Wednesday, July 24, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखवंचित समाजातील लेडी बॉस

वंचित समाजातील लेडी बॉस

दी लेडी बॉस: अर्चना सोंडे

डॉ.बाबासाहेब आंबेडकर विलायतेस शिकायला होते. आर्थिक परिस्थिती मात्र प्रचंड हलाखीची होती. त्यांच्या पत्नी रमाई, वाहिनी लक्ष्मीबाई या माटुंगा, माहीम परिसरातून लाकूड फाटा गोळा करत आणि बाजारात विकत. (बाबासाहेब त्या काळी परळ भागात राहायचे आणि माटुंगा, माहीम परिसर हा जंगलभाग होता.) त्यातून जे काही तुटपुंजे पैसे मिळत त्यातून त्या संसाराचा गाडा हाकत होत्या. योगीराज बागूल यांच्या ‘प्रिय रामू’ या पुस्तकातील हा संघर्षमय भाग वाचताना मला तिची आठवण झाली. वंचित समाजातल्या त्या मुलीने वेगवेगळ्या कारखान्यांत जाऊन कोळसा वेचला आणि तो निरनिराळ्या दुकानात जाऊन विकला. पुढे जाऊन ती सिरामिक्स कंपनीची मालकीण झाली. कोळसा वेचण्यासाठी साधी मोडकी हातगाडी वापरणारी ती आज ऑडी, बीएमडब्ल्यू, मर्सिडिज यासारख्या आलिशान गाड्या वापरते. ही गोष्ट आहे, वंचित समाजातील महिला उद्योजिका सविताबेन कोळसावालाची.

सविताबेनचा जन्म गुजरातच्या औद्योगिक राजधानी अहमदाबाद येथील एका वंचित कुटुंबात झाला. घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. त्यामुळे पुढे शिकता आलं नाही. त्या काळातील रिवाजानुसार तिचं लवकर लग्न झालं. नवरा बस कंडक्टर होता. आर्थिक परिस्थिती मात्र यथातथाच होती. नवरा एकटा कमावणारा आणि खाणारी तोंडे दहा. आपणसुद्धा कुटुंबाला, संसाराला हातभार लावावा म्हणून तिने कमावण्याचा निर्णय घेतला. पण तिला पहिला अडथळा आला तो म्हणजे तिच्या अशिक्षित आणि त्यात दलित महिला असण्याचा. महिलेला नोकरी देण्यास फारसे लोक तयार नव्हते. सरतेशेवटी तिने स्थानिक दुकानात कोळसा विकायला सुरुवात केली. कोळसा विकत घेण्यासाठी तिच्याकडे पुरेसे पैसे नसल्यामुळे ती गिरण्यांमधून गोळा केलेला अर्धा जळालेला कोळसा वेचायची. विकण्यासाठी ती घरोघरी गेली. मात्र तिला येथे तिच्या दुसऱ्या सर्वात मोठ्या अडथळ्याचा सामना करावा लागला. ती दलित महिला असल्याने तिला पाहताच क्षणी दरवाजा बंद केला जाई. तिच्यावर विश्वास ठेवता येईल की नाही किंवा ती दुसऱ्या दिवशी सर्व कोळसा घेऊन पळून जाईल, असे सांगून व्यावसायिकांनी तिच्याकडून कोळसा घेण्यास नकार दिला.

आव्हानांना न जुमानता ती कष्ट करत राहिली. हळूहळू पण लोकांचा तिच्यावर विश्वास बसला. अनेक ग्राहक तिच्याकडून कोळसा घेऊ लागले. तिच्या मेहनतीचे फळ तिला मिळू लागले. पैशाला पैसे ती जोडत होती. मिळालेल्या फायद्यातून आणि जमवलेल्या पैशातून तिने कोळशाचे एक छोटे दुकान सुरू केले. तिच्या परिसरात सिरॅमिक अनेक छोटे-मोठे कारखाने होते. या कारखान्यांना कोळसा लागायचा. सविताबेन त्यांना कोळसा पुरवू लागली. कोळसा वाटपासाठी आणि कोळशाचे पैसे गोळा करण्यासाठी ती वेगवेगळ्या कारखान्यांमध्ये जाई. या दरम्यान तेथील कारखानदारांसोबत तिची ओळख झाली. सिरॅमिकचे कारखाने कसे चालवले जातात, हे तिने जाणून घेतले.

सिरॅमिक फॅक्टरीची संपूर्ण कल्पना आवडल्याने तिने स्वतःचा एक कारखाना सुरू करण्याचा निर्णय घेतला. तिने तिच्या छोट्याशा दुकानातून पैसे वाचवले आणि एका छोट्या सिरॅमिक कारखान्यात गुंतवणूक केली. हा कारखाना चांगला चालला. सविताबेन उद्योजिका झाल्या आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. त्यांनी बनवलेले सिरॅमिक स्वस्त दरात विकले जाऊ लागले. नफा वाढू लागला. प्रामाणिकपणा आणि मेहनत यामुळे या क्षेत्रात देखील त्यांनी ग्राहकांचा विश्वास संपादन केला. सिरॅमिक उद्योग आणि उद्योजकीय जगतात स्वतःची ओळख निर्माण केली. १९८९ मध्ये त्यांनी प्रीमियर सिरॅमिक्स सुरू केले आणि १९९१ पर्यंत स्टर्लिंग सिरॅमिक्स लिमिटेडची स्थापना केली. पुढे विविध सिरॅमिक्स उत्पादनांच्या निर्यातीमध्ये त्यांनी प्रवेश केला. त्यांची मुले आता त्यांचा व्यवसाय सांभाळत आहेत.

सविताबेन यांनी कोळसा विकण्यासाठी एक छोटीशी हातगाडी घेतली होती. त्या हातगाडीने सुरुवात केलेल्या सविताबेनकडे आज ऑडी, पजेरो, बीएमडब्ल्यू आणि मर्सिडीज यांसारख्या आलिशान गाड्या आहेत. भारतीय महिला उद्योजकांमध्ये त्यांना मानाचं स्थान आहे. सविताबेन यांच्यासारख्या वंचित समाजातील असंख्य महिला आज उद्योगक्षेत्रात ‘लेडी बॉस’ म्हणून नावारूपास येत आहेत. स्वत:चं कर्तृत्व सिद्ध करत आहेत. मात्र त्यांना ही उमेद, ही ऊर्जा मिळाली ती भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे. त्या महामानवामुळे हा वंचित समाज आणि महिला वर्ग संधी निर्माण करत आहे. यशाची शिखरे पादाक्रांत करत आहे. सर्वार्थाने सविताबेनसारख्या महिला आपापल्या क्षेत्रांत ‘लेडी बॉस’ ठरत आहेत.
theladybosspower@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -