Thursday, April 24, 2025
Homeसंपादकीयरविवार मंथनभाषेचे बोट धरून जगताना...

भाषेचे बोट धरून जगताना…

मायभाषा: डॉ. वीणा सानेकर

अलीकडे कन्टेंट क्रिएटर किंवा कन्टेन्ट रायटर हा शब्द सतत कानावर पडतो. ‘आशय निर्माण करणारा’ असा या शब्दाचा अर्थ होईल. कोणताही आशय निर्माण करण्यासाठी भाषेवर प्रभुत्व असणे महत्त्वाचे ठरते. आज अनेक विषयांवरचे तयार अभ्यासक्रम बाजारात दिसतात आणि ते शिकण्याकरिता भरमसाट फी देखील द्यावी लागते. या सर्वात नव्या पिढीमध्ये तर असाच समज रुजला आहे की, पैसे मोजले की वाटेल ते शिकता येते. थोडक्यात सांगायचे तर पैसे खर्च केले की, कौशल्य आत्मसात करता येते हे तितकेसे खरे नाही. मात्र त्या विषयाबद्दलच्या आस्थेने, जिज्ञासेने, इच्छाशक्तीने एखादे कौशल्य नक्कीच प्राप्त करता येते.

आमच्या महाविद्यालयात आम्हा सर्व विद्यार्थ्यांना सोबत घेऊन अप्रतिम कार्यक्रम साकार करणारे शशिकांत जयवंत सर होते. सरांनी एखादी संकल्पना शोधली की, आम्हा सर्वांना सर तिच्याभोवती फिरत ठेवायचे. अनेक अंगांनी तो विषय आम्ही समजून घ्यायचो. कार्यक्रमाच्या तयारीसाठी म्हणून संदर्भ पुस्तकांचा अभ्यास करण्याची सवय मला त्यातूनच लागली आणि विविध विषयांवरील एकेका कार्यक्रमाकरिता संहिता लिहिण्याचे कौशल्य प्राप्त करता आले किंवा प्रयत्नपूर्वक मी आत्मसात केले.

कोणताही आशय निर्माण करताना एखाद्या विषयाचे विविध पैलू लक्षात घ्यावे लागतात. खेरीज माहिती बरीच शोधली तरी त्या माहितीची गुंफण करणे हे एक आव्हान असते. सादरीकरणाच्या माध्यमातून एखादा विषय पोहोचवत असताना शैली सहज व सुगम असणे महत्त्वाचे असते. हे सर्व करताना भाषा लवचिकपणे वापरता आली पाहिजे.

मराठीत इतकी विपुल ग्रंथसंपदा आहे की, एखादा विषय निवडला की त्याचे सादरीकरण करताना कवितेच्या ओळी, किस्से, एखादी लघुकथा, नाट्यांश अशा अनेक अंगांनी त्या विषयाला भिडता येते. संहिता लेखनाच्या माध्यमातून मी खूप काही शिकले. म्हणजे एखादा विस्तृत विषय मोजक्या शब्दांत कसा मांडायचा इथपासून एखादा छोटासा विषय कसा फुलवत न्यायचा इथपर्यंत! गाण्यांच्या कार्यक्रमासाठी संहिता तयार करताना विविध संदर्भांचे जोडकाम करावे लागते नि या सर्व युक्त्या-प्रयुक्त्या आपल्या आपल्यालाच शिकाव्या लागतात.

निवेदनाकरता संहिता लिहीत असताना मी आकाशवाणीकरिता लेखन करू लागले. श्रोत्यांना सहजपणे समजेल अशी भाषा हे आकाशवाणीचे बलस्थान. इथल्या अनुभवातून सहज व सोपे बोलता येणे कठीण असते, हेही उमगले. वक्त्याकडे समोरच्या श्रोतृवृंदाला धरून ठेवण्याची ताकद असली पाहिजे नि त्याकरिता आवश्यक घटक म्हणजे वक्ता योजत असलेली भाषा!

खरे तर निवेदनाकरिता संहिता निर्मितीतून मी एकपात्री सादरीकरणाकडे वळले. ‘आकाश विंदांच्या शब्दांचे’, ‘मृण्मयी इंदिरा’, ‘रसयात्रा कुसुमाग्रजांची’ हे माझे कार्यक्रम यातूनच साकारले. खेरीज सव्वा ते दीड तासांचा कार्यक्रम एकाच व्यक्तीने सादर करणेही आव्हानात्मक असते. आरोह, अवरोह, स्वर, नाद, लय, ताल, विराम अशा सर्व घटकांचा वापर सृजनशीलतेने करता यायला हवा. कवितावाचनाचा याकरिता मला खूप उपयोग झाला. मराठीबरोबरच हिंदीतील कवितांचा अनुवाद पूरक ठरला. खरे तर कुठल्याच गोष्टीचे मी रितसर प्रशिक्षण घेतले नाही. पण पुस्तकांशी मात्र स्वत:ला कायम जोडून घेतले. भाषेचे बोट अधिकाधिक घट्ट धरून ठेवले नि आता तर त्याची इतकी सवय झाली आहे की त्याच्याविना
एकटे वाटते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -