Tuesday, October 8, 2024
Homeसाप्ताहिककोलाजPoems : काव्यरंग

Poems : काव्यरंग

हिवाळ्याचं पाऊल

बाजेवरती बसून आजोबा
आदेश सोडती बाबाला
खारीक खोबरे घेऊन या रे
लाडक्या माझ्या नाताला

उन्हात बसून टोपी शिवते
आजी सांगते आईला
स्वेटर नवीन घेऊन या रे
लाडक्या माझ्या ताईला

मोठ्ठा आमचा मामा जेव्हा
गावी निघतो यायला
सुकामेवा आणीन म्हणतो
हिवाळ्याचा खायला

जसं पडतं अंगणामध्ये
हिवाळ्याचं पाऊल
आजी, आजा, मामा यांना
लागते पहिली चाहूल

हिवाळ्याच्या ऋतूमध्ये
कपडे आणतात ऊबदार
सुकामेवा खाऊन पुष्ठ
तब्येत बनते रुबाबदार
– भानुदास धोत्रे, परभणी

उंदीरमामाचा आजार

गारठणाऱ्या थंडीत
बिळाबाहेर आला उंदीरमामा
अंगात नव्हते स्वेटर
नव्हती कशाची तमा

सकाळी सकाळी
हवा होती गार
खोकलून खोकलून
झाला तो बेजार

दुखू लागले डोके
झाली त्याला सर्दी
बिळातल्या मित्रांची
झाली खूप गर्दी

कुणी दिले चाटन
कुणी दिले औषध कडू
बिचाऱ्या उंदीरमामाला
फुटले मग रडू

विविध घेतली औषधे
तरी वाटेना बरे
उंदीरमामा गेला त्रासून
उपाय संपले सारे

शेवटी एका मित्राचा
उपाय आला कामी
सुंठमिऱ्याचा काढा देऊन
युक्ती शोधली नामी

काही वेळातच उंदीरमामाचा
आजार दूर पळाला
आनंदाच्या भरात म्हणे
चला सर्व खेळायला

– रवींद्र व्ही. चालीकवार, महागाव, जि. यवतमाळ

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -