षा, स्वप्न फाट्यावर मारून, वेळप्रसंगी त्या व्यक्तीपासून सत्य परिस्थिती लपवून ठेवून, खोटं बोलून, लग्न लावली जातात, केली जातात. तर काही ठिकाणी स्वतःच पुढाकार घेऊन, ओळखीतून, प्रेमातून, नियोजनपूर्वक अफेअर करून, विविध मॅट्रिमोनिअल सोशल साईटवरून स्थळ शोधून, कधी आंतरजातीय तर कधी समोरच्याला फसवून अशी लग्न स्वतःच्या पद्धतीने ठरवून ती पार पाडली जातात.

लग्न करून आयुष्यात आणलेली, आलेली व्यक्ती जणू बालपणापासून ते आजपर्यंत या मुलाला अथवा मुलीला लहानाचे मोठे करताना घरातल्यांनी केलेल्या अथवा झालेल्या सगळ्या चुका, सगळ्या चुकीच्या पद्धती याची दुरुस्ती करायला, सगळं पोटात घालायला, निमूटपणे आहे ते स्वीकारायला, सहन करायला, स्वतःच्या सगळ्या अपेक्षा विसरून आव्हान म्हणून संसार करायलाच आहे, असे सगळेच गृहीत धरून असतात. अशा प्रकारे लग्न झाल्यावर आई-वडील, भाऊ-बहीण इतर लोक मात्र आपण लहानपणापासून आपल्या मुलाला दिलेले चुकीचे संस्कार, चुकीचे विचार, प्रतिकूल वातावरण, दिशाहीन जीवन, वाईट चुकीच्या सवयी यातून अंग काढून घेतात. आपल्या मुलांना आपण जे काही दिलं आहे, दाखवलं आहे, वागवलं आहे ज्यामुळे ते बिघडली आहेत, त्यातून आता पुढील पूर्ण आयुष्य यातून मार्ग काढण्याची, सगळी सहनशक्ती पणाला लावून संसार पेलण्याची जबाबदारी त्याच्या जोडीदाराचीच आहे, अशा अपेक्षा घरातल्यांनी ठेवलेल्या असतात.

लग्नाआधी आपण आपल्या मुलांना वळण लावू शकलो नाही, त्यांना मर्यादा घालू शकलो नाही, त्यांना वेळोवेळी कठोर शब्दांत विरोध करून चुकीच्या गोष्टींपासून परावृत्त करू शकलो नाही, त्यांना आयुष्याचं गणित शिकवू शकलो नाही, ही त्या घरातील आई-वडील, मोठ्या बहिणी-भाऊ घरातील इतर व्यक्तींची चूक असते. अशा प्रकारे आपण बिघडवून ठेवलेल्या आपल्या मुलाला अथवा मुलीला त्यांच्या लग्न होवून आयुष्यात आलेल्या जोडीदाराने सुधरवावे, ताब्यात ठेवावे, त्याच्या वाईट सवयी कमी कराव्यात, त्याला ताब्यात ठेवावे, त्याला बदलावे, त्याच्या वागणुकीत बदल व्हावा तेही सगळं प्रेमाने, काळजीने, आत्मीयतेने हाताळून मिळालेल्या जोडीदाराने सगळं सहन करावं, अशा अपेक्षा करणे कितपत योग्य आहे? ज्या व्यक्तीला लहानपणापासून कोणाचं ऐकणं माहिती नसेल, झुकणं माहिती नसेल, माघार घेणं माहिती नसेल, तर ती व्यक्ती आपल्या जोडीदाराच्या सांगण्याने अचानक स्वतःच्या स्वभावात वागणुकीत बदल करू शकते का? हा विचार करण्याचा मुद्दा आहे. त्यामुळे आपल्या मुला-मुलींना लग्नाआधी आपण जबाबदारीची जाणीव करून देणं, लहानपणापासूनच त्यांच्यावर योग्य ते संस्कार करणं ही पालक आणि घरातील इतर लोकांची जबाबदारी आहे, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. आपलं आणि आपल्यामुळे बिघडलेले, वाया गेलेले आपलं मुल दुसऱ्याच्या गळ्यात मारून, त्याला संसारात अडकवून मग काहीतरी चांगल होईल असा चुकीचा विचार करणे, त्यासाठी दुसऱ्या व्यक्तीचा दुसऱ्या ऐका कुटुंबाचा सत्यानाश करणे, लग्न करून देऊन आपली जबाबदारी झटकणे अत्यंत चुकीचं आहे.

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -