- कथा : प्रा. देवबा पाटील
वाऱ्यांचे दोन प्रकार आहेत. एक जगव्यापी वारे व दुसरे स्थानिक स्वरूपाचे वारे. जागतिक स्वरूपाचे मुख्य वारे विषुववृत्तापाशी सुरू होतात. तेथे सूर्याची उष्णता सर्वात जास्त असते. अशा प्रकारचे वारे वर्षभर एका दिशेने वाहतात, त्यांना नियमित वारे म्हणतात. काही वेळा स्थानिक वारे त्यांना अडथळा करतात. पण स्थानिक वारे अल्पायुषी असतात.
त्यादिवशी ज्ञानवर्धिनी शाळेतील आठव्या वर्गातील सारी मुले-मुली वर्गात त्यांच्या रसायनशास्त्राच्या देशमुख सरांची वाट बघत होते. त्यावेळी बाहेर जरा जोराचा वारा सुटला होता. मुला-मुलींनाही तो वारा वर्गात जाणवला. तेवढ्यात सर वर्गावर आले. सरांची हजेरी घेऊन झाली.
“वाऱ्यांचे किती प्रकार आहेत सर?” धमेंद्राने प्रश्न केला.
“वाऱ्यांचे दोन प्रकार आहेत. एक जगव्यापी वारे व दुसरे स्थानिक स्वरूपाचे वारे. जागतिक स्वरूपाचे मुख्य वारे विषुववृत्तापाशी सुरू होतात. तेथे सूर्याची उष्णता सर्वात जास्त असते. विषुववृत्तावरील हवा अति उष्णतेमुळे तापून जास्त उंचीवर जाते नि उत्तर व दक्षिण ध्रुवांच्या दिशेकडे ढकलली जाते. विषुववृत्त ते ध्रुव यांच्या दरम्यानच्या अंतरात सुमारे एक तृतियांश प्रवास केल्यानंतर ती हवा थंड बनते व जमिनीवर खाली येते. त्या हवेपैकी काही हवा परत विषुववृत्ताकडे येऊ लागते आणि पुन्हा तापते. तिच्यापैकी काही हवा ध्रुवांच्या दिशेने वाहू लागते. अशा प्रकारचे वारे वर्षभर एका दिशेने वाहतात. त्यांना नियमित वारे म्हणतात. पण काही वेळा स्थानिक वारे त्यांना अडथळा करतात. त्यांची दिशा बदलून टाकतात. बाहेरून येणाऱ्या थंड किंवा ऊबदार वाऱ्यांमुळे काही ठिकाणी उच्च किंवा कमी दाबाचे पट्टे निर्माण होतात. त्यामुळे जे वारे वाहतात त्यांना स्थानिक वारे म्हणतात. ते अल्पायुषी असतात.” सरांनी सविस्तर सांगितले.
“सर ते पावसाचे मोसमी वारे म्हणजे कोणते वारे असतात?” जयेंद्रने प्रश्न केला.
“दिवसा समुद्राच्या पाण्यापेक्षा जमीन जास्त तापते. त्यामुळे जमिनीवरची हवा जास्त तापते आणि वर जाते. या हवेची जागा समुद्रावरील थंड हवा घेते. म्हणून दिवसा समद्राकडून जमिनीकडे वारे वाहतात त्यांना समुद्रवारे किंवा खारे वारे म्हणतात. रात्री मात्र समुद्रापेक्षा जमीन लवकर थंड होते. त्यामुळे रात्री वारे उलट दिशेने म्हणजे जमिनीकडून समुद्राकडे वाहतात. त्यांना मतलई वारे किंवा भुवारे म्हणतात. भुवारे व समुद्रवारे हे ऋतुनुसार वाहतात म्हणजे ते हंगामी असतात म्हणूनच त्यांनाच मोसमी वारे म्हणतात. ते ऋतुप्रमाणे ठरावीक काळाने दिशा बदलून उलटे वाहतात म्हणून त्यांना मान्सूनचे वारेसुद्धा म्हणतात. या वाऱ्यांमुळेच पाऊस पडतो. आपल्या भारताच्या तिन्ही बाजूला समुद्र आहे. ते हिंदी महासागराकडून म्हणजे नैऋत्य दिशेकडून येतात म्हणून त्यांना नैऋत्य मोसम हिंदी महासागरी वारेही म्हणतात. ते उन्हाळ्यात भारताकडे येतात, चार महिने पाऊस पाडतात व हिवाळ्यात परत समुद्राकडे जातात.” सरांनी स्पष्ट करून सांगितले.
“चक्रीवादळ कसे होते हे सांगा ना आम्हाला सर.” कुंदाने म्हटले.
“एखाद्या ठिकाणी वातावरणातील उष्णतेने अचानक हवेचा दाब कमी झाला की त्या ठिकाणी निर्वात पोकळी तयार होते. त्या निर्वात पोकळीकडे आजूबाजूची हवा अत्यंत वेगाने व खूप जोराने एकदम घुसते. त्या वेगाने घुसणाऱ्या हवेमुळे तेथे वादळ तयार होते व ते कोणत्याही दिशेकडे धावत सरकू लागते. निर्वात पोकळीत सभोवतालची हवा जर सर्व बाजूंनी जोराने एकदम शिरली, तर सर्व बाजूंच्या हवेच्या रेट्यामुळे तेथे हवेचा भोवरा तयार होतो. त्याला गोलाकर गती नि प्रचंड शक्ती प्राप्त होते. त्यालाच आवर्त किंवा चक्रीवादळ असे म्हणतात. चक्रीवादळाच्या भोवऱ्याला चक्रीवादळाचा डोळा असेही म्हणतात. भोवऱ्यात वेगाने फिरणाऱ्या वाऱ्यामुळे त्याचे तापमान वाढते व ते चक्रीवादळ अधिकच वेगाने फिरते व पुढे जाते. चक्रीवादळाचा चक्राकार १२५ ते १५० कि.मी. एवढा असतो, तर वाऱ्याचा वेग ताशी १२० ते २०० कि.मी पर्यंत असतो. या चक्रीवादळाचा जोर कित्येक तास कायम राहतो, कधी कधी, तर दिवसभर वा रात्रभरही असतो. हे चक्रीवादळ त्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक वस्तूला उखडून दूर फेकते एवढे प्रचंड सामर्थ्य त्यामध्ये असते म्हणून ते दिसताबरोबर त्यापासून दूर जाणेच इष्ट असते; परंतु या चक्रीवादळात जर दुरून भरपूर पाणी फेकले, तर त्यातील हवेला पाण्यामुळे थंडपणा येतो, पोकळीतील हवेचे तापमान कमी होते व त्यामुळे तेथील हवेचा तयार झालेला कमी दाब हा वाढतो नि सर्व ठिकाणी पूर्ववत सारखा होतो. त्यामुळे वादळ असो वा चक्रीवादळ असो ते पाणी फेकल्याने कमी होते नि थांबते.” सरांनी स्पष्टीकरण दिले. रोजच्यासारखी तास संपल्याची घंटी झाली व त्या दिवशीचे सरांचे शिकवणे अपूर्णच राहिले व मुलेही थोडी नाराजच झाली.