- विशेष : उमेश कुलकर्णी
भारताचा तडाखेबंद फलंदाज विराट कोहली याने बुधवारी न्यूझीलंडविरोधात खेळताना सचिन तेंडुलकरचा ४९ शतकांचा विक्रम मोडून काढून ५० वे शतक झळकावले आणि त्याच्या या ऐतिहासिक शतकाचे साक्षीदार १३० कोटी देशवासीय राहिले. विराटच्या विक्रमामुळे विश्वचषकातील भारताच्या वाढत्या क्रिकेट विश्वातील ताकदीचे प्रत्यंतर आणून दिले आहे. विराट या विक्रमाची वाट अवघा देश पाहत होता आणि मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा क्षण यथार्थ झाला. विराट हा आता एकदिवसीय सामन्यात पन्नास शतके झळकावणारा जगातील पहिला खेळाडू ठरला आहे. त्याच्या या शतकी घौडदौडीपुढे अर्थात आदर्श सचिन तेंडुलकर आहे. पण विराटने आपल्या विक्रमी शतकानंतर सचिनला मानाचा मुजराच केला आहे. विराटच्या या विक्रमी शतकामुळे भारताचा दबदबा आता क्रिकेट विश्वातही वाढला आहे. भारत हा आता कसाबसा संथपणे खेळून सामना वाचवणारा देश राहिलेला नाही, तर त्याला आता जिंकण्याची सवय लागली आहे, हे ही विराटच्या या खेळीमुळे दाखवून दिले आहे. कशा तरी टुकुटुकु खेळून पन्नासच्या वर धावा करून सामना अनिर्णित राखण्यात सर्वस्व मानणारे खेळाडू आणि एकदिवसीय सामन्यातही संथपणे खेळून पराभव टाळणारे खेळाडू आता संपले आहेत.
आता विराटच नव्हे तर श्रेयस, राहुल यांच्यासारखे झंझावाती खेळून शतकावर शतके रचणारे नव्या दमाचे खेळाडू आले आहेत. वीरेंद्र सेहवागने तडाखेबंद खेळी केली, तर ती पूर्वी बातमीचा विषय़ होत असे. आता सारेच खेळाडू प्रचंड ताकदीने खेळत असतात आणि विराटने आज जो विश्वविक्रम केला आहे, तो सामान्य नव्हेच. समोर दुबळ्या नेदरलँड्सचे किंवा अफगाणिस्तानचे गोलंदाज नव्हते, तर बलाढ्य समजल्या जाणाऱ्या न्यूझीलंडचे गोलंदाज म्हणजे टीम साऊदी वगैरे होते. विराटचे फलंदाजीचे कसब असे की त्याने बॅट म्यान न करता शतक झळकावून न्यूझीलंडविरोधात ३९७ धावांचे तगडे आव्हान दिले होते. भारताच्या पहिल्या विश्वचषक स्पर्धेत पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताच्या सुनील गावसकरने १७४ चेंडूंत ३६ धावा केल्या होत्या. तेथून आज भारत कुठपर्यंत आला आहे हे पाहिले तर डोळे विस्फारतात. केवढी मजल भारताने मारली आहे. आज क्रिकेट संपूर्ण बदलले आहे. खेळाडू प्रचंड गतिमान खेळू लागले आहेत आणि कसोटी क्रिकेट कंटाळवाणे असल्याने प्रेक्षकांनी क्रिकेटकडेच एकूण पाठ फिरवली होती. तेव्हापासून लोकांना क्रिकेटकडे पुन्हा वळवण्यासाठीच तर एकदिवसीय सामन्यांचा जन्म झाला. केन बँरिंग्टन हा अति संथ खेळासाठी प्रसिद्ध होता. त्याच्यासारख्या खेळाडूंमुळे तर लोक कसोटी क्रिकेटकडे सवतीकडे पाहिल्यासारखे पाहत. पण क्रिकेट हे इतके कंटाळवाणे नव्हते. ते तसे केले ते केन किवा जॉफ बॉयकॉटसारख्या खेळाडूंमुळे. त्यात आता आमूलाग्र बदल झाला आहे. आज संथ खेळणाऱ्या फलंदाजांना संघात स्थानच नाही, इतके स्थित्यंतर झाले आहे. आज चेतेश्वर पुजार आणि रहाणेसारख्या खेळाडूंना संघात स्थान दिले जाऊ शकत नाही. अर्थात त्यांना कसोटीत स्थान आहे. पण आज क्रिकेट लोकप्रिय झाले आहे ते विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यासारख्या खेळाडूंमुळे. त्यामुळे आज मुले रोहित आणि विराटचे अनुकरण करू पाहतात. आज त्यांचा आदर्श हा सुनील गावसकरही नाही किंवा अगदी कपिलदेवही नाही. तर त्यांचा आदर्श रोहित आणि विराट हेच आहेत. विराटने सचिन तेंडुलकरला मागे टाकले आहे. विक्रम हे मोडण्यासाठीच होत असतात, हे विराटने दाखवून दिले. त्याच्या या ऐतिहासिक विक्रमी शतकाची खेळी टुकुटुकु खेळून नव्हे तर जबरदस्त झंझावाती खेळामुळे सजली.
पूर्वी फलंदाजाने दोन षटकार मारले तर त्याला सर्वाधिक आकर्षक खेळाडू समजत. आज विराटसारखा किंवा श्रेयस अय्यर किंवा केएल राहुलसारखा खेळाडू पूर्वीच्या खेळाडूंनी आयुष्यात षटकार मारले नसतील तेवढे एकाच डावात मारतात. क्रिकेट हा जलद खेळ झाला आहे आणि त्यात आता संथ खेळाडूंना अजिबात स्थान नाही. येथे फटकेबाजी केली तरच जागा आहे आणि तर कामगिरी केली नाही तर प्रतिभाशाली खेळाडूंनाही बाकावर बसावे लागते. एका अर्थाने विराटच्या या विक्रमी शतकी खेळीमुळे एक बाब लक्षात घेण्याजोगी दिसते. ती म्हणजे आता पूर्वीचे म्हणजे मधली पिढी येण्याच्या अगोदर जे क्रिकेट खेळले जात होते, त्याची घरवापसी झाली आहे. प्रत्येक चेंडू हा चोपूनच काढायला पाहिजे, या आवेशाने आज क्रिकेट खेळले जात आहे. असे पूर्वी सीके नायडू, डॉन ब्रॅडमनसारखे खेळाडू या प्रकारे खेळत. आज त्याची वापसी झाली आहे आणि हे म्हणजे एका सामन्यात चमकून जाणारे खेळाडू नव्हते तर सातत्याने अशीच फलंदाजी करणारे ते होते. ब्रॅडमन, सी. के. यांनी जो क्रिकेटचा बार उंचावला होता त्याची उंची या नव्या दमाच्या खेळाडूंनी पुन्हा इतकी वाढवून ठेवली आहे. गोलंदाजीत कमालीची सुधारणा झाली आहे. क्षेत्ररक्षणात कमालीची सुधारणा झाली आहे आणि एकदिवसीय सामन्यात तडाखेबंद फलंदाजांच्या आगमनाने दोनशे किंवा तीनशे धावा करणे सहज शक्य झाले आहे. एकदिवसीय सामन्यातच नव्हे तर टी-२० सामन्यातही शतके झळकावणारे फलंदाजही भारताकडे आज आहेत. या मुळे एक बाब लक्षात येते की क्रिकेट आमूलाग्र बदलले आहे. ते अति वेगवान झाले आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनीही विराटची प्रशंसा करताना त्याच्या क्रिकेटप्रती असलेल्या निष्ठेची आणि त्याच्या उत्कटतेची ग्वाही दिली आहे. विराटने सचिनचा विक्रम मोडला. उद्या कुणी विराटचाही विक्रम मोडेल. त्यात नवीन काही नाही. पण विराटने भारताचा आज जगात जो दबदबा निर्माण केला आहे, त्याची सर कुणालाच येणार नाही. समोर संघ न्यूझीलंडचा असो की पाकिस्तानचा की ऑस्ट्रेलियाचा, भारताचा आजचा संघ कुणालाही हार न मानणारा आणि त्याच्यापुढे डगमगून न जाणारा आहे. हाच मोदींचा नवा भारत आहे.