- भालचंद्र कुबल : पाचवा वेद
सात-आठ वर्षांपूर्वीचा ‘अवघा रंग एकचि झाला’चा पहिला प्रयोग साहित्य संघात झाला आणि एक अभिजात संगीत कलाकृती मराठी रंगभूमीस मिळाल्याचा सार्थ अभिमानही वाटला होता. मराठी संगीत नाटक हा भारतीय नाट्यपरंपरेतला महत्त्वाचा टप्पा समजला जातो. १८८० ते १९६० एवढा मोठा कालखंड संगीत नाटकाचा सुवर्णकाळ समजला जातो. संगीत नाटकाने मराठी रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. मात्र त्याच्या ऱ्हासास हेच संगीत नाटक कारणीभूत समजले जाते. लोकाश्रय लाभलेल्या या नाटकांच्या पुढे “संगीत मैफली” होऊ लागल्या. ज्या प्रेक्षकवर्गास गद्य किंबहुना संवादी नाटकात रस होता, त्यांची तासन् तास चाललेल्या गायनी नाट्यामुळे पंचाईत होऊ लागली आणि हळूहळू तो प्रेक्षकवर्ग सामाजिक किंवा ऐतिहासिक नाटकांकडे वळला. आज महाराष्ट्रात संगीत नाटक जिवंत ठेवण्याचे कार्य मात्र एका हाताच्या बोटावर मोजता येतील, अशा काही संस्था आणि महाराष्ट्र राज्य मराठी नाट्य संगीत स्पर्धेमार्फत सुरू आहेत. संगीत नाटकांबाबत अजूनही मराठी प्रेक्षकात आवड आहे याचा अनुभव रत्नागिरी, कोल्हापूर अथवा नाशिक येथे होणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या या स्पर्धा प्रयोगांमधून येत असतो; परंतु मुंबई मराठी साहित्य संघ ही संस्था सोडल्यास सातत्याने पारंपरिक मराठी संगीत नाटकाची निर्मिती करायला कुठलीही संस्था धजावत नसल्याचेही दिसून आले आहे. कारण हेच की मराठी संगीत नाटक आता लयास जाण्याच्या मार्गावर आहे आणि त्यास प्रेक्षकवर्ग उरलेला नाही.
मात्र सात वर्षांपूर्वी अमेरिकास्थित डॉ. मीना नेरुरकर, अशोक समेळ आणि नाट्यसंपदेच्या पणशीकर कुटुंबीयांनी हा चमत्कार घडवून आणला होता. साधारण पाचशेच्या आसपास प्रयोग झालेल्या या नाटकास प्रचंड लोकप्रियता लाभली होती आणि तेच नाटक नव्या संचात रंगभूमीवर पुन्हा प्रवेशकर्ते झाले आहे.
सॅम्युअल बेकेटच्या सैद्धांतिक विवेचनानुसार दोन परस्पर विरोधी तत्त्वांच्या व्यक्तिरेखानी साधलेला संवाद हे संघर्षमय नाट्य असते. याचा अनुभव अनेकानेक नाटक, सिनेमातून आजवर आपण पाहात आलो आहोत. त्यात बाप-लेकामधील तत्त्वांचा संघर्ष तर अधिकच नाट्यमय वाटतो आणि बघायलाही आवडतो. मुळात जनरेशन गॅपचा तांत्रिक मुद्दाही या संघर्षात महत्त्वाची भूमिका निभावतो. “अवघा रंग…”मध्ये हाच फाॅर्म्युला लेखिका डॉ. मीना नेरुरकरांनी वापरल्याने तो यशस्वी होणार यात शंका नाही.
कीर्तनकाराच्या मुलाने म्हणजे सोपानने पारंपरिक भजनी चाली सोडून त्यास आंतरराष्ट्रीय क्षितिजावर झळकावयास नव्या संस्कारांची कास धरण्याची कल्पनाच मुळी अप्पासाहेबांना रुचलेली नाही. अभंग या काव्यप्रकाराची निर्मिती ही संगीताधिष्ठित मूल्यांशी त्या रचना एकजीव झाल्याने संतांद्वारा रचली गेलीय, त्याला पाश्चात्त्य संगीताचा बाज चढवता येऊच शकत नाही या मद्द्यावर अप्पासाहेब ठाम आहेत. मात्र सोपान याविरुद्ध आपली भूमिका मांडताना, संगीत हे कुठल्याही भौगोलिक क्षेत्राची मक्तेदारी नसून अमर्यादता त्याचा स्वभाव आहे आणि भक्तिसंगीताने पारंपरिक सीमारेषा ओलांडायला हरकत असू नये हा मुद्दा मांडतो. या संघर्षातून जे निर्माण होतं ते म्हणजे “अवघा रंग एकचि झाला.”
लेखिकेने पाश्चात्त्य संगीताचे विश्लेषण किंवा भक्तिसंगीताबरोबर पाश्चात्त्य संगीताची तुलना केलेली नाही. त्याऐवजी एक छान ‘जेनी’ नावाचा डिव्हाईस वापरलाय. जो इमोशनली पाश्चात्त्य संगीताची बाजू मांडतो. सोपान आणि अप्पासाहेब यांच्या संघर्षमय चर्चेतून शिल्लक राहिलेला मुद्दा पुढे जेनी नामक व्यक्तीरेखा मांडते… आणि खऱ्या अर्थाने अप्पासाहेब कन्व्हिन्स होतात. नव्या नाटकात मायकल जॅक्सनचं ‘वी आर द वर्ल्ड’ या गाण्याचा वापरही चातुर्याने करून घेण्यात आला आहे. संगीत हाच मुळात या नाट्याचा जीव असल्याने विविध नाटकांतील गाजलेली पदं जेव्हा सोपान अथवा नानांच्या (गौतम मुर्डेश्वरांच्या) गायकीतून ऐकतो, तेव्हा दाद आणि वन्समोअर मिळाल्याशिवाय राहात नाही. मी मुद्दाम आधीच्या नाटकाची आणि या नाटकाची तुलना टाळलीय ती याचसाठी की दोन्ही नाटकांची बलस्थानं वेगवेगळी आहेत. काही प्रेक्षकांना जान्हवी पणशीकर आई आणि आजीच्या भूमिकेत भावल्या होत्या, तर या प्रयोगातील अपर्णा अपराजितही यंग मदर आणि ग्रॅनीच्या भूमिकेत खूपच आवडतात. त्यांचा मधाळ अन् सात्त्विक वावर नाटकावर प्रभाव टाकतो. मात्र एवढ्या पट्टीची गायन क्षमता असूनही त्यांच्या वाट्याला म्हणावी तशी पदं आलेली नाहीत याची चुटपूट लागून रहाते.
प्रमोद पवारांबद्दल लिहावं तितकं थोडंच आहे. प्रसाद सावकारांची भूमिका प्रमोद साकारणार हे ऐकताच, त्यांच्या वाट्याच्या पदांचं काय? हा प्रश्न होताच. कारण प्रमोद पवार काही गायक नट नाहीत. भजन, साकी, दिंडी ते गाऊ शकतात; परंतु प्रमुख नाट्यपदांचं काय होणार? हा विचार होताच; परंतु दिग्दर्शिकेने यातून काढलेला सुवर्णमध्य अत्यंत वाखाणण्याजोगा आहे, जो प्रेक्षकांच्या लक्षातही येत नाही. गौतम मुर्डेश्वर हे गायकनट म्हणून आधीच्या नाटकांपेक्षा या नाटकात अधिक लक्षात राहतात आणि प्रमोद पवारांच्या गायकीचा भार याच सुवर्णमध्यामुळे हलका झाला आहे. मात्र पवारांच्या संवादातील चढउतार, संवादफेक, आवाजाची पोत लावण्याचं कसब गायकीची कमतरता नक्कीच भरून काढतात.
सोपानच्या भूमिकेतील ओमकार प्रभूघाटे आणि जेनीच्या भूमिकेतील श्रद्धा वैद्य त्यांच्या वाट्याला आलेल्या पदांमुळे टाळ्या आणि वन्समोअर घेतात; परंतु दोघांनीही अभिनयावरही तेवढीच मेहनत घ्यायला हवी. दोघांनीही फूटवर्क सुधारायला हवं. नाटकात आपण ज्या नटांसमोर उभे आहोत ते कसलेले रंगकर्मी आहेत, त्यानुसार निदान त्यांच्या मुव्हमेंट्स असायला हव्या होत्या. उदाहरणार्थ मुक्ताची भूमिका साकारणाऱ्या गौरी सुखटणकरांबरोबर पदन्यासावर जोर देत नव्या चालीचे भजन गाताना श्रद्धा वैद्य थोड्या भांबावल्यासारख्या वाटल्या. गौरी सुखटणकरांची वेशभूषा मात्र सात्त्विक वातावरणात गडद का होती ते समजले नाही. मुक्ताची व्यक्तिरेखा इतरांच्या मानाने जरी छोटी असली तरी गायन व नृत्याची जोड केवळ एकाच व्यक्तिरेखेला असल्याने ती स्मरणात रहाते.
अवघा रंग एकचि झाला हे सात वर्षांपूर्वी अशोक समेळांनी बांधून घेतलेलं एक चपखल व्यावसायिक संगीतानुभव देणारं पॅकेज होतं, आजही डॉ. मीना नेरुरकरांनी सूक्ष्म बदल करत “रिडेव्हलप” केलेलं ते एक एण्टरटेन्मेंट पॅकेजच आहे. संदेश बेंद्रे यांचं पुणेरी वाड्याचं नेपथ्य आणि शीतल तळपदे यांची प्रकाश योजना नाटकाला पुरक अशीच आहे. पं. रघुनंदन पणशीकरांच्या संगीताला सुहास चितळे (तबला) आणि केदार भागवत (ऑर्गन) यांची साथ म्हणजे संपूर्ण नाट्याकृतीच्या शिरपेचातील तुरेच म्हणावे लागतील…!
एकंदरीत नाट्यरसिकांस आनंद देणारे हे नाटक आबालवृद्धांच्या पसंतीस उतरेल यात शंका नाही.