Monday, July 8, 2024
Homeसाप्ताहिकअर्थविश्वEconomic Development : संकटे असूनही भारताच्या आर्थिक प्रगतीबद्दल आंतरराष्ट्रीय वित्तसंस्थांकडून प्रशंसा

Economic Development : संकटे असूनही भारताच्या आर्थिक प्रगतीबद्दल आंतरराष्ट्रीय वित्तसंस्थांकडून प्रशंसा

  • अर्थभूमी : उमेश कुलकर्णी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अर्थव्यवस्थेविषयी विरोधक अकारण टीकाटिप्पणी करताना खालच्या पातळीवरील भाषा वापरत असतात. पण त्यांना आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या ताज्या अहवालास जोरदार झटका बसण्याची शक्यता आहे. कारण आयएमएफने म्हणजे नाणेनिधीने आपल्या अगदी अलीकडच्या एका अहवालात असे म्हटले आहे की, भारत हीच जगातील सर्वात वेगाने उदयास येणारी अर्थव्यवस्था आहे. आता ही मल्लिनाथी खुद्द आयएमएफनेच केली असल्याने यात मोदी सरकारच्या भाटांनी केली असल्याचा आरोपही होऊ शकत नाही. कोरोनाचे संकट आणि जागतिक मंदीचे सावट असतानाही भारतीय अर्थव्यवस्थेची कामगिरी अतिशय चांगली आहे, असेही नाणेनिधीने म्हटले आहे. नाणेनिधीने असेही नोंदवले आहे की, उदयोन्मुख बाजारपेठांपेक्षा मंदी ही अधिक ठाम प्रगत अर्थव्यवस्थांमध्ये आहे. या उदयोन्मुख बाजारपेठांमध्येच भारताचा समावेश होतो. भारताने गेल्या दोन ते तीन वर्षांत चीनवरील आयातीचे अवलंबित्व लक्षणीय कमी केले आहे. त्यामुळे भारत हीच जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी बाजारपेठ म्हणून समोर आला आहे, हे मोदी यांचे यश आहे, यात काही शंका नाही. अर्थात हे मोदींच्या राजकीय विरोधकांना मान्य होणार नाही. पण राजकारणात हे चालतच असते.

२०२१ आणि २०२२ च्या वेगाने आर्थिक वाढ झाल्यानंतर भारताचे आर्थिक चित्र हे २०२३-२४ मध्ये वेगाने वाढणारे असेच आहे. याला कारण आहे. अर्थातच खासगी उपभोग आणि गुंतवणूक यामुळे हे साध्य झाले आहे, असे ‘स्टँडर्ड अँड पुअर’ या मार्केटिंग एजन्सीने म्हटले आहे. या संस्थेच्या मतावर देशांची आर्थिक धोरणे ठरत असतात. गेल्या दशकात म्हणजे मोदी पंतप्रधानपदावर आल्यापासून भारतात जो थेट परकीय गुंतवणुकीचा ओघ वाढला आहे, त्यामुळे देशाचे आर्थिक चित्र अनुकूल झाले आहे. भारतात तरुणांची लोकसंख्या सर्वाधिक असून त्यामुळेही कुटुंबाचे उत्पन्न सातत्याने आणि वेगाने वाढत आहे. भारताचे सकल राष्ट्रीय उत्पादन म्हणजे जीडीपी ज्यावरून देशाची आर्थिक ताकद मोजली जाते. त्याबाबत एस अँड पीने असा अंदाज वर्तवला आहे की, २०२२ मध्ये भारताचा जीडीपी ३.५ ट्रिलियन डॉलर्स इतका होता. तो २०३० पर्यंत ७.३ ट्रिलियन डॉलर इतका वाढेल. आता ही खूप तांत्रिक भाषा झाली. पण अर्थ असा आहे की, भारतात आता सुबत्ता दिसू लागली आहे. सरासरी राष्ट्रीय उत्पन्न वाढले आहे आणि सामान्य घरातील लोकही आज अालिशान कार वापरू शकतात. तसेच विद्युत वाहनांची विक्रीही वाढली आहे. आशिया पॅसिफिक क्षेत्रात भारत हा आता दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था २०३० मध्ये बनण्याची शक्यता असून जपानलाही तो आता मागे टाकेल, असाही अंदाज आहे. हे अंदाज मोदी सरकारच्या सांख्यिकी विभागाने वर्तवलेले नाहीत तर निष्पक्षपाती अशा आंतरराष्ट्रीय संस्थांनी वर्तवले आहेत. त्यामुळे त्यांना प्रचंड महत्त्व आहे.

भारताने २०२२ मध्ये जलदगतीने वाढून ही जी वाढ प्राप्त केली आहे, त्यासाठी अनेक वाढीचे घटक आहेत. ज्यांना मार्केट ड्रायव्हर्स म्हणतात. यात अर्थात सर्वाधिक वेगाने वाढणारा आणि व्यापक अर्थाने विकसित होणारा मध्यमवर्ग आहे. ज्याच्यामुळे उपभोगाचे प्रमाण वाढले आहे. मागणी वाढली आहे आणि त्यामुळे अर्थात अर्थव्यवस्था वाढली आहे. भारताचे अतिजलद वेगाने वाढणारे देशांतर्गत घरगुती बाजारपेठ आणि भारताचे विशाल असे औद्योगिक क्षेत्र यामुळे भारत आज जागतिक अर्थव्यवस्थांसाठी महत्त्वपूर्ण गुंतवणूक बाजारपेठ बनला आहे. भारतात गुंतवणूक करणे मल्टीनॅशनल कंपन्यांनाही आवडते आहे आणि त्यांची भारताला पहिली पसंती असल्याचे आकडे सांगतात. उत्पादन, पायाभूत सुविधा आणि सेवा क्षेत्रात भारताला आज प्राधान्यक्रम दिला जातो. यामुळे भारतीय अर्थव्यवस्था वेगाने विकसित होणारी बनली आहे. १९९० च्या दशकात जेव्हा पंतप्रधान नरसिंह राव यांनी भारतात उदारीकरणाची दारे खुली केली तेव्हापासूनच मध्यमवर्गीयांच्या विकासाला सुरुवात झाली. आज त्यात प्रचंड फरक पडला आहे. आताच्या ई-वाणिज्यच्या प्रचंड वाढीमुळेही भारताची अर्थव्यवस्था वाढण्यास हातभार लागला आहे. किरकोळ ग्राहक बाजारपेठेचा चेहरा-मोहराच ई-वाणिज्यामुळे बदलून गेला आहे. पुढील दशकात ई-वाणिज्यामुळे किरकोळ ग्राहक बाजारपेठेचे चित्र आणखी बदलण्याची शक्यता वर्तवली आहे. भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढण्यास पाच जी आणि सहा जीच्या क्रांतिचाही सहभाग आहे.

२०३० मध्य़े ११ अब्ज लोकांना इंटरनेट उपलब्ध असेल. २०२० मध्ये अपेक्षित इंटरनेट ५० लाख लोकांना उपलब्ध असेल, असा अंदाज होता. इंटरनेट उपलब्ध असलेल्यांची प्रचंड संख्या आणि फोर जी आणि फाईव्ह जीमुळे देशातंर्गत युनिकॉर्नची संख्याही देशात प्रचंड वाढेल, असे अंदाज आहेत. त्यामुळे भारताची आर्थिक प्रगती ही चीनपेक्षा जास्त असू शकते. भारतात थेट परकीय गुंतवणुकीचा ओघ वाढला आहे. तो वेगाने आणि त्यामुळे भारतासारख्या जलद गतीने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेकडे गुगल आणि फेसबुक या कंपन्याही कमालीच्या आकर्षित झाल्या आहेत. यापेक्षाही महत्त्वाचे हे आहे की, येत्या दहा वर्षांत भारत जलदगतीने आणि सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून आपला लौकिक कायम राखणार आहे. मोदी सरकारातील मंत्र्यांनी किंवा सरकारी संस्थेने ही माहिती दिलेली नाही, तर आंतरराष्ट्रीय वित्तसंस्थांनी हा अहवाल अभ्यास करून दिला आहे. त्यामुळे याला मोदी सरकारचा प्रचार, असा वास येण्याची आवश्यकता नाही. वाहने, इलेक्ट्रॉनिक्स आणि इतर उत्पादनांची बाजारपेठ भारत असून यापुढे बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठी भारत ही दीर्घकालीन बाजारपेठ असेल. त्यामुळे बँकिंग, हेल्थकेअरसारख्या क्षेत्रांचा विस्तार होणार असून त्यामुळे तेथील रोजगारही वाढणार आहेत. हे सारे गोड गुलाबी चित्र या वित्तसंस्थांनी रंगवले आहे. त्यात खोटेपणाचा अंश नाही. कारण या संस्थांमध्ये काम करणारे कर्मचारी हे मोदीभक्त असण्याची शक्यताच नाही. भारताचा भूराजकीय, सांस्कृतिक प्रभाव वाढेल तसे भारतात जागतिक पर्यटकांचा ओघही वाढेल, असेही अंदाज आहेत.

भारतासाठी आणखी एक गुड न्यूज आहे आणि ती म्हणजे चीनवरील भारताचे अवलंबित्व लक्षणीय प्रमाणात कमी झाले आहे. चीनकडून आयात मालाच्या प्रमाणात घट झाली आहे. नोव्हेंबर २०२२ मध्ये भारताची चीनकडून केली जाणारी आयात ५.४२ टक्क्यांनी कमी झाली आहे, तर गेल्या वर्षी याच महिन्यात करण्यात आलेल्या आयातीपेक्षा ही संख्या ७.६५ अब्ज डॉलर्स इतकी खाली आली. २०२२-२३ आर्थिक वर्षात भारताच्या आयातीत चीनचा वाटा १३.७९ टक्क्यांपर्यंत घसरला. ज्या वस्तूंची आयात कमी झाली आहे, त्यात यंत्रे, विद्युत आणि गैर विद्युत, सोने, ऑर्गॅनिक आणि इनॉर्गॅनिक रसायने, मोती आणि मूल्यवान धातूंचा समावेश आहे. अर्थात भारताची आयात मात्र वाढली आहे पण ती चीनकडून नाही. त्याऐवजी रशिया, सौदी अरेबिया, इंडोनेशिया आदी देशांकडून आयात वाढली आहे. भारताकडून आयात कमी झाल्याने चीनला त्याचा फटका बसला आहे. खतांच्या आयातीत महत्त्वपूर्ण कपात झाली आहे.चीन हा भारताकडून लोखंडी खनिजाचे सर्वात जास्त प्रमाणात आयात करतो आणि चीन सत्तर टक्के लोखंडी खनिज आयात करतो. त्यामुळे भारताचे चीनवरील आयात मालाच्या प्रमाणातील कपातीचा जोरदार फटका चीनला बसला आहे. एकूणच भारताचे आर्थिक चित्र हे गोड गुलाबी आहे. पण त्यात एक कमतरताही आहे. भारताची आर्थिक अवस्था आशादायक असली तरीही भारताचे मूलभूत प्रश्न सुटलेले नाहीत. बेरोजगारी, महागाई आणि तसेच आहेत. ते जोपर्यंत सुटत नाहीत तोपर्यंत भारताला सुटकेचा निःश्वास टाकता येणार नाही.

umesh.wodehouse@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -