राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे सर्वोच्च नेते राहुल गांधी हे पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करताना केंद्रातील मोदी सरकार कसे वाईट आहे हेच बिंबविण्याचा प्रयत्न करीत आहेत. लोकांना सकारात्मक प्रचार आवडतो. भावनेच्या मुद्द्यावर काही वेळा मतदान होते, पण प्रत्येक वेळी अस्मिता व भावना मदतीला येईलच असे नसते. म्हणूनच जो विकासाची चर्चा करील, जनतेच्या समस्यांवर बोलेल, त्याच्या पाठीशी लोक उभे राहतात. लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशाच्या राजकीय क्षितीजावर उदय झाल्यापासून सर्वात नुकसान झाले ते काँग्रेस पक्षाचे. काँग्रेसमधील घराणेशाही आणि काँग्रेसच्या नेत्यांचा भ्रष्टाचार मोदींनी उघ़ड केल्याने काँग्रेसची अवस्था सैरभैर झाली आहे.
‘सबका साथ सबका विकास’ हा मंत्र घेऊन गेली साडेनऊ-दहा वर्षे मोदी पंतप्रधान म्हणून काम करीत आहेत. राहुल गांधी हे काँग्रेस पक्षाचे एकमेव नेते आहेत की, निवडणूक प्रचारात त्यांचा सर्वत्र संचार आहे. स्वत: सोनिया गांधी या ‘दहा जनपथ’ या घराबाहेर फारशा पडू शकत नाहीत. मल्लिकार्जुन खरगे यांनाही वयामुळे मर्यादा आहेत. त्यामुळे राहुल व प्रियंका यांच्यावरच काँग्रेस पक्षाची भिस्त आहे. मोदींसारखा विश्वनेता व अमित शहांसारखा कुशल संघटक भारतीय जनता पक्षाकडे असताना राहुल गांधी यांनी विचारपूर्वक भाषणे केली पाहिजेत. आपल्या भाषणांनी आपणच गोत्यात येणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे. आपल्या भाषणांनी पक्षाचे निदान नुकसान होणार नाही, हे बघितले पाहिजे. राहुल यांच्यासमोर टीव्हीचे कॅमेरे सतत रोखलेले असतात. एका परिपक्व नेत्यांप्रमाणे त्यांना वागायला हवे. ५४ वर्षांच्या राहुल गांधींना राजकीय सभ्यतेने वागा असे कोण सांगणार? आता ते काही युवक काँग्रसचे नेते नाहीत आणि काँग्रेसचे अध्यक्षही नाहीत. त्यांची खासदारकी बाष्कळ व बेलगाम बोलण्याने कशी वादाच्या भोवऱ्यात सापडली ते सर्व देशाने बघितले आहे. पण मोदींवर टीका करताना त्यांची जीभ घसरतेच, हे वारंवार घडत आहे.
राहुल गांधी हे भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि नरेंद्र मोदी यांच्याविषयी आजवर काय काय बोलले, याची जंत्री मोठी आहे. त्यांना नेमके काय झाले आहे, त्यांना नेमका कोणता आजार आहे, याची तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी लागेल. निवडणुकीच्या प्रचारात दुसऱ्या राजकीय पक्षावर टीका केली जाते, दुसऱ्या पक्षाच्या अजेंड्यावर टीका केली जाते, हे समजता येईल पण देशाच्या पंतप्रधानांना व्यक्तिश: टार्गेट करणे व त्यांच्याविषयी आक्षेपार्ह बोलणे हे कोण किती काळ सहन करणार? राहुल यांचा जो पोरकटपणा चालू आहे, त्याविषयी भाजपा, संघ परिवारातील संघटना आणि सरकारनेही बराच संयम बाळगला आहे. पण याचा अर्थ राहुल यांना देशाच्या पंतप्रधानांवर बेलगाम व आक्षेपार्ह बोलायला मोकाट सोडले असा नव्हे?
पीएम म्हणजे पनवती मोदी आहे, असे वादग्रस्त विधान राजस्थानमधील प्रचारात राहुल गांधी यांनी केले. त्या अगोदर त्यांनी मोदींचे नाव न घेता व पंतप्रधान असा उल्लेख न करता विश्वचषक क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा पराभव का झाला हे सांगताना त्यांची पनवती असा उल्लेख केला होता. त्यांनी मोदींचे नाव घेतले नाही तरी त्यांचा रोख त्यांच्याकडेच होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्याबरोबर बॅडलक घेऊन येतात, अशीही त्यांनी पुस्ती जोडली. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या ऑस्ट्रोलिया विरुद्ध भारत या विश्वचषकाच्या अंतिम सामन्याला मोदी उपस्थित राहिल्याचा उल्लेख करून राहुल गांधींनी ही टीप्पणी केली, हे लज्जास्पदच नव्हे; तर अत्यंत निषेधार्ह आहे. भारतीय संघाच्या पराभवाला मोदीच कारणीभूत आहेत, हे सांगताना पीएम म्हणजे पनवती असा त्यांनी उल्लेख केला. आपले खेळाडू तिथे चांगल्या पद्धतीने विश्वचषक जिंकले असते आणि तिथे पनवती… हरवून टाकले.. टीव्हीवाले हे सांगणार नाहीत, पण जनतेला माहिती आहे… ही भाषा आहे
राहुल गांधी यांची.गेल्या दहा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताची जगभर प्रतिमा उंचावली. भारतात जी-२० ही आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी करून दाखवली. चंद्रायान मोहीम यशस्वी झाली. क्रिकेटकडे एक खेळ म्हणून बघितले पाहिजे. क्रिकेटचा खेळ म्हणून आनंद घेतला पाहिजे. भारतीय संघाने सलग दहा सामने जिंकले तेव्हा रोहित शर्माच्या संघाने प्रत्येक भारतीयाच्या मनात स्थान मिळवले. अंतिम सामन्यात अपयश आले म्हणून देशातील १४० कोटी जनता हळहळली. पण भारतीय संघाच्या पराभवाचे कारण मोदींची उपस्थिती म्हणजे पनवती असे सांगणे हा देशाच्या पंतप्रधानपदाचा अपमान आहे. पराभव झाल्यानंतर स्वत: पंतप्रधान मोदींनी स्टेडियममधील ड्रेसिंग रूममध्ये जाऊन भारतीय संघाचे सांत्वन केले. मी तुमच्याबरोबर आहे, असा धीर दिला. मोदींच्या या भेटीने भारतीय संघाचे मनोबल उंचावले. रोहित, विराट, शमी, राहुल प्रत्येकाला नावाने हाक मारून त्यांनी बोलावले, जवळ घेतले. त्यांच्या पाठीवरून हात फिरवला.
पंतप्रधान हे देशाचे पालक असतात, या भावनेने मोदी त्यांच्याशी बोलले. यात कुठे राहुल यांना पनवती दिसली? राहुल यांच्या आईने सोनिया गांधींनी पूर्वी मोदींना मौतका सौदागर म्हटले होते, राहुल यांनी मोदींना उद्देशून चौकीदार चोर है अशा घोषणा दिल्या होत्या. आता विश्वचषकाच्या पराभवाचे खापर मोदींवर फोडण्यासाठी पीएम म्हणजे पनवती म्हणत आहेत… राहुल गांधींनी किती हिन पातळी गाठली आहे, त्याचे हे ताजे उदाहरण आहे.