देशातील पहिल्या महिला गुप्तहेर म्हणून रजनी पंडित यांना ओळखले जाते. खासगी गुप्तहेर म्हणून काम करताना त्यांनी हजारो प्रकरणे मार्गी लावली आहेत. त्यांच्या कामगिरीबाबत त्यांनी दैनिक प्रहारच्या ‘गजाली’ कार्यक्रमात प्रहारच्या टीमसोबत मनमोकळ्या गप्पा केल्या. यावेळी दैनिक प्रहारचे महाव्यवस्थापक मनीष राणे, संपादक डॉ.सुकृत खांडेकर, प्रशासन लेखा विभागाचे प्रमुख ज्ञानेश सावंत यांनी त्यांचे स्वागत केले. गुप्तहेर म्हणजे खूपचं वेगळं व्यक्तिमत्त्व, आव्हानांचे डोंगर बुद्धिचातुर्याच्या जोरावर पेलून सत्याचं मूळ शोधणं म्हणजे हेरगिरी करणे, असे हेरगिरीचे अनेक किस्से रजनी पंडित यांनी आपल्या ओघावत्या व करारी शैलीतून कथन केले आणि गप्पांचा फड रंगत गेला.
तेजस वाघमारे
गुप्तहेर व्हावे, असे ठरवले नव्हते. पण लहानपणापासून माझा स्वभाव सत्याचा शोध घेण्याचा आहे. महाविद्यालयीन शिक्षणासाठी मला माटुंगा येथील रूपारेल महाविद्यालयात प्रवेश मिळाला. सकाळचे कॉलेज असल्याने काही ठिकाणी मी पार्टटाइम जॉब करत होते. जॉबच्या ठिकाणी एका महिलेचा प्रॉब्लेम झाल्याने ती रडायला लागली. मी काय झाले? अशी विचारणा केली असता, महिलेने झाला प्रकार सांगण्यास सुरुवात केली. ती महिला म्हणाली, आताच लग्न करून माझी सून आलीय. आमच्या घरात चोऱ्या व्हायला लागल्या आहेत. मी म्हणाले, बघुयात का कोण करतेय हे. त्यानंतर त्या महिलेने मला तिच्या मुलांचे फोटो दिले. आम्ही त्या मुलांवर पाळत ठेवली. त्यावेळी तिच्या एक मुलगा दुपारी घरी येऊन काहीतरी वस्तू घेऊन जात असल्याचे आम्हाला समजले. तो वस्तू विकायचा नाही. मित्राकडे वस्तू ठेवायचा. त्या मुलाचे फोटो घेऊन त्याच्या आईला मी माहिती दिली, तर आई म्हणाली माझा मुलगा असे करेल असे वाटत नाही. मी त्या महिलेला सर्व माहिती दिली. त्यानुसार ती महिला म्हणाली, मी घरी मीटिंग करते आणि वेळ पडली तर तू ये, असे सांगितले. तिने घरी विषय काढला, तर धाकटा मुलगा म्हणाला की, आपल्या घरी वहिनी चोरी करत असेल. आईला राग आला. तिने त्याच्या कानाखाली वाजवत तू हे उद्योग करतोस आणि तिचे नाव का घेतो, असे विचारताच त्याने कबुली दिली. त्यावेळी सुनेने सासूला बाजूला घेऊन दिराची खासगी माहिती माझ्या कानी आली होती. ती कोणाला देऊ नको असे तो म्हणाला होता. पण भीतीपोटी त्याने हे केले असेल, त्यामुळे त्याला माफ करा असे सुनेने सासूला सांगितले.
अशा गोष्टींमुळे सर्वजण मला गुप्तहेर आहेस, तर हा बिझनेस का सुरू करत नाहीस असे बोलू लागले. कसा बिझनेस करतात, काय करतात माहीत नव्हते आणि डिटेक्टिव्हची पुस्तकेही मी वाचली नव्हती. पिक्चर पाहिले नव्हते. त्यानंतर मी पेपरमध्ये जाहिरात करण्याचे ठरवले. पण कोणी जाहिरात घेत नव्हते. या क्षेत्रात पुरुषांची मक्तेदारी असून आर्मी, पोलीस डिपार्टमेंटमधील लोक यामध्ये असल्याचे लोकांनी सांगितले. या क्षेत्राला लायसन्स नसल्याने मंत्रालयात होम डिपार्टमेंटला गेले. तिथे कोणी ताकास तूर लागू देईना. शेवटी मी एका पत्रकाराचे काम केले. त्याच्या बहिणीचे लग्न झाले होते. लग्नानंतर तिच्या घरी एक पत्र आले होते, तुम्ही ज्याच्याशी लग्न केलेय, त्याचे लग्न झाले आहे. त्या मुलाने त्याला आई-वडील तसेच कोणीच नसल्याचे सांगितले होते. तो डोंबिवलीला शिक्षक म्हणून काम करत होता. मी गुप्तहेरचे काम करते, असे कोणी सांगितल्याने ते माझ्याकडे काम घेऊन आले होते. त्या शिक्षकाशी बोलता बोलता त्याच्या गावची माहिती मी मिळवली, त्याच्या गावी मी आणि माझा भाऊ गेलो. तिथे त्याची माहिती काढली असता, लग्न होऊन त्याला दोन मुले असल्याचे समजले. बायकोशी पटत नसल्याने तो पळून मुंबईला आला होता. हे काम मी करून दिले.
मग त्या पत्रकाराने माझी पहिली मुलाखत श्री मॅक्झीनमध्ये प्रसिद्ध केली. या मुलाखतीनंतर इंग्रजीत ही मुलाखत परस्पर कोणी तरी प्रसिद्ध केली. हे पाहून दिल्ली दूरदर्शनमधून लोक मुलाखतीसाठी घरी आले. मी आईसोबत घरी होते. त्यावेळी केवळ दोनच चॅनल होते. मी अनोळखी माणसांना मुलाखत देणार नसल्याचे सांगितले. ओळखीनंतर ‘हम भी किसीसे कमी नही’. या कार्यक्रमासाठी माझी मुलाखत घेतली. ही मुलाखत पाहून लोकांनी आम्हाला रजनी पंडित यांचा पत्ता हवा असल्याची पत्रे त्यांना पाठवली. यामुळे त्यांचे दोन रूम पत्राने भरले. यानंतर त्यांनी माझा पत्ता आणि फोन नंबर जाहीर केला. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत मला फोन येत होते.
लोकसत्ताचे माधव गडकरी यांच्या एका मित्राचे काम केले. त्यानंतर लोकसत्ताने मुलाखत प्रसिद्ध केली. त्यावेळीही लोकांनी त्यांच्याकडे माझा पत्ता विचारला. त्यांनी १५ दिवसांनी माझा पत्ता जाहीर केला. माझ्याकडे फोन नसल्याने शेजारच्या घरी फोन येत होते. त्यामुळे मी आमदार सुधीर जोशी यांना मला फोनची गरज असल्याचे सांगितले. त्यांनी तत्काळ मला फोन कनेक्शन दिले. इतक्या वर्षांनंतरही तो नंबर आजही सुरू आहे. त्यामुळे मला कुठे जाहिरात करण्यासाठी जावे लागले नाही. सर्व भाषांमध्ये मुलाखती येत गेल्या.
कामे येऊ लागल्याने माझा अनुभव वाढत गेला. अनुभव हाच माणसाचा गुरू असतो. कुठेही गेले तरी तुम्हाला अनुभव काय? हे विचारले जाते. त्याशिवाय तुम्हाला कोणी नोकरी देत नाही. पण अनुभवातून माणूस शिकत जातो, तशी मी शिकले. माझ्याकडे एक मर्डर केस आली. ज्यामध्ये बाईने नवरा आणि मुलाचा खून केला होता. तिथे मला नोकर म्हणून राहायचे होते. मी तिला मला नोकरीची गरज असल्याचे सांगितले. तिथे नोकरी मिळाली. त्या बाईचे बोलणे मी टेप रेकॉर्ड करत होते. एकदा त्या बाईला माझा संशय आल्याने तिने माझ्या मागावर माणसे ठेवली. त्यामुळे मी घरी येऊ शकत नव्हते. एकदा मी तिला चकवा देत आईकडे येऊन गेले. आईला मी रिक्षा, टॅक्सी बदलत बदलत आल्याचे सांगितले. जोवर काम होणार नाही, तोवर मी घरी येणार नसल्याचेही मी सांगितले. जो खुनी पोलिसांना मिळत नव्हता, तो तिच्याबरोबर होता. तो तिला खबरी देत होता. तो एकदा तिच्या घरी आला, पोलीस मागावर असल्याने तू इथे येऊ नको यावरून त्यांच्यात भांडण झाले. यावेळी मी पायावर सुरी पडून घेतली. रक्त येऊ लागल्याने तिने मला डॉक्टरकडे जाण्यास सांगितले. मी खाली जाऊन पोलिसांना फोन केला. त्याला अटक झाली.
यानंतर मी मागे वळून पाहिले नाही. लग्नासाठी कोण कसे आहे हे माहिती नसते. कोणाला व्यसने आहेत का? दिलेली माहिती खरी आहे का? यासाठी कामे येऊ लागली. भीती हा शब्द हा माझ्या शब्दकोषात नाही, त्यामुळे मी कुठेही बिनधास्त प्रवेश करते.
माझे पहिले पुस्तक ‘चेहऱ्याआडचे चेहरे’ हे प्रकाशित झाले. मी प्रकाशकाला एक हजार प्रतींची परवानगी दिली होती. पण त्यांनी माझी परवानगी न घेता अधिक प्रती छापल्या. पुस्तकावर सही घेण्यासाठी एकजण माझ्याकडे आले होते, यावेळी मला पुस्तकामध्ये बराच फरक दिसून आला होता. यामुळे मला संशय आला. बाळासाहेब ठाकरे मला मुलीसारखे मानायचे. त्यांना ते पुस्तक दाखवले. त्यांनी मला माहिती घेण्यास सांगितले.
यावर मी प्रकाशिकाला फोन करून अधिक प्रति छापल्या आहेत का? विचारले. पण तिथून काही माहिती मिळाली नाही. एका कार्यक्रमासाठी पुस्तकाची मागणी आली असता मी एका बुक डेपोकडून पुस्तके मागवली. त्यांनीही मला ३०० पुस्तके दिली. या पुस्तकावर पुण्याचा पत्ता होता. यामध्ये अनेक मोठमोठ्या लोकांनी हे प्रकरण मिटविण्यासाठी मध्यस्थी केली.
मी पुण्यात गेले. पण तिथे मला मारण्यासाठी बरेच लोक जमले होते. मी मुंबईला न येता पुण्यातच मला लोक मारण्यासाठी आल्याची तक्रार दिली होती. त्यानंतर मी कोर्टात केस केली. तिथेही मला लोक मारण्यासाठी आले, मला हे समजल्याने मी माझी गाडी तिथेच ठेवून दुसऱ्या गेटने घर गाठले. या केसमध्ये विजय झाला. आतापर्यंत मला ७९ पुरस्कार मिळाले आहेत.
आजवरच्या प्रवासात नामांकित लोकांची भेट झाली आहे. मध्यमवर्गीय लोक आता गुप्तहेरांची मदत मोठ्या प्रमाणात घेत आहेत. घराघरांत अडचणी आहेत. कौटुंबिक केसेस अधिक असून व्हाइट कॉलर गुन्हेगारी अधिक आहे. डिटेक्टिव्ह ही आज समाजाची गरज आहे. पोलीस किंवा सरकारकडून त्याची दखल घेतली जात नाही. मला एका पोलीस आयुक्तांनी तुमची आम्हाला गरज असल्याने तुम्ही डायरेक्ट भरती होण्याची ऑफर दिली होती. मला कोणाच्या अंडर काम करायचे नाही सांगून मी ऑफर धुडकावून लावली. मी स्वतंत्र असल्याने वरून कोणी फोन करून हे काम बंद करा असे सांगू शकत नाही आणि मला पाहिजे त्या विचाराने मी पुढे जाऊ शकते. मी अनेक राजकीय लोकांच्याही केसेस केल्या आहेत. मी गुप्तहेर बनण्यासाठी ट्रेनिंग देत असून आतापर्यंत ५० मुलांना प्रशिक्षित केले आहे. यासाठी माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे ट्रेनिंग स्कूलसाठी जागा मागितली होती. पण त्यानंतर त्यांचे पद गेल्याने मी पुन्हा पाठपुरावा केला नाही.
ऑस्ट्रेलियामध्ये माझा कार्यक्रम होता, तर त्या दिवशी लोकांना कार्यक्रमाला उपस्थित राहता यावे, यासाठी सर्व कार्यालयांना सुट्टी देण्यात आली होती. फॉरेनच्या केसेस माझ्याकडे येऊ लागल्या आहेत. या व्यवसायाला परवाना देण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला पाहिजे.
आधुनिक काळातील बहिर्जी
ज्ञानेश सावंत
‘बहुरूपी’ हा शब्द आपण अनेक वेळा ऐकला असेल, ‘बहुरूपी’ म्हणजे ‘वेश’ बदलणारा. इतिहासात अनेक बहुरूप्यांच्या गोष्टी वाचायला मिळतात. इतिहास हा माझा आवडता विषय. त्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्टी वाचणे म्हणजे सोन्याहून पिवळे. लहानपणीच शिवाजी महाराजांच्या गोष्टींतून बहिर्जी नाईक यांची ओळख झाली. बहिर्जी नाईक हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तचर विभागाचे प्रमुख होते. त्यांच्या रहस्यमय कथा वाचायला मला खूप आवडतात. नंतर मी शिवाजी सावंतांची कादंबरी वाचली. त्यात त्यांच्या हेरगिरीचा प्रवास उलगडत गेला. तो मनाला इतका भावला की, त्यांना जवळून पाहावेसे वाटायचे; परंतु ते कधीच शक्य नाही. हे माहीत असूनही मनात एक हुरहुर होती; परंतु ती माझी इच्छा आपल्या दैनिक प्रहारने पूर्ण केली, ती रजनी पंडित यांच्या रूपाने. अनेकजण रजनी पंडित यांना ओळखतात, पण आम्हाला त्यांना प्रत्यक्ष पाहता आले. त्यांच्या प्रवासातील अनुभव त्यांच्या तोंडून ऐकता आले, हे भाग्यच म्हणावे लागेल. त्यांचा हा प्रवास ऐकताना मला सतत बहिर्जी नाईक यांची आठवण येत होती.
रजनी पंडित एक सामान्य व्यक्तिमत्त्व पण असामान्य कतृत्व. हेरगिरीचा त्यांचा प्रवास स्वतःच्या घरातूनच सुरू झाला. एका नातेवाइकाच्या लग्नात दिलेल्या साड्यांचा घोळ त्यांनी शोधून काढला. त्यानंतर त्यांना नातेवाइकांचा रोषदेखील ओढवून घ्यावा लागला होता. घरातून सुरू झालेला हा प्रवास आता सातासमुद्रापार पोहोचला आहे. त्यांची देहयष्टी सामान्य; परंतु स्वभाव अत्यंत कडक शिस्तीचा, त्यांच्या साधेपणात एक प्रकारचा करारी बाणा दडलेला. तो जो कोणी अनुभवेल, त्यालाच समजू शकतो. त्यांना कमी गुण मिळाल्यामुळे रूपारेल कॉलेजच्या प्राचार्यांनी प्रवेश नाकारला होता. तिथेही त्यांनी हेरगिरी करून स्वत:च्या कमी गुण मिळालेल्या नातेवाइकाला प्रवेश देणाऱ्या प्राचार्यांना जाब विचारला आणि स्वत:सह मैत्रिणींना प्रवेश देण्यास भाग पाडले होते. त्यांचा सत्याचा शोध घेण्याचा स्वभाव त्यांना शांत बसू देईना. सत्य शोधण्यासाठी त्यांनी बुद्धिकौशल्य पणाला लावले. कोणतेही प्रशिक्षण न घेता त्या हेरगिरी अनुभवातून शिकत गेल्या.
आग्रा येथून पळताना जसा बहिर्जींच्या जीवाला धोका होता, तसे अनेक प्रसंग रजनी पंडित यांनी काम करताना अनुभले. प्रत्यक्षात आपल्याला मारण्यासाठी मारेकरी शोध घेत आहेत, हे माहीत असताना देखील त्या गुप्तपणे आणि सहीसलामत आईला भेटण्यासाठी घरी पोहोचत. त्यांनी हेरगिरीला व्यवसायाचे स्वरूप दिले. हा व्यवसाय मुंबईतून सुरू झाला. आता त्याची देश आणि विदेशांत व्याप्ती वाढवली. दुबई, कॅनडा, कोरिया, ऑस्ट्रेलिया, अमेरिकन देशांत त्यांचा नावलौकीक वाढला आहे. परदेशातील लोक त्यांच्याकडून ही विद्या शिकून घेत आहेत. अनेक देशांत त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. या प्रवासात त्यांची अनेक मोठ-मोठ्या लोकांशी, नेत्यांशी ओळख झाली; परंतु त्या ओळखीचा त्यांनी कधी स्वतःसाठी उपयोग करून घेतला नाही. बहिर्जी नाईक यांच्याप्रमाणेच रजनीताईंनी अनेकदा वेशांतर करून सत्याचा उलगडा केला. बहिर्जी नाईक कधी फकीर, वासुदेव, कोळी, भिकारी, संत, कुठलाही वेशांतर करण्यात पटाईत होते. ते विजापूरचा आदिलशहा आणि दिल्लीच्या बादशहाला भारी पडले. हेर असल्याचा संशय जरी आला तरी कत्तल करणारे हे दोन्ही बादशहा बहिर्जींना एकदादेखील पकडू शकले नाहीत, तसेच यश रजनीताईंना मिळत गेले. एकदा तर त्या वेशांतर करून सहा महिने मोलकरणीच्या रूपात वावरत होत्या, त्यांनी अशी शेकडो रूपे बदलली. मात्र त्या वेषांतराची त्यांनी कुठेही वाच्यता देखील केली नाही. कारण हा प्रवासच रहस्यमय असून, कोणाचीही गुपिते त्या सार्वजनिक करू इच्छीत नाहीत. कोणास ठाऊक त्यांच्या मनाच्या तिजोरीत किती रहस्यकथा दडल्या आहेत! त्यांच्या या प्रवासात त्या आजही प्रचंड उत्साही आणि आनंदी आहेत. मात्र त्यांच्या हेरगिरीच्या व्यवसायाला सरकारी परवाना मिळला नाही. तो मिळवण्यासाठी त्या प्रयत्न करीत आहेत. तो त्यांना मिळावा, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
मै तहकिकात करूंगी
विनिशा धामणकर
विश्वास. बदलत्या जगात वेगाने बदलत जाणारी ही भावना काही वेळा नातेसंबंधांना चिरडून माणसाच्या मन, मेंदूतून निघून जाते. पण वेळीच काही गोष्टींचा सोक्षमोक्ष लावला, तर योग्य निर्णय घेता येतो. उदाहरणार्थ, मुलामुलींचं लग्न ठरलं आणि त्यातील मुलगा मुलीला किंवा मुलगी मुलाला भेटायला तयारच होत नसेल, बोलणी करायला टाळाटाळ करत असेल, तर समजावं ‘दाल में कुछ काला हैं…’ अशा वेळी नातेवाईक, मध्यस्थ फार काही करू शकत नाही, कारण त्यांनासुद्धा ती मुलं, मुली चांगली गुंडाळू शकतात. रजनी पंडित यांची मात्र यात फार मदत होऊ शकते. हेरगिरीच्या प्रांतात उगीच नाही त्यांचे नाव अधिकारवाणीने घेतले जात. लग्नात रस न घेणाऱ्या मुला-मुलींचा सातबारा रजनी तुमच्यापुढे मांडू शकतात. मग आपल्या मुलीची किंवा मुलाची ही लग्नगाठ बांधायची की नाही हे तुम्ही ठरवू शकता.
तुमच्या हसत्या खेळत्या घरात अचानक बेबनावाचं वादळ आलं आणि ते शमता शमत नसेल तर…? बरोबर… ‘दाल पुरी काली हैं’ असं समजावं. नवऱ्याची किंवा बायकोची काहीतरी भानगड सुरू असेल आणि त्यामुळे निष्ठावंत जोडीदाराला मनस्ताप होत असेल, तर त्याचं/तिचं नेमकं काय चाललं आहे हे रजनी तुम्हाला सांगू शकतात.
लग्नबंधनाव्यतिरिक्त नोकरी लावताना उमेदवाराची शहानिशा करणे, हरवलेल्या व्यक्तीला शोधणे, एखाद्यावर नजर ठेवणे, आपल्या ओळखीचा, पार्श्वभूमीचा कोणी गैरफायदा घेत असेल, तर त्याच्याविषयी माहिती काढणे अशी कामेही करतात. रजनी लोकांना त्यांच्या आयुष्याला कठीण वळणावर आणून ठेवलेल्या मनस्तापातून सोडवण्यासाठी हा धोका पत्करतात. ३० वर्षांच्या या गुप्तहेरीच्या काळात रजनी यांनी ८० हजार अशी प्रकरणं उघडकीस आणली आहेत. यामुळे किती लोकांची आयुष्ये उद्ध्वस्त होण्यापासून वाचली, याचा आपण अंदाज करू शकतो.
रजनीच्या गरुडनजरेतून खरा-खोटा माणूस सुटत नाही. म्हणूनच ‘दिल की बात बता देता हैं, असली नक़ली चेहरा’ हे जणू त्यांच्या कामाचं घोषवाक्यच झालं आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांच्या कामाची नोंद घेतली गेल्यानेच त्या दूरदर्शनच्या ‘हिरकणी’ पुरस्कारासह ५७ पुरस्कारांच्या मानकरी ठरल्या आहेत. कसलंही प्रशिक्षण नसताना हे कसं काय साध्य केलं? असा प्रश्न त्यांना प्रहार गजालीच्या कार्यक्रमात विचारला, तेव्हा ‘गुप्तहेर जन्मावा लागतो’ असं मार्मिक उत्तर त्यांनी दिलं. आताच्या तांत्रिकदृष्ट्या प्रबळ समाजात त्यांच्या कामाचे आव्हान वाढले आहे. यावर त्यांचं उत्तर नक्कीच असेल, ‘मै तहकिकात करूंगी.’
भारतातील पहिल्या खासगी महिला गुप्तहेर
वैष्णवी भोगले
अनेक टीव्ही मालिका, चित्रपट, पुस्तकांमधून पाहिलेल्या, वाचलेल्या गुप्तहेरांविषयी अनेकांच्या मनात कुतूहल असते. कारण गुप्तहेर आपल्या बुद्धिमतेच्या बळावर घटनेचा मागोवा घेऊन रहस्ये उलगडतात. या क्षेत्रात जितकी आव्हाने आहेत तितकेच ते धोकेही आहेत. कधी, कसे जीवावर बेतेल सांगता येत नाही. या क्षेत्रात घटनेचा पाठपुरावा करताना चौफेर नजर ठेवून युक्तीने शोधकार्य करावे लागते. प्रहार गजालीच्या सतराव्या सत्रात लेडी जेम्स बॉण्ड अर्थात भारतातील पहिली खासगी गुप्तहेर महिला रजनी पंडित यांच्याशी गप्पा रंगल्या, तेव्हा या क्षेत्रातील रहस्येही उलगडू लागली.
रजनी पंडित यांचे शालेय शिक्षण त्यांच्या जन्मगावी म्हणजे पालघर जिल्ह्यातच पूर्ण झाले. लहानपणीच त्यांना आपल्यातील क्षमतेची जाणीव झाली. पुढे मराठी साहित्याचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी मुंबईच्या रूपारेल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. पण त्यांनी कोणतेही हेरगिरिचे प्रशिक्षण घेतले नाही. वडील सीआयडीमध्ये होते. या क्षेत्राविषयी घरच्यांना चांगलीच कल्पना असल्याने घरच्यांचा स्पष्ट नकार होता. मात्र आईने रजनीला सहकार्य केले. त्यांची एक मैत्रीण व्यसनांच्या आहारी गेली होती. त्यांनी या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन पालकांच्या मदतीने व्यसनांमधून तिला बाहेर काढले. त्यावेळी मैत्रिणीचे वडील पाठीवर कौतुकाची थाप देत म्हणाले, “अरे व्वा! तू तर स्पाय आहेस.” त्यानंतर ‘स्पाय’ हा शब्द त्यांच्या मनावर कायमचा कोरला गेला आणि हेच आपले जीवनध्येय हे त्यांनी निश्चित केले.
हेरगिरी करण्यासाठी त्यांना अनेकदा जीव धोक्यात घालावा लागला. कधी मोलकरीण, तर कधी मनोरुग्ण बनून त्यांना घटनेच्या ठिकाणी प्रवेश करावा लागला. गुप्तहेर हा एक चांगला अभिनेता कसा असतो, याचं उत्तम उदाहरण म्हणजे रजनी पंडित. त्यांनी अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होण्यापासून वाचवली. रजनी यांचे कार्य इतके प्रभावी होते की, पोलीसदेखील त्यांची मदत घेऊ लागले. त्यांनी आजवर ८० हजारांच्या वर प्रकरणे हाताळली आहेत. ‘फेसेस बिहाइंड फेसेस’ आणि ‘मायाजाल’ या पुस्तकांमधून त्यांनी आपल्या या क्षेत्राचा लेखाजोखा मांडला आहे. भारतात ३० वर्षांपूर्वी हेरगिरीच्या क्षेत्रात महिला नव्हत्या. १९९८ मध्ये त्यांनी सुरू केलेल्या स्वत:च्या गुप्तहेर एजन्सीत आज अनेक मुलं-मुली काम करत आहेत. रजनी यांनी खरं तर या क्षेत्राचे दरवाजे महिलांसाठी उघडले. स्त्रिया फक्त घर, संसारच सांभाळू शकत नाहीत, तर करिअरच्या वेगळ्या वाटाही निवडून त्यात यशस्वी होऊ शकतात, हेच रजनी पंडित यांच्या कारकिर्दीकडे पाहिल्यावर वाटतं. त्यांच्या या हेरगिरीने आजच्या मुलींच्या करिअरमध्येही सकारात्मक शिरकाव केला आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.