Friday, July 19, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखआजार आहेत आणि उपायही...

आजार आहेत आणि उपायही…

डॉ. दिलीप शिरसाठ

जागतिक एड्स दिन १ डिसेंबरला पाळला जातो. यायोगे एड्ससारख्या जीवघेण्या आजाराप्रति जागृती निर्माण करण्याचे काम सातत्याने होत असले तरी अजूनही बरेच काम होणे गरजेचे आहे. दुसरीकडे थंडीचा काळ सुरू होत आहे. या काळात देशभर अस्थमाग्रस्त रुग्णांची संख्या वाढताना दिसते. वाढत्या प्रदूषणामुळे आता ही समस्या अधिक गंभीर होत आहे. त्यामुळे याविषयीदेखील सविस्तर माहिती घ्यायला हवी.

भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या देशातल्या आरोग्य समस्यांचा गंभीर प्रश्न सर्वज्ञात आणि सर्वश्रृत आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात अत्यंत तोकड्या आरोग्यसेवा आणि आरोग्याप्रति दुर्लक्ष करण्याची समाजाची मानसिकता या दोन कारणांमुळे हा देश नानाविध आजारांचे आश्रयस्थान बनत आहे, यात शंका नाही. दिवसेंदिवस हा प्रश्न उग्र रूप धारण करत आहे. त्यामुळेच दर वर्षी गंभीर आजारांप्रति जागृती निर्माण करण्यासाठी ठरावीक दिवसांचे औचित्य साधले जाते. या पार्श्वभूमीवर १ डिसेंबर रोजी साजऱ्या होणाऱ्या जागतिक एड्स दिनाचे महत्त्व खूप मोठे आहे.

गेली अनेक वर्षी एड्सप्रती जागरूकता निर्माण करण्याचे काम होत आहे. या जीवघेण्या आजारामुळे केवळ बाधित व्यक्तीच नव्हे तर संसर्गाने जोडीदारही या आजाराला बळी पडू शकतो. परिणामस्वरूप संपूर्ण कुटुंबाला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो, हे आणि यासारखे अन्य धोके लोकांसमोर आणले जात आहेत. मात्र इतक्या वर्षांच्या प्रयत्नांनंतरही जनसामान्यांना या दाहक व्याधीचे पुरेसे ज्ञान मिळाले आहे, असे म्हणता येणार नाही. म्हणूनच अजूनही बरेच काम बाकी आहे, असे यंदाच्या या दिनाच्या निमित्ताने म्हणावे लागेल. एड्सग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता याला कलियुगातील भस्मासूर म्हटल्यास वावगे ठरू नये.

वास्तविक, एड्सपासून बचाव करण्यासाठी गर्भनिरोधके उपलब्ध असूनही जनजागरणाच्या अभावामुळे या सुरक्षा यंत्रणेचा प्रभावी वापर होत नाही. याबाबत देशातील तरुण पिढीशी संवाद साधण्याची आवश्यकता आहे. तसे प्रयत्न शासन आणि काही स्वयंसेवी संघटनांमार्फत केले जात आहेत. रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे एचआयव्हीबाधित व्यक्ती साध्या आजारांनाही बळी पडते. शरीरातील प्रतिकार यंत्रणा मोडकळीला आणणाऱ्या या विषाणूंचा एका शरीरातून दुसऱ्या शरीरात प्रवेश होण्याचे चार मार्ग आहेत. एक म्हणजे असुरक्षित शरीरसंबंध. दुसरा एचआयव्हीबाधित मातेकडून गर्भाला लागण होणे. तिसरा एचआयव्हीबाधित व्यक्तीने वापरलेल्या सुईचा निर्जंतुक न करता पुनर्वापर आणि चौथा अपघातग्रस्त अथवा आजारी रुग्णावर शस्त्रक्रिया करताना एचआयव्हीचे विषाणू असणाऱ्या रक्ताचा पुरवठा होणे. या चार मार्गांनी एचआयव्हीचा प्रसार होतो.

एचआयव्हीची बाधा झाल्यानंतर तीन ते सहा महिन्यांत रुग्णामध्ये तीव्र ताप येणे, विशेष कारण नसताना वजनात सात ते आठ किलोची घट होणे, सातत्याने जुलाब होणे, सांधेदुखी, डोकेदुखी, थकवा, गळ्यावर अथवा काखेत गाठी येणे, तोंडाच्या आतल्या भागात फोड आढळणे, टीबी, मेनींजायटिस, न्यूमोनिया, रेटीनायटिस, हर्पिस हे विकार उद्भवणे, रात्रीच्या वेळी दरदरून घाम फुटणे आणि पोटदुखी, उलट्या होणे अशी लक्षणे आढळतात. त्यामुळेच यासारखी लक्षणे आढळल्यास त्वरित तपासणी करण्याची सजगता वाढणे गरजेचे आहे. खेरीज भारतामध्ये असुरक्षित शरीरसंबंधांमुळे एचआयव्हीचा प्रसार होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. एचआयव्हीबाधित व्यक्तीसाठी वापरलेल्या सुयांचा वापर निरोगी व्यक्तीच्या उपचारात केल्यास एचआयव्हीचा प्रसार होतो. त्यामुळे कोणतेही उपचार घेताना रुग्णाने नव्या सुईच्या वापरासाठी आग्रह धरायला हवा. अमली पदार्थ शिरेवाटे घेणारे व्यसनाधिन तरुणही एचआयव्हीच्या प्रसाराला बळी पडतात. हेरॉईन अथवा गर्दसारखे अमली पदार्थ शिरेवाटे घेण्याची पद्धत सध्या रूढ आहे. हे व्यसनाधीन तरुण एकमेकांच्या सुयांचा वापर करतात. असे करताना त्यांना सुया निर्जंतुक करून घेणे शक्य असतेच असे नाही. त्यामुळे बरेचदा एचआयव्हीबाधित व्यक्तीने वापरलेल्या सुईचा पुनर्वापर होऊन एचआयव्हीचा प्रसार होतो.

विचारात घेण्याजोगा आणखी एक मुद्दा म्हणजे रक्तदान करताना अथवा रक्त स्वीकारण्यापूर्वी रक्तचाचणी करायला हवी. एचआयव्हीबाधित व्यक्तीचे गाढ चुंबन घेतल्यानेही एड्सचा प्रसार होतो. विशेषत: एचआयव्ही बाधित व्यक्तीच्या अथवा तिचे चुंबन घेणाऱ्या व्यक्तीच्या तोंडात जखमा असतील तर निश्चितच असा प्रसार होतो. दारूसारख्या अमली पदार्थांचे सेवन केल्यानंतर अनेकांना लैंगिक क्रियेत सहभागी व्हावेसे वाटते. अशा वेळी ते कंडोमचा वापर करतीलच याची शाश्वती नसते. त्यामुळे दारूचे व्यसन अप्रत्यक्षपणे एचआयव्हीच्या प्रसाराला कारणीभूत ठरते. असे असले तरी एड्सबाधित व्यक्तीला स्पर्श केल्याने, तिचे मलमूत्र हाताळल्याने, या व्यक्तीसोबत एकाच ताटात जेवल्याने, तिचे कपडे वापरल्याने अथवा सोबत वास्तव्य केल्याने या रोगाची लागण होत नाही. एचआयव्हीची बाधा आणि प्रतिबंध यासंबंधी योग्य वेळी माहिती न मिळाल्याने काही व्यक्तींना एचआयव्हीच्या बाधेला बळी पडावे लागले आहे.

रोग आणि चर्चा करत असताना वाढत्या थंडीतील काही आजारांविषयी देखील सजग होणे गरजेचे आहे. सध्याचा काळ ऋतूबदलाचा आहे. वातावरणातील बदलामुळे या काळात अस्थम्याच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसते. या काळात अस्थम्याचा त्रास जाणवण्याचे मुख्य कारण म्हणजे बदलत्या वातावरणाशी जुळवून घेताना श्वसनसंस्थेची ताकद कमी पडणे अथवा काही अडचणी जाणवणे. श्वासनलिका संवेदनशील असणाऱ्या रुग्णांना या दिवसात हा त्रास सोसावा लागतो. संसर्गामुळे संवेदनशील श्वासनलिका आकुंचन पावतात आणि अस्थम्याची लक्षणे जाणवायला लागतात. थंडी वाढू लागल्यानंतर वातावरणात परागकणांचे प्रमाणही वाढते. या दिवसात गवतफुलांचे प्रमाणही खूप जास्त असते. त्यामुळेच याची अॅलर्जी असणाऱ्यांना लगेच त्रास होण्यास सुरुवात होते. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे या काळात जमीन थंड राहते. साहजिकच गारव्यामुळे जमिनीलगत धुक्याची दुलई पसरते. ही बाबही अस्थम्याला कारक ठरते. खेरीज थंडीत हवेमध्ये अनेक दूषित कणांचा संचार असतो. प्रदूषणयुक्त वातावरणात असे घातक कण हवेत तरंगत राहतात.

थंडीमध्ये पसरलेल्या धुक्यात हे कण अडकून राहतात आणि त्यांची बाधा होऊन श्वासनलिका प्रभावित होते.या समस्येचे आणखी एक कारण म्हणजे एरव्ही व्यायामाला अनुत्सुक असणारे लोकही थंडीच्या आल्हाददायक वातावरणात व्यायामासाठी बाहेर पडतात. मात्र त्यांच्या शरीराला व्यायामाची सवय नसते. त्यात वातावरणातील बदलाचा परिणाम होतो आणि व्यायामामुळे येणारा अस्थमा बळावतो. वेगवेगळ्या वयोगटातील व्यक्तींना अस्थम्याचा त्रास वेगवेगळ्या प्रकारे जाणवतो. लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे शरीर विकसित होत असतानाच अस्थमा जडतो. म्हणजेच वृद्धावस्थेत अस्थमा मागे लागत नाही, हे आपण लक्षात घ्यायला हवे. लहान मुलांना अस्थम्याचा जास्त धोका असतो. त्यांना मोठ्या माणसांसारखा दम लागत नाही, मात्र ती सतत खोकतात. सतत खोकला येणे हे अस्थम्याचे महत्त्वपूर्ण लक्षण आहे. मोठ्या माणसांना दम लागणे, छातीतून आवाज येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, श्वास अपुरा पडणे आदी लक्षणे जाणवतात. त्यातही पहाटेच्या सुमारास खोकल्याची तीव्रता वाढते.

एकंदरीतच अस्थमा हा त्रासदायक आजार असला तरी सध्या यावर अत्यंत परिणामकारक औषधोपचार उपलब्ध आहेत. यात श्वासावाटे घेता येणारी औषधे अधिक परिणामकारक सिद्ध होतात. औषधांचा इनहेेल्ड डोस कमी लागतो. म्हणजेच तोंडाने दोन मिली औषध पोटात जात असेल तर श्वासावाटे दिल्या जाणाऱ्या औषधाचा २०० मायक्रोग्राम डोस पुरेसा असतो. याचे कारण औषध नेमकी गरज आहे तिथे पोहोचते. मात्र दुर्दैवाने आपल्याकडे श्वासावाटे घेतल्या जाणाऱ्या म्हणजेच इनहेल्ड औषधांप्रती हवी तेवढी जागृती झालेली नाही. आपल्याकडे आजही औषधे घेण्याची योग्य पद्धत अवलंबली जात नाही. अशा प्रकारे घेतल्या जाणाऱ्या इनहेलर्सची सवय लागू शकते असाही एक गैरसमज आढळतो. तो दूर करणे गरजेचे आहे.

तोंडावाटे अनावश्यक प्रमाणात औषध पोटात जाते आणि काही परिणाम दाखवते. याचाच एक भाग म्हणून अशी औषधे घेतल्यानंतर हात थरथरणे, शरीरात कंप जाणवणे, अस्थिरता अथवा बैचेनी जाणवणे आदी त्रास सोसावा लागतो. मात्र श्वासावाटे घेतल्या जाणाऱ्या औषधांमुळे असा कुठलाही त्रास जाणवत नाही. या औषधांमुळे अस्थम्यावर लवकर नियंत्रण ठेवणे शक्य होते. थंडीच्या सुरुवातीच्या काळातच आपण या सगळ्यांची माहिती घेणे गरजेचे आहे. त्रास वा लक्षणांकडे लक्ष ठेवणे, गरज वाटताच तज्ज्ञांचा सल्ला घेणे, औषधांचा पूर्ण डोस घेणे आणि आवश्यक ती पथ्ये पाळणे या नियमांचे पालन केल्यास अस्थमा रुग्ण या आल्हाददायक वातावरणाचा आनंद घेऊ शकतात.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -