हत्या करणार्या अल्पवयीन मुलाला बापाचीही साथ
वसई : वसई शहरातून एक धक्कादायक घटना (Vasai Crime news) समोर आली आहे. लहान मुलंही इतकी क्रूर असू शकतात यावर विश्वास न बसण्याइतकी ही घटना हादरवणारी आहे. आपल्या शेजारच्या घरातील एक आठवर्षीय मुलगी आपल्याला शेंबड्या असं सातत्याने चिडवते या गोष्टीचा राग सहन न झाल्याने अल्पवयीन मुलाने त्या मुलीचा थेट गळाच घोटला. धक्कादायक बाब म्हणजे हत्या करणार्या मुलाचा बापच मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावत होता तर मुलगा या दरम्यान फरार झाला. पोलीस तपासात या सर्व गोष्टी उघड झाल्याने बापाला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण वसई-विरार परिसर हादरला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वसईतील वसई फाटा येथे ४ डिसेंबरला एका आठ वर्षीय चिमुकलीचा मृतदेह बंद घरातील मोरीत आढळून आला. तिचे पाय नायलॉनच्या बेल्टने बांधलेल्या स्थितीत होते. मृत चिमुरडी आठ वर्षीय होती आणि ती जिल्हा परिषद शाळेत इयत्ता तिसरीत शिकत होती. दरम्यान, याच मुलीच्या वडिलांनी १ डिसेंबर रोजी ती हरवल्याची तक्रार पेल्हार पोलीस ठाण्यात नोंदवली होती.
१ डिसेंबर या दिवशी ती मुलगी आईस्क्रिम आणण्यासाठी दुकानात गेली होती, मात्र पुन्हा घरी आली नाही. त्यामुळे तिच्या घरच्यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली. शिवाय तिला शोधणार्या व्यक्तीसाठी २० हजार रुपये रक्कमही जाहीर केली. मात्र, ४ डिसेंबरला सकाळी ११ वाजेच्या सुमारास जिल्हा परिषदेच्या मागील एका चाळीत या चिमुकलीचा मृतदेह आढळला. पाच नंबर बंद रुममध्ये मोरीत एका प्लास्टिकच्या गोणीत पाय बांधलेल्या आणि कुजलेल्या अवस्थेत मृतदेह मिळाला होता.
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन अहवालासाठी पाठवला. त्यानुसार तिला गळा दाबून मारल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला होता. पोलिसांनी अधिक तपास केल्यावर, त्याच परिसरातील एक अल्पवयीन मुलगा गायब असल्याचं कळलं. पोलिसांनी त्या मुलाच्या वडिलांजवळ चौकशी केली असता खुनाच्या हत्येचा उलगडा झाला.
हत्येचे कारण भयंकर धक्कादायक
मृत मुलगी शेजारी राहणाऱ्या मुलाला ‘शेंबड्या शेंबड्या’ चिडवत होती. त्यामुळे रागाच्या भरात १ डिसेंबरला त्याने तिचा गळा दाबून हत्या केली आणि घडलेली घटना वडिलांना सांगितली. ‘पण बाप तसा बेटा’ याप्रमाणे बापानेही आपले रंग दाखवले. घटना लपवण्यासाठी चिमुकलीचा मृतदेह बापाने बंद खोलीमध्ये बांधलेल्या अवस्थेत ठेवला होता आणि तो त्याची विल्हेवाट लावण्याच्या तयारीत होता. मात्र, त्यापूर्वीच पोलिसांनी या घटनेचा पर्दाफाश केला आहे.
सध्या वडिलांना पोलिसांनी अटक केली आहे तर फरार आरोपी अल्पवयीन मुलगाही जालना येथे सापडल्याची प्राथमिक माहिती आहे.