
आज अर्धशतकाआधीच परतला पण वर्ल्डकपच्या इतिहासात केलं असं काही...
मुंबई : भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आपल्या जबरदस्त फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. त्याची खेळी पाहून रवी शास्त्रींनी त्याला 'हिटमॅन' (Hitman) अशी पदवी देखील बहाल केली आहे. क्रिकेट विश्वचषकातील (Cricket World Cup) गेल्या काही सामन्यांत रोहितने चाहत्यांची निराशा केली असली तरी वर्ल्डकपच्या इतिहासातील एक नवा विक्रम रोहितने आपल्या नावावर केला आहे. रोहित शर्मा वर्ल्डकप सामन्यांत सर्वाधिक ५० षटकार ठोकणारा पहिला खेळाडू ठरला आहे. याआधी वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलने (Chris Gayle) ४९ षटकार ठोकले होते. मात्र, गेलचा हा विक्रम मोडीत काढत रोहित शर्मा नंबर १ ठरला आहे.
आज मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर (Wankhede Stadium) भारत विरुद्ध न्यूझीलंड (India Vs Newzealand)सामना सुरु आहे. यात रोहितने नाणेफेक जिंकत फलंदाजीला सुरुवात केली. चार शानदार चौकार आणि चार षटकार लगावत रोहितने मैदानात धावांचा पाऊस पाडला. २९ चेंडूमध्ये ४७ धावांचे जबरदस्त योगदान दिल्यानंतर रोहित अर्धशतकाआधीच बाद झाला. मात्र, बाद होण्यापूर्वीच नवा विक्रम त्याने आपल्या नावावर करुन घेतला.
रोहित शर्माने षटकारांच्या बाबतीत विक्रम केलाच. याचबरोबर त्याने संयुक्तरित्या वर्ल्डकपमधील सर्वात वेगाने १५०० धावा पूर्ण केल्या. रोहितच्या वादळमुळे युनिवर्स बॉस ख्रिस गेलचा विक्रम इतिहासजमा झाला आहे. आता विश्वचषकात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम रोहितच्या नावावर आहे.