विश्वचषक स्पर्धेत अंतिम सामन्यात भारताचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाने पराभव केला आणि भारताचा स्वप्नभंग झाला. या संपूर्ण स्पर्धेत भारताचा खेळ स्वप्नवत झाला होता. पण अंतिम सामन्यात भारताचा स्वप्नभंग झाला आणि भारताला ६ गडी राखून ऑस्ट्रेलियाकडून पराभवाची चव चाखावी लागली. या स्पर्धेत भारताला एकदाच पराभव पाहावा लागला आणि तीही केवळ अंतिम सामन्यात. भारतावर नशीब रुसले ते अखेरच्या सामन्यात आणि विश्वचषकापासून भारत दुरवला.
सामन्यानंतर अर्थात रोहित शर्मासह सारेच दिग्गज खेळाडू रडताना दिसत होते. लोकही भावनावश झाले होते. ‘सो क्लोज यट सो फार’ अशी इंग्रजी म्हण आहे. तसेच भारताच्या बाबतीत झाले. यशाच्या इतके जवळ येऊनही भारताला अखेर यशाने हुलकावणी दिली. क्रिकेटच्या परिभाषेत या अपयशाला अनेक कारणे सांगता येतील. म्हणजे नाणेफेक भारताच्या विरोधात गेली आणि प्रथम गोलंदाजी करताना खेळपट्टीचा लाभ प्रतिस्पर्धी संघाला झाला. भारताची ताकदवान वाटणारी आणि तसे सिद्धही झालेली गोलंदाजी नेमक्या याच सामन्यात ढेपाळली आणि बुमराह किंवा शमी यांना विकेट्स घेण्यात अपयश आले. कुलदीप यादव किवा रवींद्र जाडेजा यांना विकेट्स मिळाल्या नाहीत. ट्रेविस हेड हा भारत आणि विजयाच्या मध्ये अगदी जिब्राल्टरचा पर्वत म्हणून उभा राहिला. त्याने अंतिम सामन्यात १३७ धावा करून ऑस्ट्रेलियाची पडझड थांबवली. त्याने आणि लबुशांगे यांनी ऑस्ट्रेलियाचे आणखी फलंदाज बाद होणार नाहीत, याची सुनिश्चिती केली. पण भारताची फलंदाजी जिने तमाम क्रिकेट खेळणाऱ्या देशांना हादरवून टाकले होते, ती अखेरीस मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरली.
आजकालचे वेगवान क्रिकेट पाहता २४० चे आव्हान कोणत्याही खेळपट्टीवर सहज जिंकता येण्यासारखे असते. त्यात कांगारूंसारखा तगडा संघ असताना त्यांना तर काहीच अशक्य नव्हते. आज संघ जरी अपयशी ठरला असला तरीही याच संघाने भारताला अंतिम सामन्यात एकही सामना साखळी फेरीत न हरता पोहोचवले आहे, हे विसरून चालणार नाही. भारताच्या चुका कोणत्या झाल्या, याचे विश्लेषण अनेकांनी केले आहे. कित्येक दिवस ते चालूच राहील. पण विराट शर्माचे अपयश आणि महंमद शमीला विकेट्स न मिळणे हीच भारताच्या आजच्या अपयशाची प्रमुख कारणे सांगता येतील. भारतीय संघ रोहित आणि विराट यांच्यावर नको तितका अवलंबून राहात आहे का, हाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. आता अंतिम सामना संपला असला तरीही भारताच्या पुढील वाटचालीत यावर विचार करावा लागणार आहे.
आज भारत अंतिम फेरीत हरला असला तरीही प्रेक्षकांनी उगीचच खेळाडूंच्या घरावर हल्ले करणे वगैरे प्रकार केले नाहीत. भारतीय प्रेक्षक सूज्ञ झाला आहे आणि या खेळाडूंनीच भारताला अंतिम फेरीत पोहोचण्याचा आनंद दिला आहे, हे प्रेक्षक विसरले नाहीत. अंतिम सामना म्हणून भारताने या सामन्याचे जे कौतुक केले ते अतिच होते. ऑस्ट्रेलिया अंतिम फेरीत होता पण त्यांच्याकडे आपल्यासारखे लोक स्टेडियमकडे धावले नाहीत. त्यांच्याकडे अंतिम सामना असो की, पहिला सामना, त्याला साधारण सामना म्हणूनच पाहिले जाते. अंतिम सामना म्हणून त्यांनी काहीही विशेष असे काही केले नाही. इतर सामन्यांसारखा हा एक सामना, या दृष्टिकोनातून पाहिले गेले. हेच कांगारूंच्या यशाचे मुख्य कारण आहे.
भारताला आज धावांचा मोठा डोंगर उभारता आला नाही, हे प्रमुख कारण त्याच्या पराभवाचे होते. रोहित, विराट आणि राहुल यांनी चमकदार खेळी केली पण त्यांना मोठ्या खेळीचे रूपांतर अतिमोठ्या खेळीत करता आले नाही. भारताच्या गोलंदाजांनीही आज काही कमाल केली नाही. जी त्यांनी सर्व साखळी सामन्यात केली होती. पण आता या अपयशानंतरही भारताला काही गोष्टी शिकाव्या लागतील. अंतिम फेरीत पराभव म्हणजे ‘एंड ऑफ द रोड’ नाही, हे सर्वांनीच लक्षात ठेवले पाहिजे. अंतिम सामन्यात दबाव न घेता खेळण्याचे कसब भारतीय खेळाडूंनी आत्मसात करणे आवश्यक आहे. साध्या सामन्याचा दबाव असतो. हा तर अंतिम सामना होता.
एक लाख प्रेक्षकांसमोर हा सामना होता, त्यामुळे खेळाडूंवर काय दबाव असेल, याची कल्पना यावी. विश्वचषक स्पर्धेतून भारताला काही जमेच्या बाजू मिळाल्या आहेत. भारताला आपले गोलंदाजीतील अस्त्र सापडले आहे. ते म्हणजे महंमद शमी. तर फलंदाजीत रोहित, विराट आणि के. एल. राहुल हे वारंवार चमकले. शुभमन गिलने आज निराशा केली आणि त्याचा सूर एकंदरीतच या स्पर्धेत हरवलेला होता. तीच गत सूर्यकुमार यादवची. त्याला या स्पर्धेत काही विशेष करता आलेले नाही. या दोघांचे अपयश हे भारताच्या पुढील वाटचालीसाठी चिंताजनक आहे. भारताच्या उद्याच्या संघाचे काही आधारस्तंभ आहेत. पण त्यांना आता वारंवार संधी देण्याची आवश्यकता आहे. रोहित आणि विराट यांच्यावर भारताचा संघ नको तितका अवलंबून राहात आला आहे. त्यांच्यावरील भार कमी केला पाहिजे आणि त्यासाठी मधल्या फळीतील आणखी एखादा तगडा फलंदाज यायला हवा. त्याचा शोध बीसीसीआयने घेतला पाहिजे.
सध्याचे भारताचे युनिट हे अत्यंत प्रतिभाशाली होते. त्यामुळे भारतीय संघाची कामगिरी अगदी चांगलीच झाली आहे. अंतिम सामना गमावण्याचा दबाव घेण्याची काहीच गरज नाही. आता भारताचे पुढील सामने आहेत आणि त्यासाठी नव्याने संघ उभारण्याची गरज आहे. पराभव किंवा विजय हा संघाच्या काय पण माणसाच्या आयुष्याचा भाग असतो. त्यामुळे या पराभवाला मागे टाकून पुढे वाटचाल केली पाहिजेच. रोहित शर्मा किंवा विराट काय पण कुणीही पराभव किंवा विजय हे पार्ट अँड पार्सल ऑफ गेम असे म्हणून पुढे गेले पाहिजे. भारताच्या चुकांचे विश्लेषण होईल आणि नक्की कारणे निश्चित होतील. पण भारतीय संघाने सुरुवातीला सर्व सामन्यात उत्तम खेळून भारताला अंतिम फेरीत पोहोचवले हे विसरून चालणार नाही.