Tuesday, May 13, 2025

महाराष्ट्रब्रेकिंग न्यूजराजकीयमहत्वाची बातमी

Pawar vs Pawar : 'नणंद-भावजय' करणार एकमेकींवर 'प्रहार'

Pawar vs Pawar : 'नणंद-भावजय' करणार एकमेकींवर 'प्रहार'

बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार 'सामना' रंगणार की भाचा पार्थ टक्कर देणार?


बारामती : बारामती लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केल्याने सुप्रिया सुळे (Supriya Sule), सुनेत्रा पवार (Sunetra Pawar), पार्थ पवार (Parth Pawar) यांची नावे चर्चेत आली आहेत. शरद पवार (Sharad Pawar) गटाकडून उमेदवार निश्चित आहे. दादा गटाचा उमेदवार कोण? याबाबत मात्र राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरु आहेत.


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) कार्यकर्ता मेळाव्यात अजित पवार यांनी शरद पवार गटाकडे असलेल्या चारही लोकसभा जागा लढविण्याचा निर्धार व्यक्त केला. या निर्धारामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात (Baramati Lok Sabha Constituency) 'पवार विरुद्ध पवार' (Pawar vs. Pawar) असा सामना रंगणार हे आता स्पष्ट झाले आहे. 'साहेब विरुद्ध दादा' असे या सामन्याला स्वरुप प्राप्त झाले असले तरी प्रत्यक्षात लढत कशी होणार, 'नणंद-भावजय' एकमेकींवर 'प्रहार' करणार की भाचा पार्थ आपल्या आत्याला टक्कर देणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.


शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे याच उमेदवार असतील हे निश्चित आहे. मात्र, अजित पवार यांच्याकडून कोण मैदानात उतरणार याबाबत उत्सुकता आहे. या मेळाव्यानंतर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि चिरंजीव पार्थ पवार यांची नावे चर्चेत आहेत.


अजित पवार गटाने जर सुनेत्रा पवार यांना मैदानात उतरवले तर बारामतीमध्ये 'नणंद विरुद्ध भावजय' असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत. सुप्रिया सुळे या शरद पवार यांच्या कन्या आणि अजित पवार यांच्या भगिनी आहेत. त्यामुळे त्या सुनेत्रा यांच्या नात्याने नणंद लागतात. आजवर राज्याच्या इतिहासात पवार कुटुंबीयांकडे प्रचंड आदराने पाहिले जात होते. त्यामुळे सहाजिकच नणंद भावजय यांचे नातेही किती सलोख्याचे आहे हे महाराष्ट्राने अनुभवले आहे. आजही विविध कार्यक्रमांतून त्याचे दर्शन घडते. अशा वेळी, राजकारणाच्या आखाड्यात हे नाते जर विरोधक म्हणून परस्परांविरोधात उभे ठाकले तर त्याचे स्वरुप कसे असेल याबाबत सर्वांना उत्सुकता आहे.


दुसऱ्या बाजूला अशीही एक चर्चा आहे की, अजित पवार गटाकडून पार्थ पवार यांना संधी दिली जाऊ शकते. पार्थ पवार यांनी २०१९ मध्ये मावळ येथून लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र, तत्कालीन शिवसेना उमेदवार श्रीरंग बारणे यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे त्यांना उमेदवारी दिल्यास बारामती लोकसभा मतदारसंघात आत्या विरुद्ध भाचा अशी लढत पाहायला मिळू शकते.


दरम्यान, आजवर पवार कुटुंबीयांतील मतभेत कधीही चव्हाट्यावर आले नाहीत. पवार कुटुंबातील अजित पवार यांनी मात्र वेगळी भूमिका घेतल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे.

Comments
Add Comment