Saturday, July 6, 2024
Homeसाप्ताहिककोलाजBeautiful Moments : क्षण आनंदाचे...

Beautiful Moments : क्षण आनंदाचे…

  • कथा : प्रशांत कुळकर्णी

मेधा युरोपला जाणार ही बातमी माने आणि करवीर या दोन्ही कुटुंबांतील सदस्यांसाठी एक प्रकारे ब्रेकिंग न्यूज होती.

मेधाच्या आई-बाबा, दोघांनाही सतत माहेर-सासर, अशा दोन्ही आघाड्यांवरून मोबाइलवर फोन येतच होते. प्रबोधन सुद्धा सुरू होते. मेधा वाइन टेक्नॉलॉजीमध्ये मास्टर्स करण्यासाठी फ्रान्सला जायला निघण्याच्या अगोदर मामा, मामी, आजी, आजोबांनी, मेधाच्या आईला फैलावर घेतले होते.

मेधा दारू तयार करणार, पिणार आणि वाया जाणार अशा चर्चा होत होत्या. मेधाने फ्रान्स देशाची शिष्यवृत्ती आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर मिळवलेली आहे, या गोष्टींवर कुणाचाही विश्वास बसत नव्हता. मेधाच्या करामती बापाने कुणाला तरी मोठी टोपी लावली असेल आणि सगळे जमवून आणले असेल, लहानशा खुराड्यासारख्या घरात राहणाऱ्या मेधाला कसली मिळणार शिष्यवृत्ती! नुसतीच तिच्या बापाची बोलबच्चनगीरी! काय होणार आहे काय माहीत? मानेच्या अशा बेवड्या मुलीचे लग्न सुद्धा एखाद्या दारूड्या माणसाबरोबर लागणार! अशा तालबद्ध चर्चा घडत होत्या. आप्तेष्ट असेच काहीबाही, तर मित्र म्हणवणारे सुद्धा जमेल तसे नाक मुरडून घेत होते. मेधा तिचे आई-बाबा, बहिणी आणि मोठा काका मात्र आपल्या निर्णयावर ठाम राहिले होते.

मुंबई विमानतळावर आपले विमान साधारण चाळीस मिनिटांत उतरणार आहे, अशी घोषणा हवाई सुंदरीने आपल्या सडपातळ आवाजात केली होती. मेधाला सुद्धा कधी एकदा मुंबईमार्गे नाशिकला पोहोचून आई-बाबा आणि बहिणींना काकाला, भेटतोय असे झाले होते. मधेमधे तिला असा आठ-नऊ वर्षांपूर्वीचा भुतकाळ आठवत होता. त्या भुतकाळात कितीतरी विस्मयचकित करणाऱ्या घटना बंदिस्त झाल्याचे तिला आठवले आणि तिने सहजच आपल्या उजव्या बाजूला बसलेल्या सक्षमकडे सहजपणे पाहिले, पुन्हा ती विचारांच्या हिंदोळ्यावर झोके घ्यायला लागली.

सक्षम शांतपणे पुस्तक वाचत होता, त्याचा बोलका आणि कुणालाही आश्वस्त करणारा चेहरा, चालण्या-बोलण्यातील वागण्यातील विश्वास, त्वरित निर्णय घेण्याची धडाडी ती गेल्या दोन वर्षांपासून अगदी जवळून पाहात होती. तिला एका जगप्रसिद्ध वाइनरीत वाइन मेकर या पदावर नोकरी मिळाली होती, तिची कार्यकुशलता आणि कार्यतत्परता पाहून व्यवस्थापनाने त्यांच्या आणखीन एका नवीन वाइनरीच्या प्रकल्पावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी तिच्या खांद्यावर टाकली होती. नवीन वायनरीचा निर्माता, सल्लागार, सर्वेसर्वा होता सक्षम भावे आणि त्याची सदैव ॲक्शन मोडमध्ये असणारी टीम.

मेधाची आणि सक्षमची ओळख त्या प्रकल्पाच्या सुरुवातीपासून झाली होती, सात-आठ महिन्यांत नवीन वायनरीच्या चाव्या मेधाच्या ताब्यात देऊन सक्षम दुसरा प्रकल्प उभारण्यात व्यस्त होणार होता.
ती त्याच्याकडे एकटक पाहात होती. त्याच क्षणी सक्षमने तिच्याकडे पाहिले, त्याचे गहिरे डोळे जणू काही तिच्या मनाचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहेत असा तिला भास झाला, सक्षम आपला भविष्यातील जोडीदार म्हणून योग्य आहे का? असा कवडसा तिच्या मनाला हलकेच मयूरपंखी स्पर्श करून गेला. ती किंचितशी लाजली. तिच्या चेहऱ्यावर पसरलेली ती नाजूक लाजलेली रेषा सक्षमने आपल्या डोळ्यांत साठवून घेतली.

“मेधा काही हवे आहे का”? बस आता नेक्स्ट एक-दोन तास, मग तू नाशिक आणि मी पुणे!

“सक्षम तू होतास म्हणून दोन वर्षे वायनरीतली आणि कोविडचा कसोटीचा काळ मला किती सहजपणे पार पाडता आला! मी तुला मिस करणार, मी कबूल करते सक्षम!” मेधाने कबुली दिली.

सक्षमच्या चेहऱ्यावर मात्र काहीतरी लपवून ठेवल्याचे भाव दिसत होते. आता जे भाव तिला सक्षमच्या डोळ्यांत दिसत होते, ते यापूर्वीसुद्धा तिला दिसले होते. जेव्हा मेधाने आपल्या सुरुवातीच्या दिवसातील माँटेपेअरमधली एक आठवण सक्षमला कॅलिफोर्नियातील नवीन वाइनरीचे बांधकाम सुरू असताना सांगितली होती.

तिने सक्षमला सांगितलेली गोष्ट तिला पुन्हा आठवली. पॅरिसपासून साडेसातशे आठशे किलोमीटरचा रेल्वेने प्रवास करून ती तिच्या विद्यापीठाच्या गावात म्हणजे माँटेपेअर नावाच्या छोटेखानी गावात पोहोचली होती. चहूकडे पसरलेल्या द्राक्षांच्या मळ्यांनी जणू काही ते टुमदार गाव आपल्या कुशीत घेतलेले होते.

फ्रान्सच्या पुरातन काळापासून पारंपरिक वैभवशाली सौंदर्यांने नटलेल्या विद्यापीठाच्या संकुलातील असंख्य इमारती पाहून मेधाच्या मनावर एक प्रकारचे विलक्षण दडपण आले होते.

मुलींच्या हॉस्टेलमध्ये तिच्या मनाजोगती रूम तिला मिळाली. चेहरा सतत लघू आणि दीर्घ आकसणारी, डोळे, संगणकाच्या कर्सरसारखे डाव्या उजव्या बाजूला सहजपणे फिरवणारी शियाँन नावाची चीन देशाची मुलगी तिच्या रूममध्ये सहभागी होती. मेधाच्या अस्सल महाराष्ट्रीयन स्नेहपूर्ण वागणुकीमुळे तिच्या मित्रकोशात शियाँन कायमचीच जमा झाली. बँकेत खाते उघडून झाले, तिच्या बाबांनी पदरच्या पैशांनी खर्च केलेला प्रवासखर्च तिच्या खात्यात सरकारच्या माध्यमातून जमा झाला. तेथील सरकारने विद्यार्थ्यांसाठी दाखवलेली आपुलकी आणि तत्पर सहाय्य कौतुकास्पद होते. चार दिवसांनी तिचे अध्ययन सुरू होणार होते.

आपल्या देशातील, आपल्या महाराष्ट्रातील कोण दिसतं आहे का? याचा शोध ती मनाचे डोळे उघडे ठेवून पाहात होती. पण तसे तिला कोणी भेटले नाही. तिला घरची आठवण येऊ लागली. आई, बाबा आणि तिच्या तीन बहिणींचे चेहरे, तिची पाठ सोडत नव्हते. कंटाळ्याच्या काढ्याचे उतू जाणारे श्वास तिला एका जागी बसून देईनात. ती निघाली, स्वतःमध्ये स्फूर्तीचा रिचार्ज भरून ती त्या लहानशा गावातील पायवाटांशी गट्टी करत चालायला लागली.

एका चौकात तिची नजर एका लहानशा टुमदार घरावर गेली. काही क्षण ती स्तब्ध झाली, घरावर सुंदर घेरेदार गुढी दिमाखात लावली होती. आपण असे भटकण्यापेक्षा बॅगा उघडून सामान लावायला हवे होते, कॅलेंडर बाहेर काढून लावले असते, तर कळले असते आज गुढीपाडवा आहे ते. असे विचार मनातच थांबवून तिने गुढीला मनोभावे नमस्कार केला. मराठी मनाचा वावर आसपास असणारच, असा विश्वास मेधाच्या मनात रुंजी घालत असतानाच त्या घराचे मुख्य दार उघडले गेले, एक वयस्कर घरंदाज, मराठमोळे दाम्पत्य दाराच्या बाहेर बागेतल्या खुर्चीवर स्थानापन्न होण्याच्या उद्देशाने पुढे येत होते. दोघांच्याही हातात चहाचे कप होते. इतक्यात त्या महिलेची नजर मेधाकडे गेली दोघींची नजरानजर झाली. आता मात्र मेधा गोंधळून गेली, तिला अवघडल्यासारखे झाले.

“काय गं मराठी वाटतेस! कुणाला शोधत आहेस?” त्या महिलेच्या प्रश्नाने मेधा भानावर आली आणि त्या घराच्या अंगणात तिची पावले आपसूकच वळली. नंतरच्या घटना अगदी मराठमोळ्या पद्धतीने पानात वाढलेल्या पुरणपोळीवर तुपाचे थर पसरावे तशा स्नेहमय वातावरणात घडत गेल्या. भावेकाका द्राक्षांचे संगोपन आणि संरक्षण करणारे सल्लागार म्हणून माँटेपेअरमध्ये आपला व्यवसाय करीत होते, तर भावे काकी माँटेपेअर वाइन विद्यापीठात ग्रंथपाल होत्या. एका गुढीमुळे पहिले ओळख, नंतर मैत्री जमली ती कायमचीच. दोन वर्षे भावे काका-काकींमुळे आनंदात गेली.

पुढे मेधाने तेरा-चौदा देश फिरून अनेक वाइनरीमधून सेलार, कामगार, सुपरवायजर, प्रयोगशाळा सहाय्यक अशा प्रकारच्या वाइन उत्पादन क्षेत्रातील हंगामी नोकऱ्या मिळतील, त्या पगारात केल्या. शेवटी कॅलिफोर्नियातील अवाढव्य वायनरीमध्ये वाइन मेकर या मोठ्या हुद्द्यावर स्थिरस्थावर झाली. सक्षम भावे तिच्या चांगल्या परिचयाचा झाला, तेव्हा तिने त्याला, तिला माँटेपेअरला भेटलेल्या भावे काका आणि काकींची गोष्ट सांगितली, तेव्हा तो असाच गूढ हसला होता.

मेधाला त्या गूढ हसण्याचा थांगपत्ता लागत नव्हता. आता तो पुन्हा तसाच हसला होता. मेधा विचारच करत राहिली. विमानतळावर सर्व सोपस्कार पूर्ण करून दोघेही मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर आले. सक्षम आपल्या आई-बाबांना शोधत होता. मेधाचे डोळे आपल्या बाबांना शोधायला भिरभिरत होते. इतक्यात तिला तिच्या बहिणी आई आणि बाबा एकत्रच दिसले, ती त्या दिशेने झपझप आपली ट्रॉली ढकलत जायला लागली. सक्षम आपल्यासोबत आहे याचे तिला भानच राहिले नाही.

तिच्या तीन बहिणींनी तिला घेरा घातला होता. सगळ्यांची गळाभेट झाल्यावर ती आईबाबांकडे वळली, तेव्हा तिला आश्चर्याच्या आनंदी क्षणांचा अनुभव मिळायला सुरुवात झाली. तिला माँटेपेअरला भेटलेले भावे काका आणि भावे काकी तिच्या आई-बाबांसोबत गप्पा मारत उभे होते. त्यांना पाहून मेधा धावतच भावे काकींच्या मिठीत गेली आणि म्हणाली,
“आई या भावे काकी माझ्या
माँटेपेअरच्या आई!”
“मेधा आणि एकटीच कशी आलीस आमच्या बंड्याला मागे ठेवून आलीस की काय?”
“बंड्या कोण, माझा सक्षम भावे
तुमचा बंड्या?”
मेधाच्या तोंडून ‘माझा सक्षम’ असे उद्गार अनावधानाने निघाले. त्यामुळे विमानतळावर उपस्थित भावे-माने परिवारांच्या व्याहीपणाच्या रेषा निश्चित झाल्या.

मेधाला एक आगळेवेगळे सरप्राइज देण्यासाठी सक्षम मात्र यशस्वी झाला होता. ते आनंदाचे क्षण कसे असतील, त्याचा अनुभव घेण्यासाठी माने आणि भावे नावाची दोन कुटुंबे विमानतळावर जमा झाले होते. नाशिक आणि पुणे आता लवकरच भावे आणि माने परिवारांला एकमेकांच्या जवळचे वाटणार होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -