गॅन्ट्री बसविण्यासाठी ब्लॉक
मुंबई : यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर पुणे वाहिनीवर ३५.५०० किलोमीटर येथे हायवे ट्रैफिक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत मंगळवार (ता. २१) रोजी करण्यात येणार आहे. या लांबीत मुंबईहून पुण्याकडे जाणारी सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक दुपारी १२ ते २ या वेळेत पूर्णतः बंद राहणार आहे. याबाबतची अधिसूचना अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) महाराष्ट्र राज्य यांनी निर्गमित केली आहे.
या ब्लॉकच्या कालावधीत मुंबईहुन पुण्याकडे जाणारी हलकी वाहने द्रुतगती मार्गाच्या कि.मी क्र ०८/२०० येथील शेडुंग फाटा येथून वळवून रा.म.मा. क्र ४८ जुना मुंबई पुणे महामार्गावरील शिंग्रोबा घाटातून द्रुतगती मार्गाच्या मॅजिक पॉइंट किमी क्र ४२/१०० येथून पुन्हा द्रुतगती मार्गावरील पुणे वाहिनीवर मार्गस्थ करण्यात येतील, सदर काम पूर्ण झाल्यावर दुपारी २ वाजता द्रुतगती मार्गावरील मुंबईहुन पुण्याकडे जाणारी वाहतूक पुन्हा सुरु करण्यात येणार आहे.
या कालावधीत द्रुतगती मार्गावरील वाहनांनी वरील पर्यायी मार्गाचा उपयोग करावा, तसेच वरील कालावधी दरम्यान द्रुतगती मार्गावरील वाहनचालकांना काही अडचण असल्यास त्यांनी मदतीसाठी मुंबई- पुणे द्रुतगती मार्गाच्या नियंत्रण कक्षाचा दुरध्वनी क्रमांक ९८२२४९८२२४ किंवा महामार्ग पोलीस विभागाच्या ९८३३४९८३३४ या क्रमांकावर सपंर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने केले आहे.