Sunday, April 27, 2025
Homeसंपादकीयविशेष लेखप्रहार : कोकणचे प्रतिबिंब

प्रहार : कोकणचे प्रतिबिंब

वर्धापन दिनानिमित्त: डॉ. सुकृत खांडेकर

आज ९ नोव्हेंबर. प्रहार दैनिकाच्या सिंधुदुर्ग व रत्नागिरी आवृत्तीचा पंधरावा वर्धापन दिन. पंधरा वर्षांपूर्वी दि. ८ ऑक्टोबरला मुंबईत प्रहार सुरू झाला आणि ९ नोव्हेंबरला प्रहारने कोकणात झेप घेतली. कोणत्याही वृत्तपत्राची पंधरा वर्षे म्हणजे फार मोठा काळ नाही किंवा अगदी त्या वृत्तपत्राचे बालपण आहे, असेही म्हणता येणार नाही. प्रहारने आता तारुण्यात प्रवेश केला आहे. ज्या हेतूने ‘प्रहार’चे सर्वेसर्वा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी हे दैनिक सुरू केले, त्याचा हेतू बऱ्याच प्रमाणावर साध्य होत आहे आणि खूपशा प्रमाणात साध्य करायचे आहे.

प्रहार सुरू करताना नारायण राणे यांनी म्हटले होते की, प्रहारच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू हा महाराष्ट्रातील शेवटचा टोकाचा माणूस असेल. त्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रहार विचाराचे प्रबोधन करील. प्रहार हे वृत्तपत्र कधीही विकले जाणार नाही. समाजाच्या प्रगतीसाठी प्रहार हे धारदार शब्दांनी प्रहार करील. हे वृत्तपत्र निर्भीडपणे राज्याच्या विकासाकडे लक्ष वेधेल. विकासाच्या आड येणाऱ्यांवर, जनतेचे शोषण करणाऱ्यांवर आणि राज्याच्या मालमत्तेची लूट करणाऱ्यांवर हे वृत्तपत्र कठोर शब्दांत प्रहार करील…

नारायण राणे यांनी दिलेल्या विचारांवर आणि त्यांनी दाखवलेल्या दिशेनेच गेली पंधरा वर्षे प्रहारची वाटचाल चालू आहे. नारायण राणे व त्यांच्या परिवाराचा सार्वजनिक कामाचा केंद्रबिंदू हा कोकणात आहे. कोकणी माणसावर राणे यांचे कमालीचे प्रेम आहे. कोकणी माणसाच्या सुखदु:खात सहभागी होणारे प्रहार हे वृत्तपत्र आहे. वसंतदादा पाटील हे राज्याचे चार वेळा मुख्यमंत्री होते, त्यांना सांगलीत कोणी माणूस भेटला की, दादांना खूप छान वाटायचे. शरद पवार हेही राज्याचे ४ वेळा मुख्यमंत्री होते, केंद्रात संरक्षण, कृषिमंत्री होते. त्यांना पुणे जिल्ह्याचा कोणी माणूस भेटला की त्यांना आजही आनंद होतो. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना कोणी लातूरचा भेटला किंवा सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना मुंबईत व केंद्रीयमंत्री असताना दिल्लीत कोणी सोलापूरचा भेटला की त्यांना खूप आपुलकी वाटायची.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना पत्रकार भेटले की, त्यांच्याशी गप्पा मारताना ते हरवून जात असत. तसेच नारायण राणे यांना मुंबईत किंवा दिल्लीत कोकणातला त्यातही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणी माणूस भेटला की, ते त्यांची प्रथम आस्थेने विचारपूस करतात व त्याचा प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करतात. सत्तेच्या राजकारणात कोकणाकडे वर्षानुवर्षे दुर्लक्ष झाले हे वास्तव आहे. म्हणूनच रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांच्या विकासाची आस नारायण राणे व त्यांचे पुत्र माजी खासदार निलेश व आमदार नितेश यांना आहे, हे त्यांच्या बोलण्या-वागण्यातून नेहमी जाणवते. प्रहार हे राणे कुटुंबीयांचे वृत्तपत्र. त्यांची भूमिका प्रहारमध्ये नेहमीच आक्रमकपणे मांडली जाते. पण कोकणच्या समस्या व विकासाचे प्रश्न तेवढ्याच तडफेने ‘प्रहार’च्या सिंधुदुर्ग व रत्नागिरी आवृत्तीत मांडले जातात.

नारायण राणे हे केंद्रीयमंत्री म्हणून देशभर फिरत असतात. सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग खात्याचे मंत्री असल्याने त्या खात्याचे कार्यक्रम देशभर होत असतात. शिवाय भारतीय जनता पक्षाचे काम करतानाही त्यांना देशभर दौरे करावे लागतात. ते पश्चिम बंगाल किंवा जम्मू- काश्मीर किंवा आसामच्या दौऱ्यावर असले तरी त्यांचे लक्ष महाराष्ट्रात कोकणावर असते. ‘घार हिंडते आकाशी पण लक्ष तिचे पिलापाशी’ तसे राणे यांचे लक्ष कोकणावर सदैव असते.

‘प्रहार’चा संपादक म्हणून काम करताना राणेसाहेबांशी माझी अनेकदा अनेक विषयांवर चर्चा होते. काम करताना आमच्याकडूनही काही वेळा चुका घडतात. काही वेळा त्यांच्या अपेक्षेप्रमाणे प्रहारमध्ये वृत्तांकन झालेले नसते. मग ते आम्हाला रागावतात. राणेसाहेबांचा स्वभाव हा कोकणातल्या फणसाप्रमाणे आहे. वरून ते काटेरी वाटले तरी मनाने ते गोड स्वभावाचे आहेत, असा आम्हाला अनुभव येतो. प्रहारमधून नारायण राणे व त्यांच्या परिवाराची तसेच भारतीय जनता पक्षाची भूमिका जोरकसपणे मांडली जाते, यामागे त्यांचे मोलाचे मार्गदर्शन आहे.

कोविड काळात दोन-अडीच वर्षे सर्वच माध्यमांवर मोठे संकट कोसळले होते. गेल्या वर्षभरापासून पुन्हा सारे रुळ‌ावर येत आहे. वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्या यांच्यात जीवघेणी स्पर्धा आहे. ब्रेकिंग न्यूजच्या पाठीमागे वृत्तपत्रांना धावता येत नाही आणि खात्री केल्याशिवाय बातमी देता येत नाही. कोकणातही मोठ्या वृत्तपत्रांनी आपल्या साखळी आवृत्त्या सुरू केल्या आहेत. कोकणात वृत्तपत्र सुरू करायचे म्हणजे खर्च अधिक व उत्पन्न कमी. अशा आर्थिक गणिताशी स्पर्धा करीत ‘प्रहार’च्या सिंधुदुर्ग व रत्नागिरी आवृत्तीने कोकणातील माणसाच्या मनात स्थान मिळवले आहे. कोकणी माणूस हा प्रहारचा केंद्रबिंदू आहे, हा मंत्र लक्षात घेऊनच प्रहारची वाटचाल चालू आहे.

‘प्रहार’ची रविवारची कोलाज पुरवणी लोकप्रिय ठरली आहे. साहित्य, सांस्कृतिक व प्रासंगिक असे त्याचे स्वरूप आहे. नामवंत लेखक-लेखिकांची मांदियाळी कोलाजमध्ये बघायला मिळते. कोलाजमध्ये आम्हाला नियमित लिहायला संधी द्या, अशी विनंती करणाऱ्या लेखकांची यादी मोठी आहे. मृणालिनी कुलकर्णी, सतीश पाटणकर, पल्लवी अष्टेकर, श्रीनिवास बेलसरे, डॉ. महालक्ष्मी वानखेडकर, ॲड. रिया करंजकर, डॉ. पल्लवी परूळेकर-बनसोडे, एकनाथ आव्हाड, रमेश तांबे, प्रा. देबवा पाटील, प्रा. प्रतिभा सराफ, दीपक परब, पूर्णिमा शिंदे अशा लेखकांची टीम कोलाजमध्ये नियमित लिहीत आहे. मंगेश महाडिक यांचे दैनंदिन व साप्ताहिक राशिभविष्य व पंचाग आहेच. शनिवारच्या रिलॅक्स पुरवणीत भालचंद्र कुबल, महेश पांचाळ, रूपाली हिर्लेकर-राणे यांची उपस्थिती आहे. अर्थविश्वमध्ये महेश देशपांडे, महेश मलुष्टे, उमेश कुलकर्णी हे साप्ताहिक घडामोडींवर भाष्य करीत असतात. दर बुधवारी प्रसिद्ध होणाऱ्या श्रद्धा व संस्कृतीमध्ये सद्गुरू वामनराव पै, प्रा. मनीषा रावराणे, विलास खानोलकर, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आणि प्रवीण पांडे तसेच रविवार मंथनमध्ये अनघा निकम-मगदूम, अर्चना सोंडे आणि प्रा. वीणा सानेकर यांच्या स्तंभांनी ‘प्रहार’ने वाचकांमध्ये उंची गाठली आहे. प्रहारच्या संपादकीय पानावर मीनाक्षी जगदाळे यांच्या फॅमिली कौन्सिलिंगने मोठी वाचकप्रियता संपादन केली आहे. शिवाय ग्राहक पंचायत, संघ परिवाराची ओळख करून देणारी शिबानी जोशी यांची मालिका मोठी वाचनीय ठरली आहे. क्रीडा पानावर रोहित गुरव व ज्योत्स्ना कोट-बाबडे यांचे स्तंभ साप्ताहिक घडामोडींवर उत्तम विश्लेषण करणारे असतात. माझे सहकारी संतोष वायंगणकर हे निवासी संपादक म्हणून सिंधुदुर्ग-रत्नागिरी आवृत्तीची जबाबदारी समर्थपणे सांभाळत असताना त्यांचा कोकणातील ताज्या घडामोडींवरील कोकणी बाणा हा स्तंभही लोकप्रिय आहे.

गेल्या वर्षी महाराष्ट्रात सत्तांतर घडले. ठाकरे सरकार कोसळले व एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना-भाजपा सरकार स्थापन झाले, या सत्तांतरात ‘प्रहार’चा वाटा मोठा होता. तसेच आता अजितदादा पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४० आमदारांसह सरकारमध्ये आल्याने ट्रिपल इंजिन सरकार बनले आहे. विकासाचा वेग वाढून कोकणाला न्याय मिळणे अपेक्षित आहे. प्रहार समूहाचे महाव्यवस्थापक मनिष राणे तसेच एचआर व प्रशासन विभागाचे प्रमुख ज्ञानेश सावंत यांच्या सक्रियतेमुळे ‘प्रहार’च्या मुंबई, सिंधुदुर्ग, रत्नागिरी व नाशिक आवृत्त्यांची वाटचाल समर्थपणे चालू आहे. ‘प्रहार’ची बांधिलकी ही वाचकांशी व प्रामुख्याने कोकणवासीयांशी आहे. ‘शब्दाला सत्याची धार’ हा प्रहारचा मंत्र आहे. वाचकांना सत्य सांगणे व सत्य समजावून घेणे हे आमचे कर्तव्य आहे. सत्य सांगण्याचा आम्ही वसा घेतला आहे, तो कधी आम्ही सोडणार नाही. कोकणी माणूस हा आमचा श्वास आहे. त्याच्यावर होणारा अन्याय आम्ही कधीही सहन करणार नाही. ‘प्रहार’वर कोकणवासीयांचे आजवर असलेले प्रेम यापुढेही कायम राहील, असा आम्हाला विश्वास वाटतो. ‘प्रहार’ परिवाराच्या वतीने सर्व वाचक, जाहिरातदार व हितचिंतकांना मनापासून शुभेच्छा!

[email protected]
[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -