Tuesday, May 13, 2025

देशताज्या घडामोडीराजकीय

INDIA Alliance Meeting : घमंडियांची बैठक की रुसवेफुगवे?

INDIA Alliance Meeting : घमंडियांची बैठक की रुसवेफुगवे?

एक आजारी, दुसरा नाराज तर तिसर्‍याला माहितच नाही!


मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज पत्रकार परिषदेत जे खुलासे केले आहेत, त्यावरुन इंडिया ही आघाडी (INDIA Alliance) नव्हे तर मतभेद असूनही एकत्र असल्याचे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे, हेच स्पष्ट होत आहे. पाच राज्यांच्या निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांनी पहिलीच बैठक बोलावली आहे. पण या बैठकीसाठी महत्त्वाच्या नेत्यांच्या अुनपस्थितीची कारणे मजेशीर आहेत.


आज दिल्ली येथे खरगेंनी इंडिया आघाडीची बैठक बोलावली आहे. यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitish Kumar)उपस्थित राहू शकणार नाहीत. नितीश कुमार आजारी असल्यामुळे बैठकीला उपस्थित राहणार नसल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली. तर उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव (Akhilesh Yadav) नाराज असल्याचे देखील संजय राऊत यांनी आजच्या पत्रकार परिषदेत सांगितले. त्यामुळे बैठकीआधीच इंडिया आघाडीत रुसवेफुगवे असल्याचं दिसून येत आहे.


बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी तर आपल्याला बैठकीबद्दल कल्पनाच नसल्याचे सांगितले. या बैठकीबाबत मला कोणीही सांगितले नाही किंवा मला फोन करूनही या संदर्भात माहिती देण्यात आली नाही. माझा उत्तर बंगालमध्ये ६ ते ७ दिवसांचा कार्यक्रम आहे. मी इतर योजना देखील केल्या आहेत. आता जर त्यांनी मला बैठकीसाठी बोलावले तर मी माझे कार्यक्रम कसे बदलता येईल?, असं म्हणत ममता बॅनर्जी यांनी असमर्थता दर्शवली आहे.


तर दुसरीकडे आघाडीचा धर्म म्हणून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे संजय राऊत म्हणाले. पण मुख्य नेतेच बैठकीला उपस्थित राहणार नसल्याने ही बैठक कितपत यशस्वी होईल, हा प्रश्नच आहे. शिवाय काँग्रेसच्या पराभवामुळे इंडिया आघाडीतील काँग्रेसचं वर्चस्व कमी झालं आहे, त्यामुळे वाटाघाटी करताना घटक पक्षांमध्ये मतभेद होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment