तिरूअनंतपुरम: भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या टी-२० सामन्यात हरवले. यावेळेस तिरूअनंतपुरम येथे खेळवण्यात आलेल्या सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला ४४ धावांनी हरवले. भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकांत ४ बाद २३५ धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियासमोर हे मोठे आव्हान होते. ऑस्ट्रेलियाकडून मार्कस स्टॉयनिसने सर्वाधिक ४५ धावांची खेळी केली मात्र ती संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही. भारतासाठी रवी बिश्नोई आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी ३-३ विकेट मिळवल्या.
सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतासाठी ऋतुराज गायकवाड यांनी ५८ धावांची खेळी केली. याशिवाय यशस्वी जायसवालने जबरदस्त फलंदाजी करताना ५३ आणि ईशान किशनने ५२ धावांची खेळी केली.
सुरूवातीलाच ऑस्ट्रेलियाने टेकले गुडघे
२३६ धावांचे विशाल आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाने सुरूवातीपासूनच गुडघे टेकले होते. ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या ओव्हरमध्ये ३५ धावांमध्ये पहिला विकेट गमावला होता. पाचव्या ओव्हरमध्ये लगेचच जोश इंग्लिस यांची विकेट गेली. सहाव्या ओव्हरमध्ये ग्लेन मॅक्सवेल १२ धावांवर अक्षर पटेलकडून बाद झाला. स्टीव्ह स्मिथच्या रूपात ऑस्ट्रेलियाला चौथा झटका बसला. यानंतर पाचव्या विकेटसाठी मार्कस स्टॉयनिस आणि टीम डेविड यांनी ३८ बॉलमध्ये ८१ धावांची खेळी केली.
भारतीय गोलंदाज सातत्याने विकेट घेत होते. भारतासाठी रवी बिश्नोई आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी ३-३ विकेट मिळवल्या. या दरम्यान बिश्नोईने ४ ओव्हरमध्ये ३२ आणि कृ्ष्णाने १४ ओव्हरमध्ये ४१ धावा दिल्या. याशिवाय अर्शदीप सिंह, मुकेश कुमार आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी १-१ विकेट मिळवली.