पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाला लाभलेले एकमेव पंतप्रधान असे आहेत की, जे दरवर्षी दिवाळी सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांबरोबर साजरी करतात. यापूर्वी एकाही पंतप्रधानांनी दिवाळी सैनिकांसोबत साजरी केल्याचे ऐकण्यात नाही. ते क्वचित सीमेवर गेलेच तर जवानांबरोबर थोडा वेळ व्यतीत करत असत आणि दिवाळीच्या दिवशी आपले कुटुंबीय आणि मित्रांबरोबर गप्पागोष्टी करत दिवाळी साजरी करत असत. पण मोदी यांनी दिवाळी सीमेवर तैनात असलेल्या जवानांबरोबर साजरी करण्याची परंपरा ते सत्तेत आल्यापासून म्हणजे २०१४ पासून जपली आहे. इतकेच नव्हे तर ते गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासूनच सीमेवरील जवानांसमवेत दिवाळी साजरी करून त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करत आले आहेत. सीमेवर प्रचंड थंडीत आणि जीवघेण्या वातावरणात भारताच्या सीमांचे संरक्षण करण्याचे अत्यंत अवघड कार्य करत असलेल्या जवानांना मोदी यांनी नेहमीच दिवाळीच्या दिवशी त्यांच्याबरोबर सहवासात दिवस काढून आनंद दिला आहे. सीमेवरील सैनिक त्यामुळे मोदी यांच्याशी त्याबद्दल कृतज्ञ आहेत. अगोदरच जीवघेण्या थंडीत आणि एकलेपणाच्या आगीत होरपळणाऱ्या सैनिकांना देशाचा पंतप्रधान आपल्याला भेटण्यासाठी येतो आणि मिठाई वाटतो, याचे किती अप्रूप असेल, त्याची कल्पना त्या भागातील रक्त गोठवणाऱ्या थंडीची ज्यांना कल्पना आहे त्यांनाच येईल. मोदी यांनी सियाचेनपासून ते कारगीलपर्यंत आपल्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत दिवाळी ही जवानांना भेट देऊन साजरी केली आहे. मोदी यांनी जवानांचे कौतुकही केले आहे. जवानांमुळे आज देशाच्या सीमा सुरक्षित आहेत, असे उद्गार मोदी यांनी काढले आहेत, खरेच आहे ते. जवान सीमेवर जागता पहारा ठेवत असतात म्हणून आपण रात्री निवांत झोपू शकतो, हे सत्य आहेच. पण त्याची जाणीव असलेले मोदी हेच एकमेव पंतप्रधान असावेत. कारण इंदिरा गांधींपासून ते चंद्रशेखर, गुजराल, देवेगौडा आणि नेहरू, राजीव गांधी यांच्यापर्यंत इतके पंतप्रधान होऊन गेले. पण एकानेही कधीही दिवाळी सैनिकांसोबत साजरी केल्याचे ऐकिवात नाही.
पंतप्रधानांच्या भेटीमुळे जवानांची उमेद वाढते. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारताची भौगोलिक स्थिती अशी आहे की, भारत हा सर्व बाजूंनी शत्रुराष्ट्रांनी वेढलेला आहे. त्यामुळे सीमा सातत्याने संघर्षाने धगधगत असतात. त्या सीमांचे संरक्षण करणे ही सैनिकांची देशाप्रती उच्च प्रकारची सेवाही आहे आणि त्यांचे कर्तव्यही ते निभावत असतात. याची जाणीव असलेला पंतप्रधान म्हणून मोदी यांची प्रशंसा करावी तेवढी थोडीच आहे. चीन, पाकिस्तान अशा शत्रुराष्ट्रांनी भारताची चारही बाजूंनी कोंडी झालेली आहे. अर्थात त्यात भारताच्या भौगोलिक स्थितीचा आणि भूराजकीय स्थितीचा दोष आहे. त्यामुळे सीमेवर सैनिकांवर असलेली जबाबदारी कित्येक पटींनी वाढलेली असते. या परिस्थितीत पंतप्रधान सीमेवरील जवानांना भेट देऊन त्यांचे मनोबल कितीतरी पटींनी वाढवतात. सैनिकांनाही देशाच्या सीमांवर अधिक मजबुतीने संरक्षण करण्याचे मोल समजले आहे, असा अर्थ होत नाही. पंतप्रधान मोदी यांच्यासारखाच हवा, जो सैनिकांची दुःखे समजून घेऊ शकतो आणि पुलवामा हल्ल्यानंतर लगेचच बालाकोट हवाई हल्ले करून पाकिस्तानला जशास तसे उत्तर देऊ शकतो. आज मोदी पंतप्रधान झाल्यानंतर पाकिस्तानच्या सीमेवरून केल्या जाणाऱ्या कुरापती जवळपास बंद झाल्या आहेत. कारण भारतात आता खलितेबाज सरकार नाही, याची खात्री शत्रूंना पटली आहे. येथे एका मोर्टर गोळ्याला त्याच्या दसपटीने ताकदवान मोर्टर गोळ्यांनी उत्तर दिले जाते, याची त्यांना प्रचिती आली आहे. काळ युद्धाचा असो की शांततेचा असो, जगाला केवळ बलाची भाषा समजते. सामर्थ्याच्या भाषेतच देशाचे सार्वभौमत्व जपलेले असते. त्यामुळे मोदी यांच्या पंतप्रधान म्हणून आगमनानंतर शत्रू सारेच परास्त झाले आहेत. हा आजचा नवीन भारत आहे, याची जाणीव मोदी यांनी वेळोवेळी करून दिली आहे. केवळ विज्ञान आणि तंत्रज्ञानच नव्हे तर सामर्थ्याच्या भाषेतही भारत आज अव्वल आहे, हे मोदींनी जगाला दाखवून दिले आहे. सीमा सुरक्षित असतील तर देश सामर्थ्याची भाषा बोलू शकतो, हे मोदी यांना चांगले माहीत आहे. त्यामुळेच त्यांनी दिवाळी सैनिकांबरोबर साजरी करून सैनिकांचे मनोबल उंचावून त्यांना पुढील संघर्षासाठी तयार करण्याचे काम सातत्याने आरंभले आहे. भारतात सीमावर्ती प्रदेशातून निर्वासितांची येणारी संख्या नेहमीच अनियंत्रित आहे आणि या निर्वासितांना नियंत्रणात ठेवण्यासाठी सीमेवरील तैनात जवानांना सातत्याने लक्ष ठेवावे लागते. कारगील युद्ध अशाच दुर्लक्षातून घडले होते, याचा कुणालाही विसर पडलेला नाही. त्यामुळेच मोदी यांनी एक दिवाळी तर कारगीलला उणे कितीतरी अंश तपमानात सीमेवर नजर ठेवणाऱ्या जवानांसोबत साजरी केली होती. मोदी यांनी आपल्या भेटीत सीमेवरील जवानांची भरपूर प्रशंसा केली आहे. त्यांना नवी उमेद दिली आहे. त्यांच्या कार्याचे महत्त्व देशाला पटवून दिले आहे. सीमेवरील जवान आपल्या कार्यात दक्ष असतातच. पण त्यांच्या कार्याची दखल उघडपणे मान्य करणारा पंतप्रधान असल्यावर त्यांची देशसेवेप्रती असलेली जिद्द आणि सेवाभाव सहस्त्र पटींनी वाढत असतो. मोदी यांनी दिवाळी जवानांसोबत साजरी करण्याच्या परंपरेचे पालन करून राष्ट्राला नवीन संदेश दिला आहे.