- क्राईम : अॅड. रिया वारंजकर
अर्चना व संजय यांचं आंतरधर्मीय लग्न होतं. दोघेही वेगवेगळ्या जाती-धर्माचे होते. त्यांचा प्रेमविवाह होता. घरामधून साहजिक विरोध असल्यामुळे त्यांनी पळून जाऊन लग्न केलेलं होतं. दोघांनी ठरवलं होतं, किती वाईट परिस्थिती असली तरी एकमेकांना आपण साथ द्यायची. अर्चना ही आपल्या नवऱ्याला घरकाम करून आर्थिक मदत करत होती व आपण संजयची निवड केली आहे ती किती योग्य आहे, हे तिला आपल्या घरातल्या लोकांना पटवून द्यायचं होतं.
दोन-चार वर्षे झाली तरी त्यांच्या संसारवेलीवर काही फूल फुलेना. अर्चनाने अनेक डॉक्टरांकडे उपचार केले. अर्चनामध्ये दोष आहे, असं प्रत्येक ठिकाणच्या डॉक्टरांनी सांगितले आणि त्याच दरम्यान संजय हा सुधा नावाच्या एका तरुणीच्या प्रेमात पडला. अर्चनाने त्याला अनेक प्रकारे समजावण्याचा प्रयत्न केला. म्हणून अर्चनावर संजयने रॉकेल ओतून तिला जाळण्याचा प्रयत्न केला. जखमा तिच्या शरीरावर आणि मनावर ठसल्या गेल्या होत्या. तरी तिचं संजयवरचे प्रेम कमी झालं नाही आणि या प्रेमाखातर तिने संजयला दुसरं लग्न करण्याची संमती दिली अर्चनाला वाटायला लागले की, आपला दोष आहे, म्हणून संजय एका दुसऱ्या मुलीच्या प्रेमाकडे खेचला गेला असेल किंवा आकर्षित झाला असेल आणि संजय आणि त्याच्या आईला संजयच्याच रक्ताची मुलं हवी होती ते दत्त घ्यायला तयार नव्हते.
सरतेशेवटी अर्चनानेच सुधा आणि संजय यांचं लग्न लावून दिलं. लग्न लावून देताना तिने स्वतःच्या हृदयावर मात्र दगड ठेवून घेतला होता. संजय आणि दोन्ही बायकांना एकत्र नांदवण्याचा निर्णय घेतला कारण, अर्चनाने लग्न केलं, त्याच वेळी तिचं माहेर सुटलेलं होतं. अर्चना हिने सासूच्या मदतीने घरातच भट्टीवर दारू बनवण्याचा व्यवसाय सुरू केला आणि त्यावर आपल्या घराचा भार ती ओढू लागली.
संजय सुधाच्या प्रेमात एवढा वेडा झाला होता, तो दिवसभर घरीच असायचा, धड कामालाही जात नव्हता आणि सुधाला आपण किती सुंदर आहोत. आपण नवऱ्याच्या दुसऱ्या बायको आहोत, आपल्यावर त्याचं प्रेम आहे आणि आपण त्याच्या मुलांना जन्म देऊ शकतो या घमेंडीमुळे असल्यामुळे ती घरकाम किंवा घरात अजिबात लक्ष देत नव्हती. व्यवस्थित राहणे, नट्टापट्टा करणे हा तिचा दिवसभर उद्योग असायचा. अर्चनावर सर्व घराचा भार येऊन पडलेला होता. दारूचा व्यवसाय आणि दुसऱ्यांच्या घरची धुणी भांडी करून ती आपलं घर चालवत असताना सासूची मदत घेत होती आणि यातच म्हणता म्हणता संजय आणि त्याची दुसरी पत्नी सुधा हिला तीन मुलगे आणि एक मुलगी असे अपत्य झाले. मात्र सुधाचा आपण या घरांना वारस दिले, आपण रक्तामासांची मुलं दिली असा तिचा तोरा अजून गेलेला नव्हता. सवतीची मुल असू देत, पण आपल्याला मोठी आई म्हणयेत ना यात अर्चना समाधानी होती. मुलांना सांभाळणं त्यांना नाहुपन्हा सगळी कामे अर्चना मनापासून करत होती. सुधाने मात्र मुलांना जन्म घातला, एवढेच काम केलेले होते. पण त्यांचा सगळा सांभाळ अर्चना करत होती.
यातच असं घडलं की, संजयची दुसरी पत्नी सुधा ही दारू भट्टीवर कामाला असलेल्या एका पोराबरोबर पळून गेली. लहान मुलांना अर्चनाच्या पदरात टाकून ती पळून गेलेली होती. याचा धक्का संजयला लागला. अर्चनापेक्षा त्यांनी सुधावर प्रेम केलं होतं, कारण ती त्याच्या मुलांची आई होती म्हणून. जिच्यावर प्रेम केलं, ती पळून गेली या धक्कातून संजय सावरू शकत नव्हता. अर्चनाने संजयला आधार दिला. त्यानंतर संजय अर्चनाला बोलला की, ‘तिला आपण शोधून आणूया. निदान मुलांसाठी तरी. कारण, मुलं अजूनही लहान आहेत.’ अर्चनाने यातही संजयची साथ दिली आणि संजयबरोबर ती सुधाला आणायला गेली आणि आपल्या पतीच्या प्रेमाखातर अर्चनाने सुधाला घरी घेऊन आली. एक महिना व्यवस्थित गेला व सुधा आणि संजयमध्ये नेमकं काय झालं ते समजलं नाही पण संजयने मात्र आत्महत्या करून जीव दिला. चारही मुलं लहान लहान होती. त्याशिवाय सुधा आणि सासू या सर्वांची जबाबदारी अर्चनावर येऊन पडली. अर्चना हिने चारही मुलांना काबाडकष्ट करून मोठं केलं. जेवढं त्यांची जन्मदाती सुधाने केलं नाही, तेवढं ते अर्चनाने केलं होतं. एवढेच नाही तर चारही मुलांची व्यवस्थित लग्न करून तिने दिली.
आपल्या मोठ्या सुनेने आपल्या मुलाचा संसार उभा केला. सवतीला आणि तिच्या मुलांनाही तिने आपलं मानलं म्हणून सासूने अर्चनाच्या नावावर घर केलं. सासूला अर्चनाने केलेल्या त्यागाची जाणीव होती. त्या त्यागाची परतफेड म्हणून तिच्या नावावर घर तिने केलं. आता आपल्या मुलीकडे राहण्यासाठी गेली होती. सुना आल्यामुळे घर अपुरे पडत होते, म्हणून सुधाने आपण भाड्याने एका बिल्डिंगमध्ये राहायला जाऊ असं सांगून सगळ्या कुटुंबाला ती भाड्याच्या घरात घेऊन गेली. दोन मुलगे एकत्र राहत होते व एक मोठा मुलगा वेगळा राहत होता. अर्चना आता वय झाल्यामुळे मोठा मुलगा याच्याकडे काही दिवस, तर नंतर सवत सुधा हिच्याकडे असलेल्या दोन मुलगे यांच्याकडे काही दिवस अशी राहात होती.
अर्चना हिचे झोपडपट्टीमध्ये दिवस गेल्यामुळे तिला फ्लॅटमध्ये अवघडल्यासारखं वाटत होतं. त्याच्यामुळे ती म्हणत होती की, मी माझ्या जुन्याच घरात एकटी जाऊन राहते किंवा तीन मुलांपैकी एक कुठलातरी मुलगा माझ्याकडे राहू दे. अशी बोलायला लागल्यामुळे सुधाने वन प्लस वन असलेली झोपडी दोन्ही हेवी डिपॉझिटवर भाड्याने दिली व त्याची पूर्ण रक्कम सुधाकडेच होती आणि याची कल्पना तिने अजिबात अर्चनाला लागू दिली नाही आणि सुधाकडे जेव्हा ती राहायला आली, त्यावेळी तिला हे सर्व समजलं. एवढंच सांगितलं की, ‘एक रूम तू भाडे घे आणि एका रूममध्ये राहते, तेव्हासुद्धा सुधा अजिबात ऐकली नाही व तिला राहत असलेल्या मुलाच्या घरातून हाकलून दिलं आणि आता अर्चना एका अनाथआश्रमामध्ये राहत आहे. तिच्या सासूने तिच्या नावावर घर करूनसुद्धा तिला घराच्या बाहेर बेघरासारखे राहावे लागत आहे. ज्या मुलांना सवतीची मुलं असूनही काबाडकष्ट करून वाढवले, त्या मुलांनाही तिच्या कष्टाची अजिबात जाणीव आता राहिलेली नाही. ज्या मुलांना लहान असताना त्यांच्या सख्ख्या आईने सोडून दुसऱ्या माणसाबरोबर गेली, तीच आई त्यांना आता आपली वाटत आहे आणि ज्या आईने जन्म न देता सांभाळ केला, ती मात्र त्यांना परकी वाटायला लागली आहे. ज्या घरात काबाडकष्ट करून दिवस काढले, लग्न करून आल्यानंतर माहेरी गेली नाही, अशी अर्चना. शेवटची तिची इच्छा आहे की, त्याच घरात तिचा शेवट व्हावा म्हणून त्या घरात राहायला मिळण्यासाठी ती धडपडत आहे आणि त्या घरात येऊ नये म्हणून सुधा तिला धमक्या देत असून अर्चना वेगवेगळ्या पुढाऱ्यांची मदत घेत आहे.
अर्चनाच्या त्यागामुळे सुधा त्या घरात संजयची दुसरी पत्नी म्हणून आली. त्याच्या मुलांची आई झाली आणि जिने सर्व तिच्यासाठी केलं, तिच ते विसरलेली असून तिच्यासाठी त्याग केलेल्या आपल्या सवतीलाच तिने घरातून बाहेर काढले.
(सत्यघटनेवर आधारित)