Sunday, July 21, 2024
Homeताज्या घडामोडीChandrakant Shewale : रमल गुरू चंद्रकांत शेवाळे

Chandrakant Shewale : रमल गुरू चंद्रकांत शेवाळे

रमल गुरू

तेजस वाघमारे

भगवान शंकराने पार्वती मातेला भूत, भविष्य, वर्तमान जाणण्यासाठी जी विद्या शिकवली तिला रमल शास्त्र असे म्हणतात. वास्तविक पार्वती मातेला काही शिकवायची गरजच नाही, ती त्रिकाल ज्ञानी आहे. ज्ञान शिकविण्याच्या विनंतीवरून शंकराने पर्वती मातेस ते शिकवले. तेव्हापासून बुरुजपत्रावर लिहून ते हिमालयातील गुहेत ठेवले असा उल्लेख जुन्या ग्रंथांमध्ये असल्याचे सांगत चंद्रकांत शेवाळे म्हणाले की, द्वापार युगात एका तरुणाने प्रखर शिवाची आराधना केली. शिव त्याला प्रसन्न झाल्यावर त्याला विचारले, तुला काय पाहिजे. तर त्याने सांगितले की, भूत, भविष्य, वर्तमान समजण्यासाठी मला एखादी विद्या शिकवा. जेणेकरून माझा लोकांवर प्रभाव पडेल. शंकराने पार्वती मातेस शिकवलेली विद्या परत त्या मुलाला ग्रहण करवली. त्याला सांगितले की, हे शास्त्र जाणणारा पहिला मानव म्हणून आदम या नावाने तू प्रसिद्धीला पावशील. द्वापार युग म्हणजे काय तर, महाभारत ज्या काळात झाले तो काळ. साडेपाच हजार वर्षे या रमल विद्येला झाली आहेत. ही विद्या भारतात तेव्हापासून प्रचलित आहे. या विद्येचा प्रचार, प्रसार जास्त याहूनी लोकांनी म्हणजे मुस्लीम धर्मियांनी केला. म्हणून याला यावनी ज्योतिष असे सुद्धा नाव आहे. त्यासाठी ते उदाहरण देतात की, आमच्या धर्मगुरूने वाळवंटामध्ये अल्लाची प्रार्थना केली. प्रार्थना केल्यावर अल्लाने दूत पाठवला. तेव्हा दूताने धर्मगुरूला विचारले काय पाहिजे. त्यावेळी ते म्हणाले मला असे इलम द्या, म्हणजे विद्या, की त्यामुळे माझा लोकांवर प्रभाव पडेल. दूताने सांगितले की, जरूर तुमची इच्छा पूर्ण करतो आणि त्याला सांगितले की, तुझे हात रेतीमध्ये पालथे घाल. त्याने हात पालथे घातले, त्यानुसार त्याच्यावर ज्या खुणा तयार झाल्या. त्याच्यावरून त्याला नियम समजावून सांगितले. रेतीत हे शास्त्र तयार झाले, म्हणून याला रमल शास्त्र हे नाव आहे. ते त्याला इतके महत्त्व देतात की, रमल शास्त्राला ते “दौलते इस्लाम” म्हणतात.

चंद्रकांत शेवाळे म्हणाले की, रमल शास्त्र हे हिंदूंचे की मुस्लिमांचे आहे, हा मोठा प्रश्न आहे. आपल्याला यामध्ये न शिरता त्याची उपयुक्तता बघायची आहे. चंद्रकांता मालिकेमध्ये जे होते तसे नसून ते कपोलकल्पित आहे. रमल जे सप्तधातूंचे फासे केलेले असतात. ते फासे फेकून फाशांवर ज्या खुणा येतात, त्यांच्यावरून प्रश्नकुंडली तयार करायची. मग त्याच्यावरून उत्तरे अचूक मिळतात. उदाहरण द्यायचे झाल्यास रमल शास्त्राच्या आधारे १९९५ सालापासून मी सगळ्या वर्ल्डकपची भविष्य तंतोतंत बरोबर सांगितली आहेत. त्याला अपवाद आहे, २०१९च्या वर्ल्डकप. वर्ल्डकपबाबत मी एकूण ६ भविष्य बरोबर सांगितली. सातवे मात्र चुकले. याचा अर्थ एवढाच आहे की, कुठलेच शास्त्र परिपूर्ण नाही. डॉक्टरने १०० शस्त्रक्रिया केल्या तरी एखाद दुसरे फेल होतेच. आम्ही जी भाकिते करतो ती सामने सुरू होण्यापूर्वी करतो. घटनेच्या अगोदर पुराव्याशी सांगणे तरच त्या भविष्याला अर्थ आहे. आमचे भविष्य चुकले तर आम्ही कबूल करतो. आमची पेढे-जोडे दोन्ही तयारी असते.

२०१४च्या लोकसभा निवडणुकीवेळी किती जागा मिळतील, हे रमल शास्त्राच्या आधारे बरोबर सांगितले होते. एका पेपरला ते प्रसिद्धीसाठी दिले होते, पण त्यांना ते खरे वाटले नाही. प्रश्न शास्त्रावर आधारित हे शास्त्र आहे. माझ्याकडून पाच हजारांहून अधिक लोक प्रत्यक्ष रमल शास्त्र शिकून गेले आहेत. तसेच माझ्या पुस्तकावरून हजारो विद्यार्थी शिकलेले आहेत. भारतातीलच नव्हे तर परदेशातील लोकांनाही रमल शिकवले आहे. रमल व्यतिरिक्त मी लाल किताब शिकवतो. त्याचेही काही हजार विद्यार्थी तयार झालेले आहेत. ते देखील रमल सारखेच उपयुक्त असे शास्त्र आहे. भविष्य बघण्याच्या पूर्वी तीन-चारच पद्धती होत्या. एक म्हणजे कुंडली शास्त्र, हस्त सामुग्रीक शास्त्र आणि अंक ज्योतिष. पण जसा काळ बदलत गेला. तसे वेगवेगळ्या पद्धतींचा उदय होत गेला. २०व्या शतकानंतर वेगवेगळ्या पद्धती उदयास आल्या. कृष्णमूर्ती ज्योतिष पद्धत, लाल किताब अशा शंभरपेक्षा जास्त पद्धती सध्या अस्तित्वात आहेत, असे शेवाळे सांगतात.

ज्योतिष शास्त्राचा माझा प्रवास अपघाताने सुरू झालेला नसून ते माझ्या नशिबीच होते. इयत्ता नववीत असल्यापासून मी ज्योतिष शास्त्राचा अभ्यास करतो आहे. त्याला आता ५५ वर्षे झाली. पहिले पुस्तक मी नेपोलियन प्रश्नावली हे वाचले. नेपोलियन प्रश्नावली हे रमल शास्त्रावर तयार झालेली आहे. मी रमल शास्त्राचा बेस असलेले पुस्तक प्रथम वाचल्याचे शेवळे यांनी सांगितले.

कोकणात तर प्रत्येक घराघरात वेगवेगळ्या उपासना असतात. कोकणातील महान ज्योतिषी आहे की त्याला आम्ही कधीही विचारू शकत नाही. मालवणचे वसंत लाडूबाई म्हापणकर. आचार्य अत्रे त्यांना भयंकर मानत असत. लोकांना ज्या अडचणी असतात, त्यामधून बाहेर जाण्यासाठी ते ज्योतिष शास्त्राचा आधार घेतात.

नऊ ग्रह आहेत, त्या प्रत्येकाची स्वभाववृत्ती वेगळी आहे. बुध म्हणजे बुद्धिकारक, गुरू म्हणजे ज्ञान वर्धक, मंगळ म्हणजे धाडस, रवी म्हणजे अधिकार. हे सर्व गुण एकत्र असणे अवघड असते. ज्याच्या पत्रिकेत बुध आणि गुरू चांगले आहेत, तो माणूस पुढे जातो. जिथे ज्ञान आणि बुद्धी एकत्रित येते. तिथे पैसा आपोआप येतो. बुध चांगला असला की माणसाला अडचण येत नाहीत, हे १०० टक्के खरे असल्याचे शेवाळे यांनी सांगितले.

ज्योतिषाचार्य चंद्रकांत शेवाळे ‘भविष्याचे वर्तमानकार’

वैष्णवी भोगले

दैनिक प्रहारच्या गजाली कार्यक्रमात रमल, ज्योतिष गुरू आणि पुण्याच्या भालचंद्र ज्योतिर्विज्ञान स्वायत्त संस्थेचे कुलगुरू चंद्रकांत शेवाळे यांनी प्रहार टीमसोबत संवाद साधला. प्रत्येकाच्या जीवनात चांगले-वाईट प्रसंग येतात. अनेक व्यक्ती आपल्या कार्यातून पुढे गेलेले असतात, अनेकांच्या नोकरी, व्यवसाय, शिक्षण, दैनंदिन जीवनात काही ना काही घडत असते. ते जाणून घेण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परिने प्रयत्न करत असतो. शेवाळे यांच्याशी झालेल्या गप्पाटप्पांतून ज्योतिषविषयक, रमल शास्त्रविषयक अनेक प्रश्नांची उत्तरे उलगडत होती.

चंद्रकांत शेवाळे यांनी तरुण वयातच ज्योतिषाचार्य कै. भा.रा. खानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली ज्योतिषशास्त्राचे अध्ययन केले. ते ‘महाराष्ट्र ज्योतिष परिषद’ आणि ‘ज्योतिष परिषद पुणे’ या संस्थांचे संस्थापक सदस्य आहेत. तसेच ५५ वर्षे पुण्याच्या स्टार क्लबचे संस्थापक अध्यक्ष आहेत. ज्योतिषातील सर्वाधिक विषयांचे अभ्यासक्रम असणारी भारतातील एकमेव संस्था म्हणून प्रसिद्ध असलेल्या भालचंद्र ज्योतिर्विद्यालयाचे ते कार्याध्यक्ष आहेत. या विद्यालयात त्यांचे ज्योतिषविषयक वर्ग चालतात. या अभ्यासात शास्त्र आहे असे त्यांचे मत आहे. ते कुठल्याही क्षेत्रात जावो तिथे ते मनोभावे माणसे जोडतात. जनसंपर्क अफाट असल्यामुळे त्यांचा चाहता वर्गही अधिक आहे, असे त्यांनी सांगितले. १९७७ पासून ते ज्योतिषविषयक मराठी नियतकालिकांमध्ये सर्वाधिक खप असलेल्या ‘ग्रहांकित’ मासिकाचे प्रकाशन आणि संपादन ते अव्याहतपणे करत आहेत. त्यांच्या ज्योतिषविषयक दिवाळी अंकांना एवढी मागणी आहे की अनेकदा हे अंक पुन्हा पुन्हा छापावे लागले आहेत. त्यांचे दिवाळीचे विशेषांक हे लोकांच्या जिव्हाळ्याचा एक भाग बनले आहेत. लोकांना आपल्या आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या-वाईट गोष्टींबद्दल जाणून घेण्यास रस असतो असे त्यांनी सांगितले.

शेवाळेंनी ज्योतिषशास्त्राचा अभ्यास इयत्ता ९वी मध्ये असताना करायला सुरुवात केली. ‘नेपोलियन प्रश्नावली’ हे पहिले पुस्तक त्यांनी वाचले. नेपोलियन प्रश्नावली ही रमल शास्त्राच्या आधारे तयार करण्यात आली होती. याची एक कथाही त्यांनी सांगितली. ती अशी की, रमल शास्त्र हे भगवान शंकराने पार्वती मातेला भूत, भविष्य, वर्तमान हे जाणून घेण्यासाठी ही विद्या शिकवली. द्वापारयुग म्हणजेच महाभारत ज्या काळात घडले त्या काळापासून रमल विद्येला साडेपाच हजार वर्षे झाली आहेत. ही विद्या तेव्हापासून प्रचलित झाली आहे. या विद्येचा प्रचार, प्रसार मुस्लीम धर्मातील लोकांनी केला. त्यामुळे रमल शास्त्राला ‘दौलते इस्लाम’ असे देखील म्हटले जाते.

आघाडीचे रमलतज्ज्ञ म्हणून शेवाळे यांची भारतभर ख्याती आहे. २०-२१ व्या शतकात कृष्णमूर्ती, लाल किताब अशा भविष्य सांगण्याच्या १०० पेक्षा अधिक वेगवेगळ्या पद्धती अस्तित्वात आल्या. शेवाळेंकडे ५००० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी या रमल शास्त्राचे शिक्षण घेतले आहे, तर १००० विद्यार्थी हे लाल किताब शिकले आहेत. रमलविद्येच्या आधारे एकदिवसीय क्रिकेट सामन्यातील विजयी संघाचे भाकित कसे करावे? यावर त्यांनी विशेष संशोधन केले आहे. त्यांनी ‘वर्ष १९९९ ते २०१५ या कालावधीत झालेल्या क्रिकेटमधील पाचही विश्वचषक स्पर्धांमध्ये विजेता संघ कोणता असेल?’ याचे अचूक भविष्य सांगितले आहे. ते खऱ्या अर्थाने भविष्याचे वर्तमानकार आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -