Tuesday, April 22, 2025
Homeसाप्ताहिककोलाजमाझी मराठी शाळा...

माझी मराठी शाळा…

मनस्विनी: पूर्णिमा शिंदे

माझ्या शाळेने मला काय दिलं… घोडपदेव रामभाऊ भोगले म.न.पा. शाळेमध्ये पहिली ते सातवीपर्यंतचे माझे शिक्षण झाले. माझी शाळा जीवनातील थोर आधारस्तंभ, जिने माझी जडणघडण केली. शाळा म्हणजे केवळ पाटी-पुस्तक, वेळापत्रक नाही, तर अनुभवांचे गाठोडं, ज्ञान, संस्कार, शिस्त यांची शिदोरी आहे. दैनंदिन परिपाठ, दिनचर्या, प्रार्थना, दिनमहात्म्य, खेळाचा तास, पाढे पाठ, फलक लेखन, मंत्रिमंडळाची नेमणूक, विविध स्पर्धा आणि विशेष आनंद म्हणजे इन्स्पेक्शन तास म्हणजे धमालच. मला माझ्या शाळेने आयुष्य घडवण्याची जिद्द, हातोटी, कसोटी, चिकाटी दिली.

आनंद निर्मितीची कला दिली. जीवनाचा सार्थकता, कृतार्थ होणं काय म्हणतात. कुंभार घटाला, मूर्तिकार मूर्तीला आकार देतो ना तसे काम माझ्या शिक्षकांनी केलं. जसे सुवर्णकार सोनं, रत्नपारखी हिरा, तसे शिक्षक प्रत्येकाच्या सुप्त कलागुणांना हेरायचे आणि त्यांचा सर्वांगीण विकास करायचे, ते शिक्षक निरपेक्ष निस्वार्थ! बेंबीच्या देठापासून जीव लावून इतके बारीक लक्ष प्रत्येकाच्या प्रगतीवर असायचं. आमच्या मुलांची इंग्रजी शाळांची फी भरण्याइतकं मोठं आम्हाला जे केलं ते आमच्या या शाळेने…

मराठी भाषा हीच प्रभुत्व, प्रगल्भता आणि परिपक्वता, शब्दमाधुर्य संपन्नता, प्रबोधन घडणं इतकं दिलं, हे फार मूल्यवान आहे. मी माझ्या पाचवीच्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये बृहन्मुंबई महापालिका संपूर्ण मुंबईत प्रथम क्रमांक मिळवून पुढे स्पर्धेची अनेक बक्षिसे मिळवली, आज तर मी प्रथम ताठमानेने, आत्मविश्वासाने बोलते आणि हे आपले मत, निर्णय सहजसुलभ आपल्या शब्दांत मांडण्याची कला याचेच फलित. इतकेच नाही, तर प्रत्येक वळणावर आज माझी २३ वर्षं आसमंत वाईस ॲकॅडमी स्वयंचलित १०००० विद्यार्थी घडलेले वक्तृत्व विकास असो की प्रभावी संभाषण, संवादचातुर्य, निवेदनशैली सूत्रसंचालन, कला इ.मध्ये सर्व क्षेत्रांतील नामांकित विद्यार्थी हे माझे नावारूपाला आले. हा अभिमान, वाचनाची विलक्षण गोडी माझ्या शाळेने निर्माण केली. मग ते काव्यवाचन, अभिवाचन, गद्य पद्य, चाल-लय-ताल-अर्थ साभिनय यातून आम्ही कविता शिकलोच नाही तर कविता जगलो.

ते शिकवतानाचा प्रसंग आजही डोळ्यांसमोर तरळतो, इतकं भरभरून शिकवणं. असे शिक्षक आमच्या प्रगतीपुस्तकात कधीही लाल शेरा येऊ नये म्हणून काळजी घेणारे. आई-वडिलांपेक्षा जास्त वेळ जास्त लक्ष देऊन आणि कोणतीही शिकवणीची कधीच अपेक्षा किंवा आवश्यकता न लागणारे जिव्हाळ्याने आमचा कान पकडून प्रसंगी गालावर पापी घेणारे सुद्धा आमचे शिक्षकच होते. ते निरपेक्ष तर होतेच होते. पण त्याहूनही दर्जेदार शिक्षण आणि फक्त पुस्तकी किडा न होता जीवनाच्या लढाईमध्ये स्वसामर्थ्यावर जीवनात येणारे प्रसंग हाताळताना जे व्यावहारिक ज्ञान लागते, जी संवेदनशीलता लागते ती त्यांनी आम्हाला उत्स्फूर्त, उत्साही अध्यापन शैलीतून आमच्यात बिंबवली.

व्यक्तिमत्त्व, जडणघडण, शिस्त, वळण हे त्यांनीच लावले आणि विद्यार्थी त्यांचा शिकवण्यामध्ये अध्ययनामध्ये रममाण होत. दर्जेदार आणि अतिशय सुंदर मराठी भाषेला वळण लावून आमच्या शब्दप्रभुत्व साहित्य विश्व, वाचन अभिरुची आणणारे असे शिक्षक आम्हाला पदोपदी लाभले आणि त्याचे फलित म्हणून आज मी स्वतःची सहा पुस्तके लिहू शकले. शासनाचे अहवाल लेेखनदेखील मी केले आहेत. माविम, महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र, मुंबई मराठी पत्रकार संघ, मंत्रालय, मुंबई पोलीस, शिक्षण विभाग इत्यादी निवेदन क्षेत्रात आज मी उत्तम निवेदिका, व्याख्याती, कवयित्री, पत्रकार आणि आदर्श शिक्षिका म्हणून सुप्रसिद्ध आहे.

आज आवाजाच्या क्षेत्रामध्ये अनेक जाहिराती, चॅनेलला आवाज देणे, दर्जेदार सूत्रसंचालन शासकीय निमशासकीय करणे अशी स्वतःची ओळख निर्माण करण्याचे धाडस मी माझ्या शाळेमुळे केले. वाचनाचे म्हणाल, तर ही गोडी निर्माण करण्यासाठी मराठी माध्यमाच्या शाळेतून ग्रंथालय आणि कोणती पुस्तके वाचावी त्याबरोबर भविष्यात आणि आयुष्यातही मला जे जे हवे ते लक्षणीय, अनमोल मार्गक्रमण करताना वाचनाचा मला उपयोग क्षणोक्षणी येणाऱ्या परीक्षेला, प्रसंगाला सामोरे जाताना शाळेत घेतलेल्या ज्ञानमंदिरातील ज्ञानापेक्षाही अनुभव व्यवहार ज्ञान पण हे पदोपदी उपयोगी पडले. मग कधी केव्हातरी लावलेली चालसुद्धा पाढे पाठांतर, व्याकरण, नियम भौतिक शास्त्रातील, निबंध भूमितीचे प्रमेय, अनुप्रास, छंद, यमक, अलंकार, वृत्त, मनाचे श्लोक, गीताई हे आजही मनामध्ये रेंगाळतात.

माझ्या मराठी शाळेने मला जे दिले त्याची उतराई होण्याचे भाग्यसुद्धा मला तिने दिले. बृहन्मुंबई महापालिकेच्या मुलींचे शिक्षण या विभागाची सर्व शिक्षा अभियानांतर्गत मी संपूर्ण मुंबई जिल्हाप्रमुख होते. ९ वर्षांच्या कालावधीमध्ये किशोरवयीन मुलींच्या शिक्षणासाठी सर्वांगीण विकास आरोग्य आहार हा प्रकल्प अंदाजपत्रक बनवून स्वतः राबवताना अनेक पथनाट्य, घोषवाक्य स्पर्धा, जाहिराती, काव्यस्पर्धा, व्याख्याने, चित्रकला स्पर्धा, प्रशिक्षण मेळावे राबविले. शिक्षणाचे महत्त्व येण्यासाठी ‘चला शिकू सारे’ नावाची उत्तरा केळकर आणि त्यागराज खाडिलकर यांच्या आवाजामध्ये मी माझी स्वरचित ध्वनिफीत निर्माण केली.

मराठी शाळेमुळेच शैक्षणिक, सामाजिक सांस्कृतिक आणि आर्थिकदृष्ट्या आम्ही सबल झालो. ही सक्षमता, सजगता, हे जग पाहण्याची नवी दृष्टी ही सृजनता मराठी शाळेमुळे लाभली. याचे योगदान सर्व आमच्या मराठी शाळेलाच! “माझी मराठी बोलू कौतुके अमृताचेही पैजा जिंके!” अशा मराठी शाळेमुळे मी, मुलाला लंडन येथे शिक्षणासाठी पाठवू शकले याचा मला सार्थ अभिमान आहे. आयुष्य, भविष्याच्या स्पर्धेमध्ये कोठेही न डगमगता मागे न राहता सतत पुढे जाण्याचे अभिमानास्पद कार्य माझ्या शाळेने केले. आजही शाळेसमोरून जाताना डोळ्यांत पाणी तरळते आणि ‘ती शाळा माझी शाळा आहे, मी त्या शाळेची विद्यार्थिनी आहे’ हे सांगताना प्रथमतः अभिमानाने मान उंचावते, ही जाणीव आमच्या आदर्श शिक्षकांनी आमच्यामध्ये शिस्त आणि शिक्षण पद्धतीमध्ये आम्हाला दिल्यामुळे आज आम्ही त्यांचे खूप खूप ऋण व्यक्त करतो.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -