Subrata Roy : उद्योग क्षेत्रातील एक झंजावात निमाला

Share

उद्योग व अर्थिक क्षेत्रात शून्यातून शिखर गाठणारे सुब्रतो रॉय यांचे मुंबईतील एका खासगी इस्पितळात निधन झाले. चार दशकांपूर्वी उत्तर प्रदेशमधील गोरखपूरमध्ये एका लहानशा खोलीत त्यांनी सहारा उद्योग समूहाचे रोपटे लावले. सुरुवातीला कपडे आणि पंखे उत्पादनाचा उद्योग सुरू केला व काही वर्षातच वृत्तपत्रे, टीव्ही चॅनेल आणि गुंतवणुकीसह अनेक क्षेत्रांत त्यांनी आश्चर्यकारक झेप घेतली. फरसाण-स्नॅक्स विकता विकता त्यांनी दोन लाख कोटींचे साम्राज्य उभे केले. त्यांनी जीवनात अनेक चढ-उतार अनुभवले. आपल्या लॅम्ब्रेटा स्कूटरवरून खाद्य पदार्थांची विक्री करणारा हा महत्त्वाकांक्षी मोठा उद्योगपती म्हणून सहाराश्री या नावाने ओळखला जाऊ लागला. देशातील नामवंत उद्योगपतींच्या यादीत जाऊन पोहोचला. गुंतवणुकीसाठी वित्तीय कंपनी स्थापन केल्यावर त्यांची व त्यांच्या समूहाची लक्षणीय वेगाने प्रगती झाली. पण ज्या वेगाने सुब्रतो रॉय हे सहाराश्री बनले, त्याच वेगाने ते कायद्याच्या कचाट्यात सापडले आणि केंद्रीय चौकशी यंत्रणा व सर्वोच्च न्यायालयापुढे त्यांना हात टेकावे लागले व त्यांना अखेरचे अनेक दिवस तुरुंगात काढावे लागले.

सुब्रतो रॉय यांचे साम्राज्य फायनान्स, मीडिया, हॉस्पिटॅलिटी, असे विविध क्षेत्रांत पसरले होते. सर्वच क्षेत्रांत ते वेगाने शिखरावर पोहोचले. राजकारणी आणि सेलिब्रिटींची त्यांच्याकडे नेहमी उठबस दिसू लागली. अनेक केंद्रीय मंत्री व अनेक मुख्यमंत्र्यांची त्यांची जवळीक होती. राजकीय राजधानी असलेल्या नवी दिल्लीशी व आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईशी त्यांचे जवळचे नाते प्रस्थापित झाले होते. स्कूटरवरून फिरणारा एक विक्रेता एक मोठा उद्योगपती झाला व लाखो कर्मचारी व गुंतवणूकदार हे त्याच्या परिवाराचे सदस्य झाले, हे ते नेहमी अभिमानाने सांगत. एका खोलीत कार्यालय, दोन खुर्च्या, एक स्कूटर हाती असताना दोन लाख कोटींचे साम्राज्य उभारण्यापर्यंत त्यांची मजल गेली. विक्रेता म्हणून काम करीत असताना ते दुकानदारांना, खरेदीदारांना व मध्यमवर्गीय लोकांना बचतीचे महत्त्व पटवून देत असत. स्मॉल सेव्हिंग करा व उत्तम व्याज मिळवा, ही कल्पना त्यांनी मध्यमवर्गींयाच्या मनात बिंबवली. बँकांपेक्षा २-४ टक्के ते जास्त व्याज देत असल्याने त्यांच्याकडे गुंतवणूकदारांची संख्या वेगाने वाढली. उद्योग समूहाचा विस्तार झाल्यावर त्यांनी सहाराचे मुख्य कार्यालय उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊला सुरू केले. सहारा समूहाने एअरलाइन्स कंपनीही काढली. अनेक विमाने या कंपनीकडे होती. पण त्यात त्यांना अपयश आले. त्यांच्या व्यवहारावर सेबीची नजर जाताच त्यांना अनेक ठिकाणी हात आखडता घ्यावा लागला. सहारा क्यू शॉप या नावाखाली ग्राहकोपयोगी वस्तूंच्या विक्रीची त्यांनी साखळी निर्माण केली. पण त्यातही त्यांना अपयश आले. मात्र मुंबईत सहारा स्टार हॉटेल उभारण्याचा निर्णय त्यांचा योग्य ठरला. सहारा उद्योग समूह म्हणून त्यांना देशभर मोठी लोकप्रियता मिळाली. राजकारणी, चंदेरी दुनियेतील कलाकार आणि क्रिकेटर्सची त्यांच्या अवती-भोवती नेहमी उपस्थिती दिसायची. समाजावादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांच्याशी त्यांची असलेली जवळीक जगजाहीर होती. भाजपा व काँग्रेसमधील अनेक दिग्गजांशी त्यांचे जवळची मैत्री होती. १९७८मध्ये केवळ ४२ गुंतवणूकदारांना बरोबर घेऊन स्थापन केलेली चीट फंड कंपनी अल्पावधीत लोकप्रिय झाली व त्याचा देशभर विस्तार झाला. रिअल इस्टेट, टुरिझम, एअरलाइन्स, सिनेमा, क्रिकेट, बँकिंग, मीडिया अशा ग्लॅमरस क्षेत्रांत सहारा समूह देशभर दिसू लागला. सहाराची कार्यालये विदेशांतही उघडली गेली. सहारा समूहाकडे किती मालमत्ता किंवा संपत्ती आहे, याचा निश्चित आकडा बाहेर आलेला नाही. मात्र प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, २०१३-१४ मध्ये सहारा समूहाची संपत्ती ११ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त होती. न्यूयॉर्क व लंडन येथेही त्यांची हॉटेल्स व बिझनेस हाऊस आहेत. सुब्रतो रॉय यांची वैयक्तिक मालमत्ता अडीच लाख कोटींपेक्षा जास्त असावी. देशभरात सहाराची पाच हजारांहून अधिक कार्यालये आहेत. सहारा मॉल्स आहेत. कंपनीच्या माहितीनुसार सहाराचे १० कोटी गुंतवणूकदार आहेत. सहारा समूह एकेकाळी टीम इंडियाचे प्रायोजक होता. हॉकी खेळाला उत्तेजन देण्यासाठीही या समूहाने पुढाकार घेतला होता. त्यांच्या दोन्ही मुलींचा विवाह सोहळा लखनऊमध्ये साजरा झाला, तेव्हा देशभरातील सर्व क्षेत्रांतून नामवंतांनी व सेलिब्रिटींनी हजेरी लावली. त्या शाही विवाह सोहळ्याची मोठी चर्चा झाली होती. आयपीएल व फॉर्म्यूला वनची मालकी त्यांच्याकडे होती. पुण्याजवळ अॅम्बी व्हॅलीमध्ये त्यांनी फार मोठा आलिशान गृहसंकुल उभारला आहे. भारतीय रेल्वेपेक्षा सहारा समूह सर्वात मोठा रोजगार देणारा देशातील उद्योग समूह अशी प्रसिद्धी झाली होती. सुब्रतो रॉय हे सहारा कंपनीला सहारा परिवार असे संबोधित असत.

जवळपास सर्व क्षेत्रात उत्तुंग यश संपादित करणारे सुब्रतो रॉय हे जेव्हा सेबीच्या चौकशी चक्रात सापडले, तेव्हा त्यांना कोणीही वाचविण्यासाठी पुढे आले नाही. त्यांच्या निधनानंतर आता दहा कोटी गुंतवणूकदारांचे राहिलेले पैसे कसे व कधी मिळणार, हा मोठा प्रश्न आहे. सर्वोच्च न्यायालयाने १५ टक्के व्याजाने गुंतवणूकदारांचे पैसे परत करावेत, असा आदेश दिला आहे. सेबीकडे २५ हजार कोटी रुपये आहेत, त्याचे वितरण होईल. पण सर्व गुंतवणूकदारांना निश्चित वेळेत त्यांची रक्कम परत मिळणार का, हा प्रश्न आहे. सुब्रतो रॉय हे गेले दोन महिने मुंबईच्या खासगी इस्पितळात उपचार घेत होते. पण त्याची कुठेही चर्चा नव्हती, हे सर्व धक्कादायक आहे. सहाराश्री यांच्या निधनाने उद्योग क्षेत्रातील एक झंझावात निमाला.

Recent Posts

रेणुका माता छात्रावास, चिपळूण

सेवाव्रती: शिबानी जोशी ईशान्य भारतातील सात राज्ये निसर्ग संपन्नतेने नटलेली राज्य; परंतु सीमारेषा जवळ असल्यामुळे…

2 hours ago

मुंबईत सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ

मुंबई : आधीच महागाईने बेजार झालेल्या सर्वसामान्य मुंबईकरांना आणखीन महागाईचा फटका बसण्याची शक्यता आहे. सीएनजी…

5 hours ago

रोहित शर्माने टी-२०मधून निवृत्ती घेतल्यानंतर बदलला प्रोफाईल फोटो, मिलियनहून अधिक लाईक्स

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने आयसीसी टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर या फॉरमॅटला अलविदा म्हटले…

6 hours ago

देशात ११३ वैद्यकीय कॉलेज सुरु करण्यास मान्यता

महाराष्ट्रातील १० कॉलेजचा त्यात समावेश मुंबई : वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी परदेशामध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची वाढती संख्या…

7 hours ago

अमेरिकेत आर्थिक मंदीची लाट; सुमारे एक लाख भारतीयांच्या नोकऱ्या जाण्याची भीती

वॉशिंग्टन : अमेरिकेत आर्थिक मंदीचा फटका बसला आहे. वाढती बेरोजगारी आणि आयटीतील एआयचा वाढता यामुळे…

7 hours ago

Hair Fall: केसगळती रोखायची असेल तर जरूर खा हे पदार्थ, हेअरफॉल होईल कमी

मुंबई: केसगळती(hair fall) ही सध्याची मोठी समस्या बनली आहे. थोडेफार केस गळणे ही सामान्य बाब…

7 hours ago