कोलकाता: विराट कोहली(virat kohli) आज आपला ३५वा वाढदिवस साजरा आहे. या निमित्त त्याने एक खास रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. हा रेकॉर्ड त्याने विश्वचषकात केल्याने त्याचे महत्त्व खास आहे. विराट कोहलीने आतापर्यंत आपल्या करिअरमध्ये चार वेळा विश्वचषक खेळला आहे. त्याचा पहिला विश्वचषक २०११मध्ये होता.
भारत चॅम्पियन ठरला होता. यानंतर विराट २०१५, २०१९ आणि २०२३मध्येही विश्वचषक खेळला आहे. अशातच गेल्या तीन विश्वचषकात विराट कोहलीने कधीही ५०० धावा केल्या नव्हत्या. मात्र यावेळी विराट कोहली जबरदस्त फॉर्मात असल्याने भरपूर धावा करत आहे.
विश्वचषकात दुसरा सर्वाधिक धावा कऱणारा खेळाडू ठरला विराट
त्याने ऑस्ट्रेलियाविरद्ध पहिल्या सामन्यापासून धावा करण्यास सुरूवात केली आणि आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळवल्या जात असलेल्या आठव्या सामन्यातही कोहलीची बॅट काही थांबण्यास तयार नाही. विराटने या दरम्यान २ शतक आणि ४ अर्धशतके ठोकली आहेत.
कोहलीने या विश्वचषकातील आपले दुसरे आणि आंतरराष्ट्रीय वनडे करिअरमधील ४९वे शतक दक्षिण आफ्रिकेविरुद्ध साजरे केले. भारतीय संघांचा आज आठवा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कोलकाताच्या ईडन गार्डनवर खेळवला जात आहे.
या सामन्यात विराट कोहलीने ४९वे एकदिवसीय शतक ठोकताना विश्व क्रिकेटमध्ये सर्वाधिक एकदिवसीय शतके ठोकण्याचा सचिन तेंडुलकरच्या रेकॉर्डशी बरोबरी केली आहे. सचिन तेंडुलकरने आपल्या एकदिवसीय करिअरमध्ये ४९ शतक ठोकले होते. जगातील कोणत्याही फलंदाजांने ही कामगिरी केली होती. आता विराटने सचिनच्या एका रेकॉर्डशी बरोबरी करणारा फलंदाज ठरला आहे.